श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “क…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

एखाद्या व्यक्तीबद्दल सहज बोलतांना आपण कधीकधी म्हणतो, तो चांगला आहे, पण…….. या पण नंतर सगळे वाईटच असते असे नाही. पण त्यामुळे संमीश्र भावना मनात येतात.

एखाद्या अक्षरा पासून तयार होणाऱ्या शब्दांबद्दल अशाच भावना मनात येतात का?……..

कसं काय ते सांगता येणार नाही, पण क या अक्षरा पासून सुरू होणाऱ्या शब्दांसाठी  मनात अशा संमीश्र भावना येतात. हा माझा बालीशपणा असेल. (हो बालीशपणा, कारण सगळे मनातल्या भावना शब्दात उतरवतात, माझ्या मनात मात्र शब्दांमुळे संमीश्र भावना येतात.) यांचे कारण त्यात प्रश्न, निषेध, राग,  तीरकसपणा, वाईटपणा, नाराजी बरोबरच चांगलेपणा देखील बरोबरीने जाणवतो.         

आपल्याला पडणारे किंवा विचारले गेलेले बरेचसे प्रश्न हे क पासूनच सुरु होतात. आणि त्याच बाराखडीतले (कुटुंबातील) असतात असे वाटले. जसे…..

क – कधी? कसे? कशाला? कशासाठी? कळेल का?

का – का? काय? कारण काय? काय करशील?

कि की – किंमत किती? किंमत आहे का? किती वेळा? किती?

कु कू – कुठे?

के – केव्हा?

को – कोण? कोणी? कोणाला? कोण आहे? कोणासाठी? कोणी सांगितले? कोण म्हणतो? कोण समजतो?

असे बरेच प्रश्न क पासूनच सुरु होतात. इतकेच नाही तर वाईट अर्थाने, किंवा नाराजीने वापरले जाणारे क पासून सुरू होणारे बरेच शब्द आढळतील.

काळा पैसा, काळा धंदा, कट कारस्थान, कारावास, करणी, कुरापत, कुख्यात, कावेबाज, कळलाव्या.

एखाद्या गोष्टीकडे मुद्दाम लक्ष दिले नाही तरी कानाडोळा केला असे म्हणतात.

“स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, पण दुसऱ्याच्या डोळ्यातंल कुसळ दिसतं.” हा कुसळ देखील चांगल्या अर्थाने वापरलेला नसतो.

निरर्थक गप्पा मारल्या तरी म्हणतात “बसले असतील कुटाळक्या करत.”

नको त्या वेळी कोणी आलं तरी म्हणतो “कोण कडमडलं आता.”

कोणाचा संसार मोडू नये असे वाटते. पण तसे झाले तरी काडीमोड झाला असे म्हणतात.

अती शुल्लक गोष्टीला कवडीमोल म्हणतो. तर अबोला धरल्यास देखील कट्टी झाली असे म्हणतो.

नाराजीच्या अथवा विरोधाच्या सुरात हळूच बोललं तरी कुरकुर नकोय, कटकट नकोय असे म्हणतात.

त्रासदायक वाटणारी, खोड्या, मस्ती, दंगा करणारी लहान मुले कौरवसेना म्हणून ओळखली जाते. तर माणूस कंसमामा म्हणून.

अपरिपक्व असेल तर कच्चा आहे असे म्हणतो. पण ताजा आणि हवासा असतो तो कोवळा.

बरं वाटतं नसले, चांगले दिसत नसले तरी म्हणतो कसंतरी होतय, किंवा कसंतरीच दिसतंय. हिंमत हरली तरी कच खाल्ली असे म्हणतो. घर झाडण्यापूर्वी पायाला जाणवते ती कचकच. आणि टाकायचा असतो तो कचरा. आणि टाकतो (कचरा) कुंडीत.

वाइटाशी वाइट वागून काम साध्य करायचे असेल तर, “काट्याने काटा काढायचा.” (सगळेच शब्द क पासून सुरू होणारे.)

निषेध नोंदवण्यासाठी रंग सुध्दा काळा.  वाइट घटना घडली तरी काळा दिवस, काळी रात्र असे म्हणतो.

अर्जुनाला पडलेले अनेक प्रश्न आणि झालेले युद्ध ते ठिकाण देखील कुरुक्षेत्रच. पण उत्तर देणारे मात्र कृष्ण.

पण सगळेच क पासून सुरू होणारे शब्द प्रश्न निर्माण करणारे आणि नकारात्मकच आहेत असे नाही.

सकाळी उठतानांच “कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती. कर मुले……….” म्हणतात.

नमस्कार करतांना कर जोडावे लागतात.  देवालयाचा कळस पवित्र भावना जागवतो. धार्मिक विधीसाठी कद नेसावा लागतो. पहाटे होणारी आरती काकड आरती असते. तसेच किर्तन देखील असते. काशी, केदारनाथ, करवीर (कोल्हापूर) पवित्र स्थान. तर काश्मीर, कोकण, केरळ निसर्गाने नटलेले. कन्याकुमारीचे आकर्षण वेगळेच.

वस्तू आणि स्थळ नाहीत. तर माणसांमध्ये देखील वेगवेगळ्या स्वभावाच्या माता  कौशल्या, कैकयी, कु़ंती पण सुरुवात क पासून. दानशूर पणाचे उदाहरण म्हणजे कर्ण.  तर झोपाळू माणूस म्हणजे कुंभकर्ण.

प्राणी पक्षी यात स्वामीनीष्ठ असतो तो कुत्रा, तर लबाड, धुर्त कोल्हा. बारीक नजर ठेवणारा कावळा. तर गाणारी कोकीळा‌‌.

सहज खुशाली विचारतांना देखील काय? कसं काय? असे विचारले तरी त्यात सुखाचे उत्तर अपेक्षित असते. पण सुरुवात होते क पासूनच. आणि ते प्रश्नच असतात.

कट्टर हा शब्द मात्र शत्रू आणि मित्र दोघांसाठी असतो. ठाम पणे किंवा निश्चयाने बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ.

कृतघ्न जरी क पासून सुरू होत असला, तरी कर्तृत्व, कर्तबगार, कृतज्ञ, कलावंत, कलाकुसर, कलात्मक, कसब, कणखर असे आब वाढवणारे क पासून सुरू होणारे शब्द देखील आहेत.

कवी, कथाकार, कादंबरीकार असे सगळे साहित्यिक, तर प्रेमळ असणारा कनवाळू हे शब्द क पासूनच सुरु होतात.तर चित्रकाराच्या हाती असतो कुंचला.

त्यामुळेच माझ्या मनात क ने सुरु होणाऱ्या शब्दाबद्दल संमीश्र भावना असतात.

आता माझ्या नावांचे काय?……… ते तुम्ही ठरवा.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments