सुश्री संध्या बेडेकर

अल्प परिचय 

पती – कर्नल. डॉ.प्रकाश बेडेकर.

शिक्षण – बी. एस सी, एम.एड

सम्प्रति –  

  • २० वर्षे अध्यापनात कार्यरत
  • १० वर्षे दिल्लीतील एका शैक्षणिक संस्थेत सिनिअर समुपदेशक म्हणून काम केले
  • ललित लेखन करते.

दोन पुस्तके – १. सहजच – मनातलं शब्दात २. मला काही बोलायचय – ही प्रकाशित झालेली आहेत.

? विविधा ?

☆ “व्यक्तिमत्व – चवदार,ठसकेदार…” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

आज दादा वहिनीला श्री.श्रीधर    कुलकर्णी यांचेकडे लग्नाचे  आमंत्रण आहे. कुलकर्णी काका  म्हणजे   आमचे चुलत घराणे.  खूप श्रीमंत.पैशाचा धबधबा पडतो की काय त्यांच्या घरी  ?? असं वाटतं.त्यातच  मुलांचीही बिझनेस मधे  मदत झाली.••• म्हणतात ना,•••• “पैसा पैशाला ओढतो.”••••

ते  काकांकडे बघून पटत. ••••

म्हंटल तर मुलं खूप शिकलेली नाही.पण पिढी  दर पिढी चालत आलेला बिझनेस मात्र उत्तम सांभाळतात. सोन्याचा चमचा तोंडांत घेऊन  जन्माला आलेली ही मुलं, आपल्या बिझनेस मधे चोख आहेत.सरस्वती खूप प्रसन्न नसली तरी लक्ष्मीने मात्र आपला वरदहस्त  त्यांच्यावर छान  ठेवलेला आहे.•••••

श्रीमंतीची सर्व लक्षणे दिसतात. मोठा बंगला, दारासमोर चार गाड्या,घरात नोकर माणसे,म्हणजे घरच्या बायकांना  साधारण बायकांसारखे काम करायची गरज पडत नाही. उठणे बसणे पण अशाच लोकांबरोबर. ••••••

पैशाचा माज  चढला आहे, असं म्हणता येणार नाही. कदाचित ते सहज बोलत असावेत, वागत असावेत. पण ते  आपल्या सारख्या सामान्य  माणसांना कुठे तरी खटकत.,मनाला  लागत. असे  आमच्या दादाचे  नेहमी म्हणणे असते. वहिनीला काही ते पटत नाही व आवडत तर त्याहुनही नाही.  ••••

मागे  दादाच्या मुलाच्या लग्नाचे आमंत्रण द्यायला दादा वहिनी त्यांच्या घरी गेले असताना, त्यांना मिळालेली वागणूक वहिनी  अजूनही  विसरलेली नाही. प्रत्त्येक भेटीची   वहीनीची काही तरी खास आठवण आहेच.  नातं असलं तरी सांपत्तिक परिस्थिती मधे तफावत आहे.   तरीही काही महत्वाच्या  कार्यक्रमात दादा वहिनी जातातच.आपलं नातं टिकवण्यासाठी, कसलाही विचार न करता हजेरी  लावतात.•••••

तेंव्हा अनघा लहान होती,ती पण आई बाबांबरोबर जायची. काही प्रसंग तिच्या बालमनावर चांगले कोरले गेले होते. घरी अलमारी भरून क्रोकरी असताना,आम्हा तिघांना वेगवेगळ्या आकाराच्या स्टील प्लेट, वाटी मधे  चिवडा दिल्याचा प्रसंग तिला आठवतो. दुर्लक्ष केलेले ही आठवते. त्यानंतरची आईची कुरकुर,वाईट वाटणे,कधी कधी  आईचे रडणे,तिच्या चांगले लक्षात होते. एकदा पूजेला गेले असताना, पूजेचे महत्व कमी व श्रीमंत लोकांचा कौतुक समारंभच  जास्त वाटत होता.वहीनी खूप खुशीने तेथे कधीच गेली नाही. ••• 

दादा ची परिस्थिती सामान्य होती. येथे लक्ष्मी नाही,पण  सरस्वती मात्र खूप प्रसन्न होती.दादाची  मुल शिक्षणात हुशार होती,म्हणून त्यांच्या शिक्षणाकरिता दादा वहिनीने  कधी काही कमी पडू दिले नाही.•••

अनघा ने ग्रॅज्युएशन नंतर  स्टेट लेवल, नॅशनल लेवल च्या परीक्षा दिल्या.’ UPSC ‘ पास केली.आज ती पोलीस खात्यात उच्च अधिकारी आहे.••••

आज कुलकर्णी काकांकडे लग्नाला जायचे आहे.अनघा म्हणाली मी पण येईन. ती अशा एका दिवसाची वाट बघतच होती.••••

अचानक तिच्या समोर फ्लॅश बॅक सुरू झाला. आईच्या डोळ्यातील अश्रु आठवले.

 “आपण नेहमी चांगले वागायचे”. असा  बाबांचा  नियम आहे. त्यामुळे नाइलाजाने आई,बाबांबरोबर जात असे.•••

अनघा रंगाने सावळी व जेमतेम उंची, म्हणून तिच्या वर तेथे  कटाक्ष व्हायचे.कसं होईल हिचे ???  ही काळजी  तिच्या आई बाबांपेक्षा त्यांनाच  जास्त होती. त्यांच्या घरी  आई बाबांकडे दुर्लक्ष करतात. ही गोष्ट तिच्या मनात घर करून बसली होती. काही दुःख सारख आपलं डोकं वर काढतात.व तुम्हाला त्याची सतत आठवण करून देत राहतात. व प्रत्त्येक आठवणीबरोबर ती सल वाढतच जाते.••••

आई बाबा  लग्नाला जायला निघाले.अनघा आॅफिस मधून  सरळ हॉलवर येणार होती.•••

तसं  अनघाला सहज सुट्टी घेता आली असती, व छान तयार होऊन लग्नाला जाता आले असते. पण  तिला काळया सावळ्या अनघाचा  ‘रूबाब ‘ दाखवायचा होता. खरं तर हे असे  वागणे तिच्या स्वभावात बसत नव्हते. पण जुन्या प्रसंगाची आठवण व आई बाबांना मिळालेली वागणूकही  ती विसरली नव्हती. आज  आई बाबांना खासकरून आईला तिची  प्रतिष्ठा मिळवून द्यायची   होती. त्यांच्या अपमानाचा बदला घ्यायचा होता. ••••

पोलिस अधिकारी च्या युनिफॉर्म मधे अनघा हॉलवर पोचली. मस्त कडक युनिफॉर्म  त्यावर   ACP rank चे लागलेले  स्टार्स, डोक्यावर लावलेली cap,हातात स्टीक, चकचकीत बूट,  कमरेवर बेल्ट.डोळयांवर काळा चष्मा. तिला आॅफिसकडून मिळालेल्या  गाडीतून अनघा आली.लगेच ड्रायव्हर ने  कारचा दरवाजा   उघडला. अदबीने बाजूला उभे राहून, एक कडक सॅलूट मारला.•••

”  व्वा !!!काय शान होती अनघाची.”

तेथील सर्व लोक बघतच राहिले. लहान मुले तर जवळ येऊन बघू लागली.अनघाचा मोबाईल कारमधेच राहिला होता, तेंव्हा ड्रायव्हर ने तो तिला आणून दिला व पुन्हा एकदा  तसाच कडक सॅलूट मारला.•••

हाॅलमधील सुंदर महागड्या पैठणी निसून, दागिन्यांनी लदलेल्या, ब्युटी पार्लर मधून सरळ हॉलवर आलेल्या so called smart, श्रीमंत बायका बघतच राहिल्या. आता आकर्षणाचा केंद्रबिंदू  पोलिस अधिकारी ‘अनघा ‘ होती.••••

श्रीधर काकां काकू,व त्यांच्या घरचे इतरही  सर्व, अनघाच्या स्वागतासाठी लगेच आले. ••••

अनघाने वेळ कमी असल्यामुळे मी सरळ आॅफिसमधूनच आले व लगेच मला जावे लागेल.  असे सांगितले.••••आज सर्वांशी भेट  होईल,  म्हणून मी आले.••••पुर्वी लहान असताना मी आई बाबांबरोबर येत असे. •••पण  या मधल्या काळात मला येणे जमलेच नाही.•••तिने सर्वांची विचारपूस केली.••• सर्वांना आनंदाने भेटली. वर वधू ला भेटली. फोटोग्राफर ने तिचे आवर्जून बरेच फोटो काढले. आपल्यामुळे वर वधू कडे दुर्लक्ष व्हायला नको, म्हणून तिने लगेच निघायचे  ठरविले •••••

लगेच अनघाच्या जेवणाची सोय झाली. तिच्या ड्रायव्हरला ही  आदराने जेवण दिल्या गेले..आई बाबा हे सर्व डोळे भरून बघत होते.आजही आईच्या डोळ्यात अश्रू आलेच. पण ते  मुलीचे कौतुक बघून, तिचा होणारा मानसन्मान बघून.••••

अनघाच्या  आई-बाबांना लग्न घरात सर्वांसमोर मान मिळाला. आईच्या मनातील सल दूर झाली होती.अनघाचा उद्देश्य पूर्ण झाला  होता,तो ही बाबांचा नियम सांभाळून,”आपण नेहमी चांगले वागावे”.  ••••

निघताना   अनघा आई बाबांना म्हणाली,••••आई-बाबा जास्त उशीर करू नका. अंधाराच्या आत घरी पोहचा. ••••

श्रीधर काकांची पंधरा वर्षांची नात ‘ राधा’ अनघा जवळ येऊन म्हणाली,ताई मला पण तुझ्या सारखे पोलिस अधिकारी बनायचे आहे. बाबा,माझा ताई बरोबर फोटो काढा ना.तो मी माझ्या स्टडी टेबल वर ठेवेन.••••

अनघा म्हणाली,••• हो का  ??

मग छान अभ्यास कर.मी तुला वेळोवेळी guidance देईन. ••••

एकंदरीत अनघाचा प्रभाव जबरदस्त होता.•••

“वक्त वक्त की बात हैं।

 वो भी एक  वक्त था ।

आज भी एक वक्त हैं।”••••

आज कुलकर्णी काकांच्या ड्रायव्हर ने आई-बाबांना घरी पोहचविले.••••

म्हणतात ना,•••

“Your greatest test is how you handle people who have mishandled you.” ••••

© सुश्री संध्या बेडेकर 

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments