सौ कल्याणी केळकर बापट
विविधा
☆ “शिशिरॠतूचे गान…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆
दोन दिवसांपासून वातावरणात हलका बदल व्हायला सुरवात झालीयं. ही शिशिराची चाहूल . हे बदलते ऋतू आणतात आयुष्यात वैविध्य, रंगत आणि शिकवितात एक मोलाचा संदेश. आयुष्यात दिवस हे देखील ऋतुंप्रमाणे बदलत असतात. त्यामुळे कुठल्याही चांगल्या स्थितीत हुरळून जायचं नाही आणि कुठल्याही वाईट स्थितीत डगमगायचं नाही, कारण दिवस हे ऋतुंप्रमाणे बदलत असतात.
दिनदर्शिकेप्रमाणे मार्गशीर्ष आणि पौष ह्या मराठी महिन्यात शिशिर ऋतू असतो. ग्रेगरी दिनदर्शिकेप्रमाणे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी ह्या इंग्रजी महिन्यात शिशिर ऋतू असतो.
शिशिर ऋतूमध्ये झाडांची पाने पिवळी पडतात व गळतात. त्यानंतर त्या झाडांना नवीन पालवी फुटण्यास सुरुवात होते. या ऋतूत काही प्रमाणात गारवा व थंडी असते आणि काही प्रमाणात उन्हाळ्याची चाहूल देखील एकीकडे येणे सुरू होते. या ऋतूत फळे व फुले बहरलेली असतात .
या काळात उत्तरेकडून थंड वारे वाहत असतात. उन्हाळा सुरू झाला की पहिले दोन चार दिवस ती पानगळ,पिकली पानं गळतांना बघून मन हुरहुरतं,उदास होतं पण हे तर निसर्गचक्र. परत नवीन पालवी फुटतांना बघितली की परत मन हरखतं,प्रफुल्लित होतं.सगळे आपले मनाचे खेळ. आंब्याचा मोहोर,डवरलेला गुलमोहर आणि फुललेला पळस बघणं म्हणजे डोळ्यांचं पारणं फेडणारं सुख,आनंद.तो पळस आणि गुलमोहर डोळ्यात किती साठवून ठेवू असं होतं खरं.
ह्या शिशिराची आठवण होतांना हमखास आठवण होते वा.रा.कांत ह्यांच्या “शिशीरऋतूचे गान ” ह्या कवितेची.त्या कवितेतील शेवटचे कडवे आणि त्याचे माझ्या शब्दांत रसग्रहण पुढीलप्रमाणे
हलके हलके हसते,गळते तरुचे पान न पान
पानझडीत या ऐकुन घ्या गं शिशीर ऋतुचे गान
फुले जळाली, पाने गळली,
फळांत जरी रसधार गोठली,
सर्व स्रुष्टी जरी हिमे करपली,
पिवळ्या पानांच्या मनी फुलते वसंत स्वप्न महान
पानझडीत ह्या ऐकून घ्या गं शाशीरऋतुचे गान
खरंच हा ऋतु साक्षात वृक्षांच्या उदाहरणावरुन आपल्याला शिकवून जातो.अगदी हलके हलके सहजतेने वृक्षाची पानगळ झाली, फुलं जळाली, अगदी परिसीमा म्हणजे अवघी स्रुष्टी जरी हिमे करपली. तरी आपलं मनं मात्र कायम आशावादी सकारात्मक ठेवा कारण येणारा उद्या कायम आपल्यासाठी वसंत ऋतू म्हणजे भरभराट घेऊन येणारच आहे.त्यामुळे खचून न जाता उद्याची वाट बघत आशावादी सकारात्मक हसतमुख रहा. आपल्यातील कित्येक आदर्श पिकली पानं जरी गळून पडली तरी त्यांचा आदर्श आपल्याला कायम शिकवण देत राहील
त्यांच्या आठवणी,आदर्शवाद आपल्याकडे असलेला अनमोल ठेवा असेल,तो कायम स्मरणात ठेवा आणि आचरणात आणा.
आजचा शिशिर खूप मोलाची शिकवण देऊन गेला हे नक्की.
© सौ.कल्याणी केळकर बापट
9604947256
बडनेरा, अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈