श्री कचरू चांभारे
अल्प परिचय
इतिहास, दुर्ग अभ्यासक, दरमहा गडकोट भटकंती. निसर्ग विषयक विपुल लेखन. अनेक मराठी ग्रंथाचे समिक्षण.
विविधा
☆ “जागतिक हास्य दिन…” ☆ श्री कचरू चांभारे ☆
मे महिन्याचा पहिला रविवार जागतिक हास्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
जीवंत राहण्यासाठी आवश्यक ती धडपड करण्याची शक्ती प्रत्येक सजीवास नैसर्गिकरित्याच लाभलेली आहे.भूक ,भय,तृप्ती या सजीवाच्या प्राथमिक भावना आहेत.सजीव सृष्टीमध्ये मानव हा प्रचंड संकरित प्राणी आहे.बुद्धीवादाच्या काही पैलूंनी संशोधनाचे नवीन आयाम मांडले व मानवी जीवनात आमुलाग्र बदल झाला.इतर प्राणी व मानव यांची तुलना केली तर अनेक वैशिष्ट्यपूर्ण देणाग्यांमुळे मानव इतरांपेक्षा खूप वेगळा ठरला आहे.हास्य ही अशीच एक मानवाला लाभलेली अप्रतिम देणगी आहे.सूक्ष्मपणे विचार केला तर हास्य ही स्वतंत्र भावना नाही ,हास्य हे आनंदाचे ,समाधानाचे प्रगटीकरण आहे.हसणं , नाचणं ,रडणं हे तीनही भावाविष्कार मानवासाठी अप्रतिम गॉडगिफ्ट आहे.पण लाज नावाची आणखी एक भावना मानवास मिळालेली आहे.ही लाज नेहमीच हसणं ,रडणं व नाचणं यांचा कोंडमारा करत आली आहे.वाढत्या वयाप्रमाणे माणसाची सामाजिक समज अधिक प्रगल्भ होत जाते ,अन् माणूस वरील तीनही प्रकारच्या भावना प्रगटीकरणाला स्वतःच लगाम घालतो.
हसणं ही नैसर्गिक भावना आहे.ज्याच्या आयुष्यात हास्य आहे तो आनंदी ,उत्साही अन् प्रेमळही असतो.आनंद शोधणं ही एक कला आहे.ज्याला आनंद शोधता येतो,हास्य त्याची आनंदाने गुलामी करतं.कशातही आनंद शोधणारास हास्याचे झरे सापडतात.ज्याला हास्य सापडतं ,ती व्यक्ती प्रभावशाली असते.हास्य हा आपला अविभाज्य घटक असला तरी ज्याने हा घटक अधिक विकसित केला आहे त्यालाच त्याचा मनमुराद आनंद घेता येतो.आज गतिमान आयुष्यात निवांतपणा हरवून गेला आहे.मानवी सहजीवनाची सहजता गुंतागुंतीची झाली आहे.ताणतणाव व दगदग यां सोबत मैत्री करून माणूस आपला सूर्योदय-सूर्यास्त मोजत आहे.हास्य ही फक्त भावनाच आहे असे नाही तर ते एक प्रभावी औषध आहे.दहा मिनिटाच्या व्यायामाने हृदयाचा जेवढा व्यायाम होतो,तेवढाच व्यायाम एक मिनिटाच्या प्रसन्न हसण्याने होतो.हसल्यामुळे शरीरात सेटोटेटीन हे आनंदाचे हार्मोन्स तयार होतात.त्यामुळे भूक कमी लागते.’तुला पाहून मन भरलं ‘.असं जे आपण व्यवहारात बोलतो ना त्याचं मूळ इथं आहे.हसण्यामुळे एंडोर्फिस हे हार्मोन्स सुद्धा निर्माण होते.या हार्मोन्समुळे मनात फील गुडची भावना तयार होते.त्यामुळे दुःखावर हलकी फुंकर राज्य करते.
हास्याचेही अनेक प्रकार पडतात.स्मित हास्य हे सर्वश्रेष्ठ हास्य आहे.जिथं ओळख आहे ,तिथेच ते निर्माण होते.ओळखीच्या व्यक्तीच्या नजरानजरीची ओळख पटली की हृदय त्या ओळखीचा पुरावा स्वीकारते व चेह-यावर मंद प्रसन्न स्मित झळकते.स्मित हास्यात चेह-यावरचे स्नायू फार प्रसरण पावत नसले तरी अंतरीच्या खोलातून आलेली प्रसन्नता संपूर्ण चेह-यावर पसरते.हास्य हा कबुली जबाबाचा करारनामा म्हणून सुद्धा काम करते.एखाद्याची गोष्ट पटली तर हसून दाद दिल्यास ,दोन्ही पक्ष खूश होतात.गडगडाटी हास्य हा हास्याचा प्रकार सगळ्यांचच लक्ष वेधून घेतो पण पाहणारांची नाराजी झाल्यास ,हसणाराच्या मनात अपराधीभाव येतो.हसून काय पाप केलं ? याच्या उत्तरात तो गुंतून जातो.विनोदाला दाद हे ही हास्याचे एक रूप आहे.हास्याचे सगळेच प्रकार आनंद व्यक्त करणारे असतात.पण याला अपवाद आहे तो कुत्सित किंवा छद्मी हास्याचा.हास्याच्या प्रकारात कुत्सित हास्य हा अतिशय निकृष्ट प्रकार आहे.एकवेळ हास्य थांबलं तरी चालेल ,पण कुत्सित हास्याचा उगम कोठेच होऊ नये.हास्य ही माणसाला मिळालेली देणगी असली तरी आज आपल्यावर हास्य क्लब निर्माण करण्याची वेळ आली आहे.ही घटना म्हणजे नैसर्गिकतेचा अभाव अन् कृत्रिमतेचा प्रभाव सांगणारी आहे.
हास्य हे एक जादूई रसायन आहे.माधुरी दिक्षित नेने झाली.हळुहळू पन्नाशीत गेली. तरी तिचं हसणं फिल्म इंडस्ट्रीतलं भूरळ आहे.पुढे हाच हास्य वारसा मुक्ता बर्वे ,अमृता खानविलकर या मराठी तारकांनी जपला आहे.हसताना गालावर पडली ,की ती खळी कितीतरी जणांसाठी वरदानच ठरते.लहान मुलांचं हसणं अतिशय लोभस अन् गोंडस.हसरं मूल दिसलं की त्याला उचलून घेण्याचा मोह आवरतच नाही.हसताना उघडलेल्या मुखात,सरळ दिसणारी दंतपंक्ती ,केसांची हालचाल हास्याचे सौंदर्य अधिकच खुलविते.हसण्याचं ठिकाण बदललं की त्याप्रमाणे भावही बदलत जातात.लहानमुलांसोबतच्या हास्यात दुःख विरघळविण्याची क्षमता असते.आई वडीलांसोबत हसताना विश्वास वाढतो.बायकोसोबत हसताना अनेक संमिश्र भावाच्या छटा असतात.कारण ती जबाबदार आयुष्याची भागीदार असते.ही जबाबदारी समर्थपणे पेलताना प्रतिपूर्तीचे अनेक क्षण हास्य जन्माला घालतात.मित्रा मित्रातले हास्याचे फवारे मानवी जगतापासून दूर गेलेल्या दुनियेतले असतात.तिथे फक्त मैत्री हीच दुनियादारी असते.प्रिय व्यक्तीच्या हसण्याचा आवाज ऐकण्याची आतुरता व त्याचं नेहमीचं चिरपरिचित हसणं ऐकून होणारी तृप्तता ; हे हास्य मात्र अवर्णनीय तृप्ती देणारं असतं.त्या हास्यासाठी दोन्ही मने सारखीच वेडावलेली असतात.
मानवानं या देणगीचं मोल समजून घ्यायलाच हवं.हसरी व्यक्ती नेहमीच त्याच्या उपस्थितीची दखल घ्यायला लावत असते.नव्हे नव्हे ,अशा व्यक्तीची दखल घेणं इतरांनाच खूप आवडत असतं.हसा आणि हसवा हा मार्ग दीर्घायुषी रस्त्याला समांतरपणे धावत असतो.म्हणून हसा ,हसत राहा,हसवत राहा.
जागतिक हास्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
© श्री कचरू चांभारे
संपर्क – मुख्याध्यापक, जि. प. प्रा. शाळा, मन्यारवाडी, ता. जि. बीड
मो – 9421384434 ईमेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈