विविधा
☆ “शतदा प्रेम करावे…” ☆ प्रा.भारती जोगी ☆
प्रौढत्वी निज शैशवास जपणे; बाणा कविचा असे!
वरील काव्यपंक्ती अगदी शालेय जीवनापासून ऐकत आणि वाचत आले आहे.निबंधात आणि भाषणात या ओळींचा वापर मी अगदी माझ्याच लिहिलेल्या असल्याच्या दिमाखात वापरून मोकळी होत असे. अगदी..
कवी चा बाणा असल्याच्या ताठ्यात!!
पण तुम्हाला सांगते..तेव्हा कधीच हा प्रश्न पडला नाही की…हा बाणा फक्त कविचाच कां ?
पण आज प्रौढत्वी या प्रश्नाचं उत्तर शोधावंसं वाटलं.
आतापर्यंत जगलेलं…भोगलेलं…घालवलेलं..
वाट्याला आलेलं..आणि उपभोगलेलं
असे सगळेच कंगोरे दृष्टीस पडले आयुष्याचे!! बालदिनाच्या निमित्ताने..व्हॉट्स ॲपवर फिरणार्या पोस्ट्स मधून डोकावणारं…डोळे मिचकावून हसणारं..खोड्याळ आणि खट्याळ..
गोडुलं बालपण दिसलं…आणि आलेलं प्रौढत्व शैशव जपण्यास सिद्ध झालं की!!
बालपण आणि कविचा बाणा यांचा काही अन्योन्य संबंध आहे कां बरं?
आणि मग माझी स्वारी निघाली की कविच्याच मदतीने…कवी यशवंत देव यांच्या मदतीने..कवितेच्या गर्भात शिरूनी भावार्थाला भिडायला!*
शब्दांच्या पलीकडले स्पंदन..
शब्दांतूनच ओवायला!!*
बालपण…..निर्व्याज, निरागस, निरामय, नितळ अशा वृत्तींचा देखणा आविष्कार!! बालकाचं मन सतत कुठल्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात..विक्रमराजाच्या मानगुटीवर च्या वेताळा सारखं!
सतत कुतुहल, औत्सुक्य, जिज्ञासा,
त्यामुळेच सतत खळखळ वाहणार्या
पाण्याच्या प्रवाहा सारखं…निर्मळ, नितळ…अगदी तळ दिसावा इतकं!!!
कविचं मन ही असंचं….सतत अंतस्थ मनाची साद ऐकणारं, मनात उत्स्फूर्त विचारांचा धबधबा पेलून धरलेलं,
निसर्गा च्या हाका ऐकणारं, गूज, गूढ उकलण्या साठी धडपडणारं…निर्व्याज मन!! नव्या युगातील नव्या मनूचा शूर शिपाई बनून उभं ठाकणारं मन!!
(आई मला छोटीशी बंदूक दे ना! आठवलं ना बालगीत?)
तीच जिज्ञासू वृत्ती…अगदी..
को ऽहम् ते सोऽहम् चा शोध लागेपर्यंत चा शोध लागेपर्यंतची ओढ जपणारं मन!!
बघा…निराश, हताश, हतोत्साहित झाला असाल तर…लहान बालकांत बालक होऊन रमून पहा…एखादी कविता वाचून पहा….मग बघा…
ते बालपण…ती कविता तुमच्या रोमा-रोमांत संचरित होत झिरपत जातं…आणि थकलेल्या मनाला म्हणजेच पर्यायाने शरीरालाही कशी उभारी येते ती!!
नव्याने प्रेमात पडाल या जगण्याच्या..
आणि म्हणाल…” या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे!!”👍🏻
आणि मग या प्रौढत्वी ही तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीतला…अगदी तुमच्याच आसपास असलेला आनंद सापडेल.एक आगळंच समाधान मिळेल. संतोष पावेल मन!!तृप्त मन,
आनंदी मन..मग आपोआपच निरोगी शरीर…तृप्त आत्मा!!
मग हा आत्मा आत्मरंगी रंगून…रामरंगी रंगायला मोठ्या समाधानाने तयार न झाला तरच नवल!!!!
म्हणूनच…कविमनाने…जिगिविषु वृत्तीने…प्रौढत्वी निज शैशवास जपण्याची खिलाडू वृत्ती अंगी बाणण्यास..सज्ज होऊ या कां??
चला तर मग…” ले शपथ..ले शपथ!
भले ही हो…अग्निपथ! अग्निपथ!
© प्रा.भारती जोगी
पुणे.
फोन नंबर..९४२३९४१०२४.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈