सुश्री राजलक्ष्मी देशपांडे
☆ विविधा ☆ “ते” होते म्हणून… – भाग-5 ☆ सुश्री राजलक्ष्मी देशपांडे ☆
शिर्डीचे साईबाबा खूप जणांना माहिती असतात. पण त्यांचे शिष्य उपासनी महाराजांबद्दल फार कमी माहिती असते. काशिनाथ गोविंदराव उपासनी हे नाशिकमध्ये सटाणा येथे जन्मले. कर्मठ सनातनी घराण्याचे संस्कार असलेला हा मुलगा औपचारिक शिक्षणाच्या बाबतीत उदासीन होता. पण जन्मतः अलौकिकत्वाची लक्षणे घेऊन आला होता. त्यांचं सविस्तर चरित्र सांगण्याची ही जागा नाही. पण लहानपणी विवाह झाल्यावर त्यांची ती पत्नी वारली. दुसराही विवाह (जो त्यांना नको होता..) त्या पत्नीच्या निधनामुळे संपुष्टात आला आणि महाराज योगसाधना करायला मोकळे झाले. ती साधना करीत असताना श्र्वासाचा त्रास होऊ लागला. त्यांना गुरुंनी साईबाबांकडे जायला सुचवलं. पण ते मुस्लिम असल्यामुळे महाराजांनी जायला नकार दिला. पण साईबाबा येऊन उपाय सुचवून गेले. असं दोन वेळा झालं पण उपाय न करण्यामुळे त्रास वाढला. शेवटी निरुपायाने ते शिर्डिला गेले आणि साईबाबांनी त्यांना बरं केलं. यानंतरही त्यांनी शिर्डि सोडून जायचा प्रयत्न केला पण जमला नाही आणि साईबाबांच्या इच्छेनुसार ते तिथेच राहिले. चार वर्षं अत्यंत कठोर, अकल्पनीय साधना केल्यावर ते सद्गुरुपदाला पोचले.
साईबाबांनी त्यांना दिलेल्या अंत: प्रेरणेनुसार त्यांनी शिर्डिजवळच साकुरी इथे कन्याकुमारी स्थान उभं केलं. त्यांच्या पहिल्या आणि त्यांच्यानंतर गुरुपदावर बसलेल्या शिष्या म्हणजे पू.गोदावरीमाता. उपासनी बाबांनी मूळ २४ कन्यांना साकुरीत ठेवून घेऊन चारही वेद, यज्ञकर्म, पौरोहित्य शिकवलं. त्यासाठी संस्कृतचा पाया भक्कम करून घेतला. स्त्रियांमधे पावित्र्य, सहनशीलता, श्रध्दा, चिकाटी, करूणा, समर्पणभाव असे गुण असतात हे एक कारण… पण बाबांना स्त्रियांना वेदाधिकार, साधनेचा अधिकार द्यायचा होता. कडक ब्रह्मचर्याचं तेज आणि स्त्रीत्वाची कोमलता यातून एक कार्य उभं करायचं होतं. पण त्यांच्या कार्याची दिव्यता लक्षात न आल्याने त्यांच्यावर खटला भरला गेला.. विलक्षण बदनामी झाली. स्त्रियांना घेऊन केलेलं काम… त्यामुळं चारित्र्य हनन करण्याचे प्रयत्न केले गेले. पण महाराज यातून अग्नीतून झळाळत्या सोन्यानं बाहेर पडावं तसे बाहेर पडले. अत्यंत सन्मानाने त्यांना दोषमुक्त केलं गेलं आणि त्यांच्या कार्याचा गौरव झाला. पुढे आकाशवाणीवर वेदांमधले काही भाग ऐकवण्याची योजना आखली गेली. तेव्हा अत्यंत अचूक, अधिकृत वेदोच्चार करणाऱ्या फक्त उपासनी महाराजांच्या शिष्याच आहेत हे लक्षात आलं. खूप वर्षे आकाशवाणीवर “उपासनी कन्यां” चे वेदपठण /उपनिषदांचे पठण/सूक्ते ऐकवली जात असत.
हिंदू स्त्रियांना विविध क्षेत्रात विविध लोकांनी स्थान मिळवून दिले आणि हिंदू स्त्रियांनीही या संधींचा सोनं केलं. वेद पठण, पौरोहित्य यांचा अधिकार देऊन यज्ञसंस्था त्यांच्याकरवी जिवंत ठेवण्याचं काम उपासनी महाराजांनी साईबाबांनी दिलेल्या अंत:प्रेरणेनं केलं आज सनातन हिंदु धर्मातील शास्त्रशुध्द पूजाअर्चा, यज्ञयाग, वैदिक ज्ञान साकुरीमधे व्रतस्थ स्त्रिया जतन करीत आहेत.
अशा विभूतींनी हा धर्म काळाबरोबर प्रवाहित ठेवला. त्याचं डबकं होऊ दिलं नाही.
क्रमशः ….
© सुश्री राजलक्ष्मी देशपांडे
मो – 7499729209
(लेखात व्यक्त केलेली मते लेखकाची वैयक्तिक मत आहेत.)
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈