सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ 🌹 रोझ डे 🌹 ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

कोणत्याही दोन पिढ्यांमध्ये उत्सव साजरा करण्याच्या पद्धतीत फरक हा आपोआपच पडत जातो. त्यालाच आपण “जनरेशन गँप”असं म्हणतो. प्रत्येक पिढीतील लोकांना आपल्या पुढील पिढी जास्त सुखी, स्वतंत्र आहे असं वाटतं असतं.प्रत्येक व्यक्तीचे आपल्या स्वतःच्या पिढीला खूप सोसावं लागलं हे ठाम मतं असतं.आपल्याला पुढील पिढीपेक्षा खूप जास्त तडजोडी कराव्या लागतात असं प्रत्येकालाच वाटतं असतं हे विशेष.

ह्या निमीत्ताने तीन पिढ्यांमधील फरक मात्र स्पष्टपणे जाणवतो.आपल्या आधीची पिढी  स्पष्टवक्ती आणि जरा फटकळच. त्या पिढीतील लोकं तोंडावर सांगून मोकळे होतात त्यामुळे त्यांच्या पचनी हा “रोझडे”.वगैरे अजीबातच पडत नाही. आमची पिढी ही तळ्यातमळ्यात करणारी पिढी, ना घरका न घाटका म्हणू शकता. संपूर्णपणे विरोधही नाही ह्याला आणि सरसावून साजरा करण्याइतकं धैर्य, स्वतः चे भ मत झडझडून सांगण्याइतका मोकळेपणाही नाही. आणि ह्या उलट आत्ताची पिढी हा उत्सव साजरा करतांना आधीच्या दोन पिढ्यांच्या मतांशी काहीच देणंघेणं नसलेली पिढी.

फेब्रुवारी महिन्याची सुरवातच मुळी कडाक्याची थंडी संपलेली असते आणि उन्हाळ्याची काहीली अद्याप सुरवात झालेली नसते ,असा तो हा हवाहवासा, गुलाबी, प्लिझंट वाटणारा काळ.त्यातच फेब्रुवारी सात पासून ते चौदा फेब्रुवारी पर्यंत व्हँलेंटाईन वीक,प्रेमाचा साक्षात्कारी सप्ताह, व्हँलेंटाईन बाबाचा उत्सवच जणू.त्यामुळे हा आठवडा नव्या तरुणाई साठी वा कायम मनाने तरुणाई जपून असणाऱ्या व्यक्तींसाठी पर्वणीच.

अर्थातच हा आठवडा समारंभ म्हणून साजरा करण्याबाबत दुमत हे असतंच. काही मंडळी अगदी ह्याच्या विरुद्ध असतात तर काही मंडळी हा उत्सव  साजरा करण्यासाठी जिवाचा आटापिटा करणारी. अर्थातच प्रेमाला कुणाचाच विरोध नसतो, विरोध असतो तो साजरा करण्याच्या पद्धतीबाबत.थोडक्यात हा उत्सव म्हणजे इंग्रजी वा विलायती वासंतिक उत्सव.

ह्या आठवड्यातील पहिला दिवस म्हणजे “रोझ डे”. पिढीपिढीत खूप झपाट्याने फरक पडत चाललाय.आमच्या पिढीपर्यंत तरी काँलेजमधे वा तरुणपणात मुलंमुली एकमेकांशी बोलले तर नक्कीच काहीतरी शिजतयं हे समजण्याचा काळ.त्यामुळे हे व्हँलेंटाईन वगैरे तर आमच्या कल्पनेच्या पार पलीकडले.त्यामुळे ह्या रोझ डे ची संकल्पनाच मुळी प्रत्येक पिढीत वेगळी. देवपूजेसाठी का होईना पण आजोबा परडी भरून गुलाबाची फुलं तोडून आणतं हाच आजीचा रोजचा रोझ डे. एखादं झाडावरचं फूल हळूच बाबा फ्लावर पाँटमध्ये वा टेबलवर ठेवायचे,अर्थातच बाकी कुणाला नाही कळले तरी आईला फक्त कळायचे किंवा कुणी झाडावरचे फूल तोडून नेईल म्हणून वा गुलकंदासाठी आणलीयं फुलं असं दाखवायचे तोच आईचा रोझ डे. पुढे खूपच हिम्मत असली तरी काँलेजमध्ये ती यायच्या आत तिच्या बेंचवर गुलाबाचे फूल वा फुलाचे ग्रिटींग कार्ड लपून ठेवून जायचे हा आमच्या पिढीचा रोझ डे किंवा जास्तीत जास्त एखादा गुलाब हस्तेपरहस्ते तिच्यापर्यंत पोहोचविणारा आमच्या पिढीचा रोझ डे आणि गुलाबाचा वापर केवळ बुके आणि रोझ डे साठीच हा विचार मानणारी आणि तो बुके बेधडक देणारी आणि घेणारी सुद्धा हल्लीची ही बिनधास्त, धीट आजची पिढी.

ह्या आठवड्यातील सात फेब्रुवारी हा पहिला दिवस,” रोझ डे “.हा दिवस ह्या पिढीतील तरुणाईच्या जगतातील महत्त्वाचा दिवस तर आधीच्या पिढीच्या मते दिखाऊ प्रेम दर्शविणारी नसती थेऱ असल्याचा दिवस.

जर रोझ डे साजरा करण्याची संकल्पना सरसकट आपल्यात असती तर वेगवेगळ्या वयोगटातील, पिढीतील लोकांच्या मनात रोझ डे बद्दलचे निरनिराळे विचार काय असते वा आजच्या भाषेत हा “इव्हेंट”आपण कसा साजरा केला असता ह्या कल्पनाविलासाची एक झलक पुढीलप्रमाणे.

1…..शाळकरी रोझ डे

गुलाब दिला किंवा मिळाला तरच खूप प्रेम असतं हे मानण्याचं हे अल्लड वयं.

2…..महाविद्यालयीन रोझ डे

जगातील सगळ्यात चांगले आणि खरे प्रेम आपल्याच वाट्याला आले, त्याच्याकडूनच गुलाब मिळाला वा त्यालाच गुलाब दिला असं मानणारं हे वयं आणि प्रेम.

3…..नवविवाहितांचा रोझ डे

गुलाब आणला नाही तर फुरगटून बसायचे आणि आणला तर ह्याची चांगली प्रँक्टीस आहे वाटतं ,हे ओळखणारं प्रेम.

4…..चाळीशीतील रोझ डे

गुलाब आणल्यानंतर वरवर हे आपलं वय राहिलं का असे म्हणणारे पण मनातून,आतून मात्र खूप सुखावणारे प्रेम.

5…..पन्नाशीतील रोझ डे

आणलेला गुलाब बघून ,बरं झालं देवाला वहायला फूल झालं हे मानणारं वयं वा प्रेमं.

6…..साठीतील रोझ डे

त्या गुलाबाच्या थेरापेक्षा जर्रा बर वागायला लागा,मग रोझ डे पावेल हे मानणारं वयं वा प्रेम.

7…..सत्तरीतील रोझ डे

नुसत्या नजरेतूनच गुलाबजल छिडकून ख-या गुलाबाची गरजही न भासणारं हे वयं किंवा प्रेम.

8…..नंतरचा शेवटपर्यंतचा रोझ डे

आता च्यवनप्राश आणि त्याबरोबर ह्या गुलाबाचा गुलकंद करुन खायला घातला पाहिजे, जरातरी डोकं थंड राहायला मदतच होईल हे मानणारं वयं आणि प्रेम.

तर अशा ह्या व्हँलेंटाईन वीकमधील पहिल्या दिवसाच्या रोझ डे ला भरभरून शुभेच्छा आणि प्रत्येकाच्या आयुष्यात रोजच”रोझ डे”फुलावा ही सदिच्छा.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments