सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “चुटपूट” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

व्हाट्सएपचं वेगवेगळ्या समुहाचं एक आगळंवेगळं जग असतं,नव्हे आहे. ह्या जगात नानाविध लोक,काही त्यांनी लिहीलेल्या,काही फाँरवर्डेड पोस्ट ह्या निरनिराळ्या विषयांवर असतात. कधी कधी एकच पोस्ट फिरतफिरत वेगवेगळ्या समुहांवरुन अनेकदा येते. मला हे जग बघितलं की आमच्या शेतातील धान्य निघतांना एक शेवटचा टप्पा असतो,ज्याला “खडवण” असं म्हणतात त्याचीच आठवण येते. ह्या खडवणीत जरा बारीक माती,खडे ह्यांच प्रमाण जास्त आणि धान्याचं प्रमाण कमी असं असतं.शेतकऱ्यांचं एक ब्रीद वाक्य असतं “खाऊन माजावं पण टाकून माजू नये”ह्यानुसार प्रत्येक शेतकरी अगदी निगूतीने ती खडवण निवडून धान्य बाजूला काढून अन्नदात्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. कुठलाही शेतकरी धान्याचा शक्यतो एकही दाणा वाया जाऊ देत नाही. ह्या व्हाट्सएपचं च्या जगात पण आपल्या प्रत्येकाला ही शेतकऱ्यांची भुमिका बजवावी लागते. चांगल्या,दर्जेदार, वाचनीय, ज्यामुळे आपल्या पुढील आयुष्यात नक्कीच काही तरी चांगले शिकू,आचरणात आणू. अर्थातच  हे व्हाट्सएप समुह जरा निवांत वेळ असणाऱ्या, जबाबदा-या पार पाडलेल्या मंडळींसाठी मात्र खूप चांगले हे ही खरेच.

अशाच एका व्हाट्सएप ग्रुपवर जळगावच्या डॉ. श्रीकांत तारे ह्यांचे स्वतःचे “चुटपुट”नावाचे अनुभव कथन खूप जास्त भावले आणि त्या लिखाणाने विचारात देखील पाडले. ह्या लेखात आपलं माणूस असेपर्यंत त्याच्या आवडीच्या सोयीच्या गोष्टी करणं हे आपल्याला खूप जास्त समाधान देऊन जातं आणि कदाचित चुकून, अनवधानाने आपल्या हातून ती व्यक्ती असेपर्यंत ह्या गोष्टी करणं झाल्या नाहीत तर कायमची न संपणारी, आपल्या शेवटपर्यंत स्मरणात राहणारी ही एक “चुटपुट” लागून जाते ह्याबद्दल खूप छान लिहीलयं.प्रत्येकाने वाचावीच अशी ती पोस्ट. संपूर्ण पोस्ट तर  येथे पाठवू शकत नाही त्यामुळे फेसबुक वर कदाचित त्यांच्या वाँलवर ती आपल्या सर्वांना वाचायला मिळेल. आपल्याला पटलेल्या,दर्जेदार गोष्टी आपण वाचून त्या इतरांना वाचायला सांगण ह्यामध्ये पण एक आनंद असतो.

बरेचवेळा आपण आपल्या लोकांना गृहीत धरतो,त्यामुळे त्यांच्या मनातलं जाणून घ्यायचा प्रयत्न आपण करीतच नाही, आणि मग इथेच आपले सगळे सुखाचे कँल्यक्युलेशन चुकायला सुरवात होते. सध्या आपल्या सगळ्यांचच जीवनमान हे अतिशय वेगवान झालयं. जी गोष्ट परस्परांना देण्याघेण्यासाठी अतिशय मौल्यवान असते ती म्हणजे परस्परांनी एकमेकांना दिलेला आपला स्वतःचा वेळ,आणि आज बहुतेक आपल्या सगळ्यांना देण्यासाठी वेळ नाही ही एक शोकांतिकाच. ह्या परस्परांना वेळ देण्यामधूनच एकमेकांच्या मनातील भाव,ईच्छा ह्या न बोलता, सांगता एकमेकांना आपोआप कळायच्या मात्र आता वेळेचा अभावी एकमेकांना समजून घेणे ही गोष्ट अभावानेच आढळणारं, म्हणून आपण त्यावर तोडगा म्हणून आपली भुमिका गुळमुळीत न राहता दुसऱ्या व्यक्तीला सडेतोड सांगणं हे कौटुंबिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी अत्यावश्यक ह्या सदरात मोडतं.मग हे नातं पालक अपत्यांमधील असो वा जोडीदारांमधील.आपली आवडनिवड, आपली स्वप्नं, आपल्या ईच्छा,आपल्या गरजा  ह्या परस्परांना स्पष्टपणे सांगून ,त्यावर विचारविनिमय करुन तोडगा काढल्यास कुणाही एका व्यक्तीला कायम तडजोड वा कायम मनं मारुन,ईच्छा ,गरजा अपूर्ण ठेऊन जगावं लागणार नाही. आणि मग परस्परांना निदान एक माणूस म्हणून आपण समजावून घेऊ शकू.

एका अनुभवामुळे मनात असे अनेक विचार आलेत, असेच अजून कितीतरी वेगवेगळे विचार आपल्या सगळ्यांच्या मनात येतीलच ही खात्री. त्यामुळे वाचत रहा बरेच वेळा आपल्या वाचनातूनच,वेगवेगळे अनुभव जाणून घेउनच आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं ही मिळायला मदत होते हे नक्की.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments