श्री जगदीश काबरे
☆ “वाचक…” ☆ श्री जगदीश काबरे ☆
वाचक तीन प्रकारचे असतात.
पहिल्या प्रकारचे वाचक हे एखादा विचार वाचला की तात्काळ व्यक्त होणारे म्हणजेच प्रतिक्रिया देणारे असतात.
दुसऱ्या प्रकारचे वाचक एखादा विचार वाचल्यावर त्यावर चिंतन मनन करून त्या विचाराला योग्य शब्दात प्रतिसाद देणारे असतात.
आणि तिसऱ्या प्रकारची माणसे विचार वाचल्यावर कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाहीत. पण स्वतः मात्र त्या विचारावर विचार करत असतातच. अशा वाचकांना ‘सायलेंट रीडर्स’ असे म्हणतात. कुठल्याही ग्रुपमध्ये अशा सायलेंट रीडर्सची संख्या मोठ्या प्रमाणात असते.
तेव्हा आपण जे काही विचार मांडतो त्या विचारावर इतरांची व्यक्त व्हायलाच पाहिजे अशी अपेक्षा करणेच मुळात चूक आहे. त्यासाठी तो माणूस विवेकी नाही, त्याला बोलायची भीती वाटते, अशा पद्धतीचे आपले मत मांडणे हेच तर खरे अविवेकीपणाचे लक्षण म्हटले पाहिजे.
आपण जे विचार मांडतो ते दोन गोष्टींसाठी… एक तर आपल्याला आपले मन मोकळे करायचे असते म्हणून आणि दुसरं म्हणजे तो विचार मांडून इतरांकडून आपल्याला काही नवीन ज्ञान मिळवायचे असते म्हणून.
मग अशा वेळेला आपल्या विचारावर कोण किती प्रतिसाद देतोय हा मुद्दा अत्यंत गौण आहे. आपण आपले विचार मांडत राहावे, वाचणारे वाचत राहतील, प्रतिसाद देणारे प्रतिसाद देत राहतील, प्रतिक्रिया देणारे प्रतिक्रिया देतील आणि सायलेंट रीडर्स तो विचार वाचून त्यांना पटला असेल तर स्वतःमध्ये मुरवण्याचा प्रयत्न करत रहातील अन्यथा वाचून सोडून देतील. या पलीकडे आपला विचार मांडल्यानंतर त्यावर कोणी कसे व्यक्त व्हावे यावर आपला कुठलाही हक्क राहत नाही. म्हणून आपण कुठलीही अपेक्षा न ठेवता कोणालाही दोष न देता शांतपणे आपले विचार मांडत राहावे हेच खरे.
© श्री जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈