श्री सुधीर करंदीकर

 

🔆 विविधा 🔆

☆ “होली है भाई होली है…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

आपल्याकडे सणांची रेलचेल असल्यामुळे आपण खरंच खूप नशीबवान आहोत. कायम कुठला ना कुठला सण आपल्याकडे साजरा होत असतो आणि आपल्या सगळ्यांना आनंद देत असतो. असाच एक सण आज आहे आणि तो म्हणजे होळी.

मराठी वर्षाचा शेवटचा महिना फाल्गुन आणि या महिन्यातली पोर्णिमा, या दिवशी होळी हा सण असतो. या सणाच्या मागे एक सुंदर पौराणिक कथा आहे ती अशी —

फार पूर्वी हिरण्यकश्यपू नावाचा बलवान राक्षस होता. तो स्वतःला देवांपेक्षाहि बलवान समजायचा. त्याच्या मुलाचे नाव होते प्रल्हाद. प्रल्हाद हा विष्णुभक्त होता आणि तो कायम विष्णु नामस्मरण करत असायचा. हिरण्यकश्यपूला हे मुळीच आवडायचे नाही. त्याला विष्णु नामस्मरण करण्या पासून परावृत्त करण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला, पण प्रल्हाद कधी ऐकत नव्हता.

शेवटी हिरण्यकश्यपूने प्रल्हादला ठार मारण्याचे ठरवले. हिरण्यकश्यपूची बहिण होती होलीका. ती पण राक्षसीवृत्तीची होती. तिला असे वरदान होते की तिला अग्नी काही करू शकणार नाही. म्हणून हिरण्यकश्यपूने लाकडाची चिता रचली, त्यावर होलिकेला बसविले आणि तिच्या मांडीवर प्रल्हादला बसविले. चिता पेटवली. झाले उलटेच प्रल्हादच्या भक्तीमुळे प्रल्हादला काहीच झाले नाही आणि होलिका जळून खाक झाली. तेव्हा आकाशवाणी झाली – होलिकेला दिलेले वरदान हे चुकीच्या कार्याकरता वापरले, म्हणून ते निष्क्रिय झाले. हा दिवस होता फाल्गुन पौर्णिमेचा आणि त्याच दिवशी आपण साजरी करतो होळी.

लोक मनोभावे होळीची पूजा करतात, होळीला प्रसाद दाखवतात, होळीला प्रदक्षिणा करतात.

होळीच्या दिवशी लाकडे, गोवऱ्या, जमा करून होळी पेटवली जाते. फार पूर्वी, सांकेतिक म्हणजे अगदी छोट्या प्रमाणावर होळी पेटवून हा सण साजरा होत असावा.

आता हळूहळू सगळ्याच सणांमध्ये मूळ कल्पना बाजूला राहून दिखावा वाढवण्याकडे सगळ्यांचा कल आहे. होळी हा सण पण त्यामध्ये एक आहे. चौकाचौकात, सोसायट्यांमध्ये, काही सार्वजनिक ठिकाणी होळ्या पेटतात. काही ठिकाणच्या होळ्या खूपच मोठ्या प्रमाणावर असतात.

भरपूर लाकडे आणि काय काय ते जाळले जाते आणि भरपूर धूर होतो, प्रदूषण होत असते. काहीजण होळी करता केलेला प्रसाद होळीमध्ये अर्पण करतात. म्हणजे अन्न पण वाया जात असते. काय बरोबर आहे आणि काय चूक आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

होळी सण साजरा करण्यामागची मूळ कल्पना अशी होती की या दिवशी आपण सगळ्यांनी आपल्या वाईट आचार-विचारांना तिलांजली द्यावी आणि आपल्या मनातील वाईट विचारांना होळीच्या आगीत जाळून खाक करावे.

आपण या वर्षीची होळी, होळीच्या मागची मूळ संकल्पना मनात ठेवून साजरी करायची का? आपल्या मनामधले इतरांविषयीचे वाईट विचार, आपली वाईट प्रवृत्ती, आपल्या वाईट सवयी, अशा सगळ्या वाईट लेबल असणाऱ्या आपल्या पैलूंना आपण आज होळीमध्ये कायमस्वरूपी अर्पण करूया.

असे केले तर येणारे संपूर्ण वर्ष आपल्याला आणि आपल्याशी संबंध येणाऱ्यां सगळ्यांना सुखा-समाधानाचे जाईल आणि आनंदाचे जाईल, अशी आकाशवाणी नक्कीच होईल!!!!

होळीच्या तुम्हाला, तुमच्या परिवार सदस्यांना आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा!

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments