? विविधा ?

☆ “पळसफुलांचा शृंगार…”  ☆ श्री हेमंत देशपांडे ☆

संक्रांत संपून गेलेली असते.

दिवस तिळातिळाने वाढत असतो.  सबंध वातावरणात भरुन असलेली गोड-गोड गुलाबी थंडी आता विरळ होऊ लागलेली असते.  हिवाळाभर पसरुन राहिलेल्या शिशिर ऋतूचा सोहळा आणिक काही कालावधीनंतर संपून जाणार असतो.  आभाळभर पसरलेली शुभ्र धुक्याची वेल सूर्याच्या प्रखर दाहाने वितळायला लागलेली असते.  एखाद्या लोखंडी गोळ्याला उष्णता दिल्यावर तो जसा खदिरांगारासारखा दिसतो तशी अवस्था भास्कराच्या उष्णतेने येणार असते.  पण तशाही अवस्थेत तो आभाळगोल आपला उष्ण प्रवास निरंतर सुरु ठेवत असतो.

होळीचा सण हा शिशिरातला सण!  शिशिरात कसं मस्त-मस्त वातावरण असतं!  जंगलांनी पळसाचे लालसर केशरी रंग आपल्या अंगाला माखून घेतले असतात.  एखाद्या लावण्यवती प्रमदेनं मत्त शृंगार करुन आपल्या प्रियकराशी भेटायला आतुर व्हावं, तशी ती पळस झाडं आपल्याच फुलांचा शृंगार करुन हजार रंगांनी रंगोत्सुक होणाऱ्या होळीच्या सणाला भेटायला आतुर झालेली असतात, उत्सुक झालेली असतात.  रंगात रंग नि भांगेत भांग मिसळवून टाकण्याचा हा क्षण नि सण असतो.  आणिक सोबतीला शिशिरातलं हवंहवंसं, मिश्किलसं वातावरण खुलत असतं.

पळसफुलांचा रंग एकमेकांच्या अंगावर बरसवून आपण प्रेमाची देवाणघेवाण करत असतो.  आणिक जंगलात पळसाची झाडं आपल्या फुलांचा रंगमय शृंगार पाहून कृतकृत्य झालेली असतात.  झाडांच्या मनी दुःख असतं ते केवळ आपली फुलं खुडली गेली याचं.  फुलांना जन्म देणाऱ्या सर्वच झाडांचं तसं असतं.  एखाद्या नवसौभाग्यवतीच्या अंगावरचा दागिना हरविल्यावर तिनं व्याकुळ नजरेनं तो दागिना इतस्ततः शोधण्याचा प्रयत्न करावा, तशी ती फुलं खुडलेली झाडं करत असतात.  आपल्याच खुडल्या गेलेल्या फुलांना पुन्हा-पुन्हा शोधत असतात.  मला याचंच सगळ्यात जास्त दुःख होतं.  झाडांचं आणिक फुलांचं दुःख मी नाही पाहू शकत.  त्यापेक्षा हजार फुलांचे घाव आपल्यावर व्हावेत असं वाटू लागतं नि नेमकं तसं घडत नसतं.

आपली फुलं माणसांच्या हवाली करुन अश्रू ढाळणारं जंगल पाहायला एकदा मी धावतच जंगलात गेलो होतो.  आताशा नुकतीच कुठं शेंदरी रंगाची फुलं पळस झाडाला लागली असतील नसतील, पण ती लागतात नं लागतात तोच त्या फुलांवर ‘मानवी गिधाडं’ तुटून पडलीत, असा आर्त दुःखाचा भाव जंगलाच्या चेहऱ्यावर मी स्पष्टपणे वाचला.  आपल्या सभोवार फुललेल्या पळसफुलांची आरास माणसांनी विस्कटून टाकली म्हणून जंगल जणू रडत होतं नि जंगलाचं रडू पाहून मलाही रडू येत होतं.

माथ्यावरचा मार्तंड खूप तापला.  सर्वांगाला खूप चटके बसले.  मी भानावर आलो नि माझं रडू थांबलं.  मग मला सूर्याचा मनस्वी संताप आला.  वाटलं, हा आभाळगोल स्वतःला देव म्हणवतो ना!  पौषातल्या रविवारी आईच्या पूजेच्या ताटात हा सूर्य येऊन बसतो ना!  मग तरीही हा देव खोटा का?  खरा देव तर कृपाळू असतो.  साऱ्या पृथ्वीवर वैशाखवणवा पेटवून देणारा हा सूर्य म्हणजे एक महाराक्षस आहे.  जंगलातील फुलं माणसांनी तोडून नेल्याचं दुःख नि माझ्या प्रियतम जंगलावर आग ओकणाऱ्या सूर्याचा राग मनात मावेनासा झाला तेव्हा प्रेयसीच्या रसिल्या ओठांवर प्रियकरानं ओठ टेकावेत तसे आभाळाच्या ओठांवर सूर्याने आपले ओठ टेकवले नि हळूहळू सूर्य आकाशाच्या मिठीत विलीन झाला.

© श्री हेमंत देशपांडे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments