श्री कौस्तुभ परांजपे
विविधा
☆ “अंक, आकडा…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆
अंक किंवा आकडा यांचा व माझा प्रत्यक्ष संबंध शाळेपासून आला असला तरीही सुरुवात झाली ती मात्र जन्मापासूनच. कशी ते शेवटी सांगेनच.
आपल्याकडे जसे काही देवांना अनेक नांवे आहेत ना तसेच अंकांचे देखील आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हे वेळ या नावाने फिरत असतात.
कॅलेंडरवर ते तारीख म्हणून विराजमान असतात. तारीख म्हणून ते ठसठशीत असतात. पण या तारखेच्या चौकोनातच बाजूला कुठेतरी बारीक अक्षरात कृ. म्हणजे कृष्ण आणि शु. म्हणजे शुक्ल पक्ष असे एक ते चौदा पर्यंत असतात. तेव्हा ते तिथी या स्थितीत असतात.
रेल्वे, विमान, बस, नाट्य आणि चित्रपट गृहात, तसेच परिक्षेच्या वर्गात ते सीट नंबर असतात. तर वर्गात रोल नंबर म्हणून परिचित असतात.
काहीवेळा त्यांचा नंबर असा उल्लेख होतो. मग तो नंबर चष्म्याचा, फोनचा, परिक्षेचा, गाडीचा, अगदी बॅंकेचा अकाउंट नंबर ते आधार कार्ड वरचा असा कशाचाही असू शकतो. थोडक्यात आकडे आपला आधार आहेत.
परिक्षेत मिळालेले गुण असतात. तर पत्रिकेत देखील गुणच असतात. पण परिक्षेत मिळवावे लागतात आणि पत्रिकेत ते जुळावे लागतात.
कोणत्याही खरेदी केलेल्या वस्तू बद्दल कागदावर ते मांडले गेले की त्यांचे बिल होते. शींप्याने कागदावर लिहीली तर मापे, आणि घराच्या संदर्भात देखील मापेच असतात, पण घरांच्या बाबतीत त्यांना कार्पोरेट फिल येतो आणि ते कार्पेट एरिया म्हणून ओळखले जातात.
एकाच माणसाचे वेगवेगळ्या व्यक्तींसोबत वेगवेगळे नाते आणि त्या नात्याची किंमत असते. तसेच यांनी देखील एकक, दशक, शतक असे स्थान बदलले की यांची किंमत बदलते.
हल्ली मोठे आकडे सुध्दा लहान स्वरूपात सांगतात. जसे घराची किंमत १ किंवा १.५ CR. असे. लहानपणी देखील आम्हाला CR. आणि WR. असे ठाऊक होते. पण ते सेंट्रल आणि वेस्टर्न रेल्वे असेच होते. नंतर काॅलेजमध्ये CR शी संबंध आला पण पैशातील CR चा संबंध अलीकडच्या काळातील आहे.
हे आकडे सरळ आले असते तर चालले असते. पण त्यात परत बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे आले. सोबत सरासरी आणि टक्केवारी देखील आणली. इथेच थांबले नाहीत. पूर्णांक, अपूर्णांक असे भाऊबंद घेऊन येतांना सम, विषम, मुळसंख्या अशा लवाजम्यासह आले.
कामाच्या बदल्यात पदरी पडलेले आकडे पगार असतात. यात देखील ते ढोबळ आणि निव्वळ असे वेगवेगळे असतात.
शुभ, अशुभ असे आपणच यात केले आहे. तेरा अशुभ, तर एकमेकांशी पटत नसले तर छत्तीस चा आकडा हे यांच्या बाबतीत आपणच ठरवले.
हे वजन आणि उंची देखील सांगतात. वजनाने घेतलेल्या गोष्टी ग्रॅम, लिटर मध्ये तर अंतराच्या भाषेत फर्लांग, मैल, किलोमीटर मध्ये, आणि उंची फुटात, इंचात, सेंटिमीटर मध्ये सांगतात.
आकडे हे गणित घालतात. निवडणुकांमध्ये देखील हे आकड्यांचे गणित जमवावे आणि सोडवावे लागते.
नुकत्याच जाहीर झालेल्या परिक्षेच्या निकालाचे पहा. सगळे आकड्यातच होते. एकूण परिक्षेला बसलेले किती? पास झालेले किती? मुले किती? मुली किती? मुले आणि मुली यांचे प्रमाण आणि पास होण्याचे प्रमाण किती?
या शिवाय वाणिज्य, विज्ञान, कला यात किती? आणि विभागवार पुणे, कोल्हापूर, कोकण, मराठवाडा, विदर्भ इ….. सगळे एकूण आणि टक्केवारीसह पण आकड्यातच.
सगळे आकडे दिसणारे, समजणारे असतात. पण काही आकडे वेगळे असतात. हे साधारण लटकवायला किंवा विद्युत तारांवर टाकतात. आकड्यात वैध आणि अवैध आकडे आहेत का माहित नाही. पण विद्युत तारांवर टाकलेले आकडे अवैध असतात असे म्हणतात.
माझी आजी अंबाडा घालतांना आकडे वापरायची. पण त्यात मला कोणताही आकडा किंवा आकड्यासारखा आकार दिसलाच नाही.
ग्रामीण भागात काही लोकं आकडी आली असे म्हणतात. पण आकड्यांचे हे स्त्रीलिंगी रूप मला नीट समजलेले नाही.
हत्तीच्या बाबतीत जसे त्याचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात असे म्हणतात. तसेच काही ठिकाणी कागदावरचे आणि प्रत्यक्षातले आकडे वेगळे असतात असे ऐकले आहे. पण असतात ते आकडेच.
आकड्यांची सोबत जन्मापासून झाली ते कसे हे सांगतो. माझा जन्म झाल्यावर तारीख, महिना, वर्ष इतकेच काय वेळेसह ते नोंदले गेले तरी ते सगळे आकडेच, अंकच आहेत. आणि मी गेल्यावरही ते नोंदवले गेले तरीही आकडेच राहणार आहेत.
असे हे आकडे विमा कंपनीच्या जाहिराती सारखे “जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी|” सोबत असणार आहेत.
© श्री कौस्तुभ परांजपे
मो 9579032601
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈