सुश्री राजलक्ष्मी देशपांडे
☆ विविधा ☆ “ते” होते म्हणून – भाग-4 ☆ सुश्री राजलक्ष्मी देशपांडे ☆
पुण्यापासून जवळच केडगाव आहे. तिथली नारायण महाराजांची सोन्याची दत्तमूर्ती Bank of Maharashtra मधे असते आणि वर्षातून एकदा दर्शनासाठी बाहेर काढली जाते. महाराजांचं सोन्याचं सिंहासन होतं. संन्यस्त असून हे ऐश्र्वर्य असल्याने नारायण महाराज उगाचच गैरसमजाच्या धुक्यात होते. पण त्यांच्या कार्यामागचा अर्थ वडिलांनी समजाऊन सांगितलेला… सहज शेअर करावासा वाटतो.
तसे घरातून माझ्यावर सर्वधर्मसमभावाचे संस्कार झालेले. म्हणजे घरी पारंपरिक सणवार, पूजाअर्चा, स्तोत्रपठण आणि गीतापाठांतर असेच वातावरण असले तरी मशीद आणि चर्चची ओळख आवर्जून करून दिली होती वडिलांनी. सगळ्याच लोकांना आणि चक्क मार्क्सवादी लोकांनाही आमचं घर “आपलं” वाटायचं कारण साऱ्या विचारांचा स्वीकार व्हायचा.
तरीही धर्म हा विषय समाजजीवनावर परिणाम करतोच. केडगावात तेच होत होतं. मिशनरी लोक गरीब लोकांना फक्त खायला द्यायचे आणि धर्मांतर करायचे. पंडिता रमाबाईंचं मिशनही कडेगावातच आहे. अर्थात तिथे आश्रयाला येणाऱ्या स्त्रियांवर धर्मांतराची सक्ती नसे… पण स्वतः रमाबाईंनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता.
पुन्हा दयानंदांच्या वेळचाच मुद्दा इथेही लक्षात घ्यायला पाहिजे. एक विचार केवळ धाकानं किंवा पैशानं का नष्ट करायचा? शिवाय राजकीय विषयही होताच हा. ब्रिटिशांचा धर्म स्वीकारला की त्यांची गुलामी बोचणारच नाही. मग देशाचं आर्थिक शोषण, आत्मविश्वास संपणं सगळं आलंच….यासाठी भुकेमुळं होणारं धर्मपरिवर्तन थांबवणं गरजेचं होतं. हिंदुस्थानच्या धार्मिक बाबीत ढवळाढवळ करणार नाही अशी राणीची पॉलिसी होती. म्हणून नारायण महाराजांनी एकशेआठ सत्यनारायण रोज करण्याची पद्धत सुरू केली. त्यासाठी खास रेल्वेच्या वॅगन मधून तुळशी यायच्या. प्रसाद म्हणून मोठे वाडगे भरून प्रसाद सगळ्यांना द्यायचे. गोरगरीबांना साजूक तुपाचा उत्तम शिरा पोट भरून दिला जायचा. एकच माणूस पुन्हा आला तरी त्याला पुन्हा दिला जायचा. या एका गोष्टीमुळे भुकेपोटी होणारं धर्मपरिवर्तन थांबलं. आपलं कार्य संपल्यावर सगळं ऐश्र्वर्य सोडून एका वस्त्रानिशी अवघ्या बत्तीसाव्या वर्षी नारायण महाराज केडगावहून निघून गेले आणि बंगलोर इथे राहून शेवटी त्यांनी देह ठेवला.
“नामस्मरण करून आनंदात राहावे” हा त्यांचा एकमेव उपदेश आहे.
नामस्मरण करावं हे ठीक आहे.. पण आनंदात राहावे हे तितकेच महत्त्वाचे आहे ना.. आनंदी राहण्यासाठी मनाला केवढी शिस्त हवी! एवढ्यातेवढ्याने रागवायचे नाही, कुणाचा हेवा करायचा नाही, कशाचा लोभ धरायचा नाही, निंदेला घाबरायचं नाही, समाधानी राहायचं तर आनंदात राहता येईल. थोडक्यात इतका स्वत:चा विकास विवेकानं करता आला तरच आनंद मिळणार. हा एवढा अर्थ भरला आहे या छोट्या वाक्यात.
श्रावणात घरोघरी सत्यनारायण पूजा सुरू झाल्या की मला केडगावच्या नारायण महाराजांची आठवण येते.
© सुश्री राजलक्ष्मी देशपांडे
मो – 7499729209
(लेखात व्यक्त केलेली मते लेखकाची वैयक्तिक मत आहेत.)
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
सुरेख लेख…नारायण महाराजांना विनम्र अभिवादन ?