श्री जगदीश काबरे

☆ “बदल हाच आहे स्थायीभाव…☆ श्री जगदीश काबरे ☆

मित्रांनो, आपले आयुष्य म्हणजे एका तळ्यातील साचलेल्या पाण्यासारखे आहे. त्यात जर कोणी एक दगड फेकून मारला की, ज्या प्रमाणे पाण्यावर तरंग निर्माण होतात, तसे काम विज्ञान-तंत्रज्ञान आपल्या आयुष्यात आज करत आहे. त्यामुळे आपल्या थांबलेल्या शांत आयुष्यात लगेच बदल घडायला सुरु होतो. असे रोज नवनवीन दगड पडत आहेत. ज्या ज्या वेळी नवीन दगड पडणार त्या त्या वेळी तुम्हाला मला बदलावेच लागणार आहे. आपल्याला नवीन अपडेट ज्ञान घ्यावेच लागणार आहे. तुम्हाला आणि मलाही कामाची नवीन पद्धत आणावीच लागणार आहे. तुम्हाला-मला नवनवीन कौशल्य आत्मसात करावेच लागणार आहे. तुम्हाला-मला आपली प्रवृत्ती बदलावीच लागणार आहे. यातून एक गोष्ट नक्कीच होणार आहे… ते म्हणजे आपल्याला सातत्याने बदलावेच लागणार आहे. कारण हा दगड पडण्याचा कार्यक्रम बंद होणार नाही. विज्ञान सतत नवनवीन दिशेने भरारी घेत रहाणार आहे.

यामुळे झालेय काय की, अनेक लोक आपल्या भविष्याबद्दल भयभीत होत आहेत. “माझे पुढे कसे होणार?, माझ्या मुलांचे कसे होणार? माझ्या आयुष्याचे काय होणार? काही थोडकेच जण असे आहेत की, जे त्यांच्या आयुष्यात शांत आहेत, आनंदी आहेत. बाकी मोठ्या प्रमाणात अशी लोकसंख्या आहे, जी आपल्या भविष्याबद्दल भयभीत आहे, प्रचंड तणावाखाली आहे. अनेक लोक तर या विचारात आहेत की, हे जे झपाट्याने बदल होत आहेत हे सर्व आम्हाला कसे झेपणार?

प्रत्येक गोष्टीचा वेग वाढला आहे.  विज्ञान-तंत्रज्ञानातील हे बदल रोज आपल्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूवर परिणाम घडवून आणत आहेत. आजूबाजूला जे झपाट्याने बदल घडत आहेत त्यामुळे अनेक नवीन गोष्टी तुमच्या-माझ्यावर आदळत आहेत. यामुळे एक खूप मोठा गोंधळ निर्माण होत आहे. त्यामुळे आपला आत्मविश्वास हरवत आहे. या अशा अशांत वातावरणाने आपल्या आरोग्यावर देखील परिणाम होत आहे. माणसे प्रचंड तणावाखाली वावरत आहेत.

मागील २०० वर्षात जितके शोध नाही लागले तितके शोध मागील ५ वर्षात लागले आहेत आणि हा प्रत्येक शोध आपल्या आयुष्यात अशी घुसखोरी करत आहे की, आपल्याकडे थांबून पाहायला वेळच नाही. माझे पुढे काय होईल? या अशा विचारांचा गोंधळ, सातत्याने वाढत जाणारी भीती, या सर्वाचा परिणाम म्हणजे आपण आत्याधुनिक साधने तर वापरू लागलो आहोत; पण विचारांनी मात्र अजूनही 400 वर्षे मागेच आहोत. म्हणूनच आपल्या आयुष्यात गोंधळ उडालेला दिसतोय. यावर उपाय एकच… जेव्हा आपण विवेकाने वागायला शिकू, वैज्ञानिक दृष्टिकोनाने जगायला शिकू, प्रत्येक घडणाऱ्या घटनेतील कार्यकारणभाव शोधायला शिकू, अंधश्रद्धेतून मुक्त होऊ, नवीन ज्ञान आत्मसात करायची जिगीविषा बाळगू, तेव्हाच या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या भारारीला कवेत निश्चितपणे घेऊ शकू.

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments