सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “सरप्राईज ट्रीप…”  ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

एकदा का आपल्या मनाने आस्तिकता स्विकारली की आपली प्रत्येक देवदेवतांवर श्रद्धा ही बसतेच. कुठलीही मुर्ती, फोटो दिसला की आपण आपोआपच नमस्कार करतो. कुठलाही प्रसाद मिळाला की तो लगेच डोळे मिटून भक्तीभावाने ग्रहण करतो. कुठल्याही देवाचा अंगारा कपाळाला लावतो,पण जेव्हा कधी आणीबाणीची परिस्थिती येते, संकटाचा सामना करायचा असत़ो, काही निर्णायक प्रसंग समोर उभे ठाकले असतात, किंवा अतीव सुखाची अचानक अनुभूती झालेली असते तेव्हा मात्र हटकून आपल्या डोळ्यासमोर आपलं परम दैवतच येतं,कठीण प्रसंगी आपण जास्तीत जास्त त्याचाच धावा करतो वा अतीव सुखाचे क्षण उपभोगतांना क्षणोक्षणी त्या परम दैवताचीच आठवण करतो.

अर्थातच आपली प्रत्येकाची श्रद्धास्थान ही वेगवेगळी असू शकतात. कारण ह्या श्रद्धेचा संबंध थेट आपल्या मनाशी जोडल्या गेलेला असतो. आपलं परम दैवतं हे आपण अनुभवांनी घरात नित्य बघितल्याने, मनापासून निवडलेलं असतं. काल महाशिवरात्र झाली. माझंही परम दैवत शिवशंभो महादेव. त्यावरून ब-याच आठवणी जाग्या झाल्यात, गाठीशी आलेल्या अनुभवांच्या पुरचुंडीची गाठ जरा सैलसर झाली

महाशिवरात्री ला बँकेला सुट्टी असते त्यामुळे जरा निवांतपणा. ह्या दिवशी दोन्ही वेळी उपास असतो. त्यामुळे फराळाला लागणारी निम्मी तयारी ही अधल्या दिवशी करता येते, नव्हे ती तशी करुन ठेवणचं जास्त सोयीचं पडतं.

तसं तर नेहमीच देवळात वा मंदिरात सकारात्मक उर्जा तेवत असते. शांत व पवित्र वातावरणामुळे मन पण प्रसन्न राहातं. काही विशिष्ट दिवस हे त्या दैवताच्या पूजेसाठी खास असतात अशी आपल्या मनाची धारणा असते. हे दिवस सुखद भावनिकदृष्ट्या आपल्याला पाठबळं देतात. आपल्याला ज्या देवाची ओढ असते,ज्याच्यावर आपली मनापासून भक्ती असते,ज्याचा दर्शनासाठी आपल्याला नित्य जावसं वाटतं तेच आपलं परमं दैवतं असतं.

मागील महाशिवरात्रीला लिहीलेल्या पोस्ट मध्ये मी यवतमाळ व अमरावती मधील प्राचीन जागृत शिवमंदारांबद्दल लिहीले होते. माझे स्वतःचे परमदैवत शिवशंभू महादेव तर आमच्या “अहों”चे परमदैवत प्रभू श्रीरामचंद्र. ज्या नवराबायकोंच्या आवडीनिवडी ह्या विरुद्ध असतात ते “काँमन नवराबायको”. आणि विरुद्ध आवडीनिवडी असून सुद्धा जे परस्परांच्या आवडींचा मान ठेवतात, आदर करतात ते “स्पेशल नवराबायको”. त्यामुळे माझ्या शिवभक्तीचा आदर करीत आठ दहा वर्षांपूर्वी “अहोंनी” मला सरप्राईज ट्रीप म्हणून सोरटीसोमनाथ येथील महादेवाचे दर्शन घडविले तो क्षण माझ्यासाठी अमुल्य क्षणांपैकी एक होता. गुजरात मध्ये एका कौटुंबिक कार्यक्रम साठी जायचे असल्याने त्यांनी ह्या ट्रीप चे नियोजन केले होते.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे सोरटीसोमनाथ. पुराणात या मंदिराच्या अनुषंगाने एक कथा आहे. चंद्राचे सोम असे नाव होते. तो दक्षाचा जावई होता. एकदा त्यांनी दक्षाची अवहेलना केली. त्यामुळे राग येऊन दक्षाने त्यांचा प्रकाश दिवसादिवसाने कमी होत जाईल असा शाप दिला. अन्य देवतांनी दक्षाला उःशाप देण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी सरस्वती नदी समुद्राला जिथे मिळते, तेथे स्नान केल्यास या शापाचा परिणाम रहाणार नाही, असे सांगितले. त्यानंतर सोमाने सौराष्ट्रातील या ठिकाणी येऊन येथे स्नान केले आणि भगवान शिवाची आराधना केली. शंकर येथे प्रकट झाले आणि त्यांनी त्याचा उद्धार केला. त्यामुळे हे स्थान सोमनाथ या नावाने प्रसिद्ध झाले.

समुद्रकिनारी वसलेल्या ह्या मंदिरामध्ये खूप प्रमाणात सकारात्मक ऊर्जा, प्रसन्न वातावरण ,अद्भुत शांती आपल्याला अनुभवायला मिळते हा माझा स्वानुभव. तेथे देवळाच्या कंपाऊंड वाँलपर समुद्राच्या महाकाय लाटा आदळतात आणि जणू ह्या लाटांचे रुप बघून मनात,संसारात असलेल्या छोट्या छोट्या लाटा अवघ्या काही मिनिटात विरुनच जातात जणू.खूप जास्त माझ्या आवडीच्या ठिकाणां पैकी हे एक ठिकाण. तेथेच अहिल्याबाई होळकर ह्यांनी जिर्णोध्दार केलेलं अजून एक शिवमंदिराच्या दर्शनाचा अभूतपूर्व योग आला.

ह्या महाशिवरात्रीच्या पर्वावर जुनी आठवण परत एकदा जागी झाली. ह्यासाठीच कदाचित सणसमारंभ, उत्सव असावेत असं वाटतं.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments