सौ कल्याणी केळकर बापट
विविधा
☆ “काम छोटं, महत्व मोठं…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆
सरासरी बघता माणूस आपापल्या क्षेत्रात दिवसभर काबाडकष्ट करीत असतो, मग कधी तो आपल्या दैनंदिन गरजा भागेल इतपत कमावतो तर कधी थोडंफार पुरुन उरेल इतकं. अगदी बोटावर मोजण्याइतक्या व्यक्ती ह्या भरघोस कमावतात अगदी पोटभर पुरुन त्याहूनही कितीतरी पट जास्त उरेल इतकं.
वेगवेगळ्या व्यक्तींच्या कमाईत फरक असला तरी एक गोष्ट मात्र काँमन असते,ती म्हणजे हे कमवायला माणसाला भरपूर कष्ट मात्र घ्यावेच लागतात. कष्ट, मेहनत ह्या गोष्टी म्हणजे जसं अन्नामध्ये मिठाचं महत्त्व असतं तसं जीवनात ह्याचं महत्त्व. आणि ह्याच अपार कष्टानंतर खायला कोंडा आणि उशाला धोंडा असेल तरी निद्रादेवी मात्र कायम प्रसन्न असते.
प्रत्येक व्यक्ती ही भरपूर कामं करीत असली तरी प्रत्येक व्यक्तीच्या कामाकामांत फरक हा असतोच.त्याच्या काम करण्याच्या पद्धती, काम करण्याचा कालावधी, कामाचा दर्जा ह्यामध्ये विवीधता ही आढळतेच. काही व्यक्ती प्रचंड कष्ट, कामे करतात पण त्यांच्या कामात निगुती नसते तर काहींच कामं हे अतिशय मोजकं असतं पण त्यांनी केलं की दुसऱ्या ला परत त्या कामाकडे वळून बघावं लागतं नाही इतकं ते परिपूर्ण असतं. काही व्यक्ती ह्या घरातील कामांमध्ये तरबेज तर काही घराबाहेरील कक्षेत असलेल्या कामांमध्ये पटाईत.
ह्या कामाबद्दलची एक छोटीशी पण मस्त पोस्ट वाचनात आली. कालनिर्णय ह्या दिनदर्शिकेच्या मागील पानावर छापलेली आहे. “छोट्या कामांच मोठ महत्त्व” असं शिर्षक असलेली . एक मस्त वाचनीय पोस्ट.
काम हे सुद्धा आपण बघूनबघून अनुभवातून शिकतो.चांगल,उत्कृष्ट कामाची नोंद आपला प्रत्येकाचा मेंदू ताबडतोब घेत असतोच,प्रश्न असतो तो आपल्या स्वतः च्या आळसामुळे त्यावर अंमलबजावणी न करण्याचा. असो
कामाचा उरकं, शाळेत एकही लेटमार्क न होऊ देता सातत्याने कितीतरी वर्षे चारीठाव स्वयंपाक माझी आई सकाळी चारला उठून रांधायची.हे.सगळं आठवून खरंच आता समज आल्यावर आईच खूप कौतुक वाटतं. आमच्या अहो आईंकडुन कुठलही काम कस शेवटापर्यंत व्यवस्थित करता येतं हे बघतं आलेयं. बहीणी कडून ,नणंदे कडून कामाचा झपाटा बघत आलेयं.माझी बहीण तर आताची कमलाबाई ओगलेच जणू.कुठलाही पदार्थ चवीला तसेच दिसायला आणि आरोग्यासाठी सर्वोत्तम ह्यात तिचा हातखंडा. बरेचदा आपण आपल्या कामाच्या ठिकाणी वा आजुबाजुला वावरणाऱ्या व्यवस्थित काम करणाऱ्या लोकांना आपोआप आपल्या निरीक्षणशक्तीने नजरेत टिपतो आणि मनोमन त्यांचं कौतुक ही वाटतं.
त्या कालनिर्णय मधील एक गोष्ट खूप भावली आणि पटली सुद्धा. त्यात सांगितलयं आपण सकाळी प्रथम उठल्याबरोबर जे पहिलं काम करतो,ते म्हणजे बिछान्यातून उठून तो आवरणे ,हे काम जर सर्वोत्तम निगुतीने जमलं तर दिवसभरातील सगळी कामं आपल्याकडून सकारात्मक भावाने सर्वोत्कृष्टच केल्या जातात. त्यामुळे उठल्याबरोबर प्रत्येकाने आपला बिछाना खूप छान,निटनेटका आवरून हा ठेवलाच पाहिजे. अर्थातच हा नियम काही व्यक्ती ह्या पाळतच असतील म्हणा. पण जे पाळत नसतील त्यांनी हा नियम तयार करुन त्याची काटेकोर अंमलबजावणी केल्यास खूप चांगला सकारात्मक फरक आपल्या आयुष्यात पडेल.
© सौ.कल्याणी केळकर बापट
9604947256
बडनेरा, अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈