सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “मार्च…महिना परिक्षेचा” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

मार्च महिना हा सगळ्यांसाठीच धावपळीचा, दगदगीचा आणि आव्हानाचा सुद्धा. शिक्षणक्षेत्र आर्थिक क्षेत्र,आणि मुख्य म्हणजे गृहीणी ह्यांच्या साठी तर हा महिना खूप जास्त महत्वाचा.

कँलेंडरवर नजर टाकली तर हा महिना खूप सुट्ट्यांचा दिसतो मात्र खासियत अशी की पेंडींग कामे,टारगेट्स ह्यामुळे ह्या सुट्ट्या नुसत्या दिसायलाच कँलेंडरच्या बाँक्समध्ये विराजमान असतात. कामाच्या रामरगाड्यामुळे एक तर ह्या सुट्ट्या अर्जत नाहीत आणि चुकून मिळाल्यातरी महत्वाची कामे सतत नजरेसमोर येत असल्याने त्या सुट्ट्यांमध्ये घरी मन रमत नाही वा सुट्ट्यांचा मनमुराद आनंदही उपभोगता येत नाही. सुट्ट्या मिळाल्या तरी हे माहिती असतं साठवून ठेवलेली कामे आपल्यालाच करायची असल्याने ही सगळी कामे नजरेसमोर फेर धरून नाचतात आणि त्यामुळे जीवाची तगमग ही होतेच. गृहीणींच्या भाषेत बोलायचं तर नजरेसमोर असतो धुणी, भांडी ह्यांचा घासायला,धुवायला असणारा ढिगारा आणि नेमकं टाकीतील पाण्याचा साठा संपून गेल्यावर जणू “जल बीन मछली “सारखी तगमगती अस्वस्थता.

हा मार्च महिना विद्यार्थ्यांसाठी,शिक्षक प्राध्यापक मंडळींसाठी,  शिक्षणमंडळ आणि विद्यापीठ ह्यामध्ये काम करणा-यांसाठी खूप ताणाचा, कामांचा असतो.

हा महिना राजकारणी मंडळींसाठी पण खूप महत्त्वाचा असतो.कित्येक दिवस खूप अभ्यास करुन मेहनतीनं सत्तेवर असणाऱ्या पक्षाला खर्चाचा ताळमेळ बसवत अंदाजपत्रक सादर करावं लागतं. राज्याच्या ,देशाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेची घडी बसविणं किती कठीण कामं असतं नं.आपल्याला साधं आपल्या घरातील जमाखर्च आणि अंदाजपत्रकाचा ताळमेळ बसवितांना सगळे देव आठवतात. हे तर पूर्ण राज्याचे, देशाचे कामं आणि इतकही करुन कौतुक वाट्याला येत नाही ते नाहीच. विरोधी पक्ष कुठलाही असो तो पक्ष त्यातील फक्त त्रुटी,कमतरता तेवढ्या शोधीत राहणार. माझ्या बघण्यात अजून एकदाही असा प्रसंग आला नाही ज्यामध्ये विरोधी पक्ष हा सत्तेवर असणाऱ्या मंडळींचे कौतुक करतोयं. असो

जणू मार्च महिना हा सगळ्यांची परीक्षा घेण्यासाठीच तयार झालेला महिना असावा. विद्यार्थ्यांनी संपूर्ण वर्षभराच्या केलेल्या कष्टांचे, श्रमाचे मुल्यमापन ह्याच काळात होतं जणू. बँकर्स, सी.ए.,आँडीटर्स, कर भरणारी जनता ह्यांची तर अक्षरशः “निंद हराम” करणारा हा महिना. टारगेट्स पूर्ण करण्यासाठी धडपड करणाऱ्या साठीचा हा कालावधी.

मार्च महिना हा गृहीणींसाठी पण खूप धावपळीचा आणि दगदगीचा महिना असतो. ह्या महिन्यात धान्य विकत घेऊन, त्याला ऊन दाखवून मग त्यावर कीडनाशक कडूलिंबाचा पाला टाकून ते धान्य साठवणूक म्हणून कोठ्यांमध्ये ठेवण्याचे महत्त्वाचे काम गृहीणींचे असते. त्याचबरोबर वर्षभर बेगमी म्हणून साठा करण्याचे पदार्थ उदा.पापड,कुरडई, लोणची, शेवया,वेफर्स आणि असे अनेक पदार्थ करण्याचं गृहीणींच्या कामाची सुरवात मार्चपासूनच होते.

नुकतीच थंडी गायब होऊन उन्हाळ्याला सुरवात झालेली असते.त्यामुळे ह्या हवामाना मधील बदलांमुळे सगळ्यांना आपल्या तब्येतीची काळजी ही घ्यावीच लागते. तरीही व्हायरल इन्फेक्शन हे हात धुवून मागे लागण्या मुळे डाँक्टर्स आणि पेशंट ह्यांच्यासाठी सुद्धा गर्दीचा काळ.पण खरी परीक्षा ही तब्येतीने धडधाकट असणाऱ्या आपल्या घरच्या मंडळींची असते.

हे आर्थिक वर्ष, आपणा सर्वांना भरभराटीचे जावो ,आरोग्य व्यवस्थित राहो हीच ईशचरणी प्रार्थना.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments