सौ कल्याणी केळकर बापट
विविधा
☆ “संगीतातील शुक्रतारा…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆
संगीत, गाणी आणि आपण त्याचे दर्दी यामध्ये एक अनामिक बंध जुळल्या गेलेले असतात. कुठेही,कधीही,कुठल्याही भाषेतील संगीत, गाणी ऐकू आलं की ठेका हा धरलाच जातो. मला आठवतं आम्ही तेव्हा टिव्ही वर प्रादेशिक चित्रपट, प्रादेशिक गाणी,संगीत काही भाषा कळतं नसूनही आवडायची.पण खरं प्रेम ,लायकींग हे आपल्या मातृभाषेतील गाण्यांवर असतं हे ही खरेच.
प्रत्येकाच्या जीवनात आनंद मिळवून देणाऱ्या गोष्टींपैकी सुमधुर संगीत,गाणी,कविता ह्यांच स्थान पहिल्या काही क्रमांकावरच असतं. सुमधुर संगीत, मनाला जाऊन भिडणारी अर्थपूर्ण गाणी,आशयघन कविता, काव्य हे आपल्या आयुष्यातील अविभाज्य अंगच बनले आहे.
मनाला आनंद मिळवून देणाऱ्या संगीताचे, काव्याचे अनेक प्रकार आहेत. भक्तिगीतं, कविता, भावगीतं, सुगमसंगीत ह्यांच्यामुळे माणसाच्या जीवनात आलेलं एकटेपणं काही प्रमाणात दूर करण्याची किमया ह्या संगीतात आहे.
काही वेळी काही माणसं अश्या अजरामर कलाकृती घडवून जातात की ह्या कलाकृतीच जणू त्यांच्या नावासारखीच त्यांची ओळख बनवितात. असेच एक अवलिया म्हणजे “शुक्रतारा मंदवारा”वाले अरुणजी दाते. आतुन उत्स्फूर्त निघालेली अवीट गोडीची अर्थपूर्ण प्रेमगीत व भावगीतं ऐकावीत ती अरुणजींच्याच आवाजातील. 2010 पर्यंत “शुक्रतारा मंदवारा” ह्या कार्यक्रमाचे थोडेथोडके नव्हे तर तब्बल 2500 कार्यक्रम झालेत.
मे महिन्यातील चार,पाच,सहा ह्या तारखा जणू कलाक्षेत्राशी संबंधित तारखा. 4 मे ही तारीख सुप्रसिद्ध गायक अरुणजी दाते ह्यांचा जन्मदिवस, 6 मे हा अरुणजींचा स्मृतीदिन व 5 मे ही तारीख बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे ह्यांचा स्मृतीदिन.
अरुणजी दाते ह्यांना ओळखत नसलेली व्यक्ती विरळीच. अरुणजी हे सुप्रसिद्ध मराठी भावगीतं गायक. इंदूरचे सुप्रसिद्ध गायक रामुभैय्या दाते हे त्यांचे वडील. ह्यांचा जन्म 4 मे 1934 रोजी इंदूर येथे झाला. सुरवातीला इंदूर जवळील धार येथे कुमार गंधर्वांकडे ह्यांनी संगीताचे प्राथमिक धडे गिरवले. संगीताचे पुढील शिक्षण त्यांनी के.महावीर ह्यांच्याकडे घेतले. खरतरं दाते हे मुंबईत टेक्स्टाईल इंजिनिअर म्हणून नोकरी करीत पण त्यांना त्यांचा आतला आवाज स्वस्थ बसू देत नव्हता.1955 मध्ये त्यांनी आकाशवाणी ला कार्यक्रम केला.1962 ला त्यांची पहिली ध्वनीमुद्रिका “शुक्रतारा मंदवारा”ह्या नावाने प्रकाशित झाली.खळेकाका ह्यांच्या आग्रहाखातर त्यांनी जाहीर कार्यक्रम घ्यायला सुरवात केली. मंगेश पाडगावकर, यशवंत देव,अरुण दाते ह्या त्रिकुटाने अनुक्रमे कवी, संगीत दिग्दर्शक, गायक असे मराठी भावगीतांचे लोकप्रिय कार्यक्रम सादर केलेत. दातेंनी लता मंगेशकर, आशा भोसले,सुमन कल्याणपूर,कविता कृष्णमुर्ती ,सुधा मल्होत्रा, अनुराधा पौडवाल ह्यांच्या बरोबर अनेक लोकप्रिय द्वंद्वगिते गायलीत. त्यांना 2010 साली गजानन वाटवे पुरस्कार व 2016 साली राम कदम कलागौरव पुरस्कार मिळाला. त्यांची दीर्घकाळ स्मरणात राहणाऱ्या गाण्यांपैकी “भातुकलीच्या खेळमधली”,””जपून चाल पोरी जपून चाल”,”स्वरगंगेच्या काठावरती”,”या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे”,”दिवस तुझे हे फुलायचे”,आणि “शुक्रतारा मंदवारा”ही काही सुप्रसिद्ध गाणी.
बीबीसी लंडनमधील स्टुडीयोत अगदी बोटावर मोजता येतील इतकीच मराठी गाणी गायली गेली आहेत. त्यापैकीच ही दोन गीतं म्हणजे “शुक्रतारा मंदवारा”आणि” भातुकलीच्या खेळामधली”.
अरुणजी ब्रिटनमध्ये शुक्रताराचे कार्यक्रम करत होते. त्याकाळी विमानप्रवास आजच्या इतका सोपा आणि परवडणारा नव्हता. त्यामुळे तबल्यावर अरुणजीचे काका शामुभैया दाते, सूत्रसंचालक सुप्रसिद्ध लेखक व.पु. काळे आणि अरुणजी स्वतः असा ह्या तिघांनीच कार्यक्रम केला. हार्मोनिअमवाल्याचा खर्च वाचावा म्हणून वपु स्वतः हार्मोनियम शिकले होते, त्यांनी साथ केली. केवळ या दोघांच्या जोडीने ब्रिटनमधील मैफिलीत अरुणजी हजारों श्रोत्यांना कसे मंत्रमुग्ध करतात हे बीबीसीच्या वार्ताहरांनी पाहिल्यावर अरुणजींना बीबीसी स्टुडीयोत आमंत्रित करून त्यांचे ध्वनीमुद्रण झाले.
अरुणजींची सगळीच भावगीतं म्हणजे अक्षरशः मंत्रमुग्ध करुन टाकणारी जणू मास्टरपीसच आहेत.” या जन्मावर या जगण्यावर”, “शुक्रतारा”, “जेव्हा तिची नी माझी” “भातुकलीच्या खेळामधली”, “स्वरगंगेच्या काठावरती”, “दिवस तुझे हे फुलायचे”, “मान वेळावुनी धुंद”, “जपून चाल पोरी जपून चाल”, “डोळे कशासाठी”, “काही बोलायाचे आहे”, “डोळ्यात सांजवेळी”, “सखी शेजारणी,”” धुके दाटलेले उदास उदास”,” भेट तुझी माझी स्मरते”, “सूर मागू तुला मी कसा”, लतादिदिंबरोबरचं संधीकाली ही आणि अशी कितीतरी उल्लेखनीय गीतं अरुणजी दाते ह्यांच नाव घेतल्याबरोबर डोळ्यासमोर येतात,आठवतात, धुंद करतात, तल्लीन करतात.
असं म्हणतात की “या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे” ह्या त्यांच्या गीताने कित्येक नैराश्याने ग्रासलेल्या वैफल्यग्रस्त लोकांना आशेचा नवीन किरण सापडून त्यांचे भविष्य अगदी जणू तिमीराकडून तेजाकडे गेले.
परत एकदा ही मंत्रमुग्ध करणारी सगळी गाणी मनात घोळवत,ह्रदयात साठवत अरुणजींना अभिवादन करते.
© सौ.कल्याणी केळकर बापट
9604947256
बडनेरा, अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈