सुश्री राजलक्ष्मी देशपांडे
☆ विविधा ☆ “ते” होते म्हणून – “निवेदिता” भाग-3 ☆ सुश्री राजलक्ष्मी देशपांडे ☆
सिंध प्रांतात जन्मलेले पाकिस्तानी नागरिक पण मनानं, विचारानं पक्के भारतीय असणारे “तारिक फतेह” यांची मुलाखत बघत होते. एके ठिकाणी ते म्हणाले, “आपली संस्कृती केवढी महान आहे याची जाणीव भारतीयांनाच नसेल, तर दुसरा कुणी काय इलाज करणार यावर?”
हे ऐकून मला भगिनी निवेदितांची आठवण आली. मूळच्या आयरिश, पण इंग्लंडमध्ये स्थायिक झालेल्या नोबल कुटुंबातील मुलगी “मार्गारेट नोबल” विवेकानंदांची व्याख्यानं ऐकून त्यांच्या कार्यात सहभागी व्हायला भारतात आली आणि “भगिनी निवेदिता” झाली हे बहुधा सगळ्यांना माहीत असतं. पण त्यांच्या कार्याची व्याप्ती इतिहासाचं पाठ्यपुस्तक आपल्याला सांगत नाही. निवेदता मुळात एका शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या त्यामुळे भारतात त्यांनी विवेकानंदांच्या सांगण्यावरून प्रथम मुलींसाठी शाळा सुरू केली. स्त्रीशिक्षणाचं हे कार्य अवघडच होतं आणि निराशा पदरात टाकणारं. पण त्यांनी ते मोठ्या उत्साहाने केले.. वाढवले. कलकत्त्यात प्लेगची साथ आली तेव्हा त्यांनी “Do’s” and “Don’t s” चे पोस्टर्स बंगालीत ठिकठिकाणी लावले. घरोघरी जाऊन, रस्त्यावर स्वतः स्वच्छता केली, औषधफवारणी केली. वाड्यावस्त्यांमधून हिंडून लोकांची शुश्रुषा केली.
सशस्त्र क्रांतीकारकांच्या त्या आश्रयस्थान होत्या; ज्या क्रांतीकारकांमधे विवेकानंदांचे भाऊही होते. त्या काळी नुकत्याच सुरू झालेल्या “रामकृष्ण मिशन” ला सरकारचा रोष ओढवून घेणं परवडणारं नव्हतं कारण कार्य थांबून चालणार नव्हतं. म्हणून रामकृष्ण मिशन ने अधिकृतपणे निवेदितांचा मिशनशी काही संबंध नाही असं पत्रक काढलं. पण मिशनच्या संन्यस्त कार्यकर्त्यांनी त्यांना व्यक्तिगत आयुष्यात सदैव साथच दिली आणि निवेदितांनी विवेकानंदांच्या आईला अखेरपर्यंत सांभाळले.
त्यांना चित्रकलेची उत्तम जाण होती. अनेक नामवंत चित्रकार त्यांना मानत. निवेदितांचा सदैव आग्रह असे, की भारतीय कलाकारांनी आपलं भारतीयत्व सोडू नये. मग ती कला चित्रकला असो, संगीत असो, साहित्य असो…. या सर्व क्षेत्रात भारतीय संस्कृती इतकी समृद्ध आणि विविधतेने नटलेली आहे, की इतरांचं अनुकरण करण्याची भारतीयांना गरज नाही. फक्त कलाकारांनी नव्हे, तर एकूणच भारतीयांनी आपली संस्कृती सोडू नये. पाश्चिमात्यांचं आंधळं अनुकरण करू नये हा त्यांचा आग्रह होता. चित्रकलेच्या क्षेत्रातलं त्यांचं योगदान मोठं होतं. (प्रत्यक्ष चित्रांच्या स्वरुपात नाही.. तर अनेक नामवंत चित्रकारांना केलेल्या मार्गदर्शनाच्या स्वरूपात)
इंग्लंडच्या पार्लमेंटमधे भारताबद्दल माहिती देऊन इंग्रजांकडून त्याच्यावर अन्याय होतोय हे निवेदितांच्या व्याख्यानांमुळंच लोकांना कळलं.
आयुष्याच्या संध्याकाळी त्या काहीशा एकट्या पडलेल्या होत्या. अंतकाळचे त्यांचे शब्द होते, “बोट बुडतेय.. पण मला सूर्योदय होताना दिसतोय”
भारताला स्वातंत्र्य मिळालं.. पण भारतीयांमध्ये स्वत:च्या संस्कृतीबद्दल अभिमान असावा हे त्यांचं पोटतिडकीने सांगणं कितपत यशस्वी झालं…. कुणास ठाऊक!
कारण संस्कृती म्हणजे फक्त नऊवारी साडी आणि नथ किंवा धोतर नव्हे.. देवदेवतांसाठी किंवा महापुरुषांसाठी, सणवारांच्या निमित्ताने काढलेल्या उन्मादी रॅल्या नव्हेत.. जी पिढ्यानपिढ्या रक्तातून सळसळते आणि विचार, विवेकाच्या काठांमधून वाहते ती संस्कृती निवेदितांना अभिप्रेत होती.
काही वर्षांपूर्वी कोलकत्याला गेले, तेव्हा पूर्ण शहरात निवेदितांच्या खुणा शोधण्याचा निष्फळ प्रयत्न केला. कालौघात हे शहर, हा देश त्यांना विसरणं स्वाभाविकच आहे… हे समजून घेतोच की आपण! मीही घेतलं.
© सुश्री राजलक्ष्मी देशपांडे
मो – 7499729209
(लेखात व्यक्त केलेली मते लेखकाची वैयक्तिक मत आहेत.)
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
सुंदर अभिव्यक्ति