श्री कौस्तुभ सुधाकर परांजपे
अल्प परिचय
एका कंपनीत ३० वर्षे काम केल्यानंतर असीस्टंट मॅनेजर या पदावरून स्वेच्छानिवृत्ती.
शिक्षण – एम,काॅम पर्यंत.
विरंगुळा म्हणून लिहीणे. आज पर्यंत जवळपास ३५० हून अधिक पोस्ट.
दै. लोकमत, तरुण भारत जळगाव यात काही प्रकाशित. तसेच काही पोस्ट ऑडीओ बुक वर देखील घेतल्या होत्या.
विविधा
☆ “बोलणे…” ☆ श्री कौस्तुभ सुधाकर परांजपे ☆
नुकत्याच झालेल्या वर्धा येथील अ.भा.साहित्य संमेलनात सादर केलेली कविता:
बोलणे….कौस्तुभ परांजपे.
बोलणे……
बोलण्याबद्दल लिहिणे यातच एक गंमत आहे. किती प्रकारचे बोलणे असते….
बोबडे, गोड, लाडात, रागावून, गुळमुळीत, स्पष्ट, चांगले, वाईट, हळू, जोरात, कानात बोलणे इ… यातही बोलणे पण पाठीमागे बोलणे यावर बरेच बोलणे होत असावे. अशा या बोलण्यातल्या विविधता जवळपास प्रत्येकात आहेत.
आपले वय, अनुभव, अधिकार, जबाबदारी, प्रसंग, काळ या बरोबर बऱ्याचदा बोलणेही बदलते.
बोलण्या बाबत काहिंचा हातखंडा असतो. म्हणजे त्यांना फक्त बोलण्यासाठीच बोलावले जाते. आणि ते ऐकण्यासाठी लोक उत्सुक असतात. तर काहिंना आता गप्प बसायचं काय घेशील? असेही प्रेमाने विचारतात.
बोलणाऱ्याचा अभ्यास किती? यावरून देखील लोक बोलणाऱ्याची किंमत करत असतात. काय बोलतोय हे लक्ष देऊन ऐक, असे सांगतात. तर काही वेळा त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. असेही बोलून दाखवतात. काही बोलणे कानावर येते, तर काही आपण मनावर घेतो.
काहिंच्या बोलण्या बद्दल लिहिले जाते, तर काहिंच्या लिहिण्याबद्दल बोलले जाते. बोलण्याने माणसे जवळ येतात, तशीच लांब देखील जातात. प्रेम आणि कटुता, आपलेपणा आणि परकेपणा बोलण्यातून जाणवतो.
राग, द्वेश, अहंकार, प्रेम, गर्व, अभिमान, कौतुक, भावना या गोष्टी वागण्या बरोबरच बोलण्यातून जाणवतात. बोलण्यात स्वाभिमान असतो, तसेच बोलण्यात नम्रता, ताठरपणा देखील असते. बोलतांना नकळत माणसाचे अंतरंग जाणवतात.
बोबडे बोलण्याच्या कौतुकापासून, आजकाल वयोमानाने त्यांचे बोलणे नीट समजत नाही या सगळ्या अवस्थेत आपण वेगवेगळ्या पध्दतीने बोलत असतो. काही बोलून मोकळे होतात, तर काही मोकळेपणाने बोलत असतात. बऱ्याचदा कुणी आपल्याशी बोलावं किंवा आपल्या बद्दल (चांगले) बोलावं अशी इच्छा असते.
बोलण्यात ताकद आहे, “बोलणाऱ्याची माती देखील विकली जाते.” असे म्हणतात. त्याच बरोबर “बोले तैसा चाले…” असेही म्हणतात. “लेकी बोले सुने…”, किंवा “बोलायची कढी…” हे देखील सर्वश्रुत आहे. “तिळगुळ घ्या… गोड बोला… ” असे सांगत आम्ही सण देखील साजरे करतो.
बोलता बोलता बऱ्याचशा गोष्टी समजतात. तर बऱ्याच गोष्टी बोलता बोलता करायच्या राहून जातात.
काही (राजकारणी) नुसतेच बोलत असतात. तर काही बोलण्यातून राज आणि कारण दोन्ही शोधत असतात.
काही मोजके, मुद्याचे, नेमके, आणि वेळेवर बोलतात. तर काहींना मुद्यावर या, नमनाला घडाभर तेल कशाला? असे सांगावे लागते.
काही वेळा घरातील अबोला देखील बरेच काही बोलून जातो. नुसत्या डोळ्यांच्या हालचालीने देखील काय बोलायचे आहे याचा अंदाज येतो.
पण बोलणे हे होते आणि लागतेच. काही वेळा मंडळी ठरवून एकत्र येऊन बोलणी करतात. तर काही वेळा बोलणी ऐकून घ्यायला लागतात.
मोठ्यांना बोलण्याचा अधिकार असतो. तर लहान तोंडी मोठा घास हे देखील बोलण्याबाबतच असते.
असो, लिहिता लिहिता मनातले बरेच बोलून गेलो. मनातलं बोलण्यासाठी काही खास माणसं असतात. तर काही खास माणसं मनातलं बरोबर ओळखतात.
© श्री कौस्तुभ परांजपे
जळगाव-महाराष्ट्र
मो 9579032601
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈