श्री सुधीर करंदीकर

 

🔆 विविधा 🔆

☆ “International Day of Happiness, जागतिक आनंद दिन” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

नमस्कार नमस्कार,

20 मार्च.

हा दिवस आहे  International Day of Happiness, जागतिक आनंद दिन.

जगामधल्या सगळ्यांनी सदैव आनंदी राहावं आणि आपल्या आजूबाजूला आनंद पसरवावा, ही या दिना मागची कल्पना आहे.

दरवर्षी या दिनाकरता वेगळी वेगळी थीम असते.

यावर्षीची थीम आहे care and share. ही थीम आपण कशी आचरणात आणायची ते बघूया –

आपल्या आसपास असणाऱ्यांची आणि ज्यांना गरज आहे अशांची नेहमी काळजी करणे, काळजी घेणे आणि आनंद पसरविणे. नेहमी सोशल मीडिया वरती सकारात्मक संदेश पाठवणे. लोकांची काळजी घेणाऱ्या सामाजिक संस्थांमध्ये सहभागी होणे किंवा त्यांना सहकार्य करणे आणि आनंद सगळीकडे पसरवणे.

हे सगळे करण्याकरता सगळ्यात महत्त्वाचे काय असेल तर आपण स्वतः आनंदी असणे आणि ते पण 24/7, हे फार महत्त्वाचे आहे.

आनंदी राहणे हा माझा जन्मसिध्द हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच, हे आपल्या सगळ्यांचच्  ब्रीदवाक्य असायला पाहिजे. आनंदी राहायला आवडत नाही, अशी व्यक्ति शोधून पण सापडणार नाही; आणि कायम आनंदी आहे, अशी व्यक्ति पण शोधून सापडणार नाही. म्हणूनच म्हणतात, “आनंदी  माणसाचा सदरा कुणाकडेच मिळू शकत नाही”. जेव्हा हा वाक्-प्रचार अस्तित्वात आला, तेव्हा सगळ्याच स्त्रिया कायम आनंदी असाव्यात; आणि म्हणूनच हा वाक्-प्रचार फक्त माणसाचा सदरा, या शब्दानी प्रचलित झाला असावा. जमाना बदलला, स्त्रियांनी शर्ट म्हणजे सदरा आणि पॅन्ट घालायला सुरुवात केली, आणि आता सरसकट सगळेच सदरा घालणारे, म्हणून हा वाक्-प्रचार आता सगळ्यांनाच  लागू होतो आहे.

मन आनंदी ठेवण्याकरता आनंद कुठून पकडून आणावा लागत नाही, आणि तो पकडून आणता पण येत नाही. आनंद हा सगळीकडे असतोच. आपण आपले ताण – तणाव, रागीटपणा, चिडचिडेपणा, प्रत्येक गोष्टीत “मी आणि माझे”, हे  जर आपण दूर करू शकलो, तर आनंद आपोआपच प्रकट होतो. अंधार आणि उजेड यांच्या सारखेच हे  नाते आहे. अंधार कुठून पकडून आणता येत नाही. उजेडाचा अभाव झाला, तर आपोआपच अंधार होतो.

कसे जगावे, कसे आनंदी राहावे, हे शिकण्याकरता निसर्ग हा उत्तम गुरु आहे असे म्हणतात. मोठे वृक्ष आनंदानी डोलत असतात आणि छोटे गवत पण तेवढ्याच आनंदानी डोलत असते. काही झाडांची फुले देवाला आवडतात, म्हणून ती तोडून देवाला वाहतात, म्हणून ही  झाडे आनंदी असतात. काही झाडांची फुले देवाला वहात नाहीत. आपली फुले कुणी तोडत नाहीत, म्हणून ही झाडे पण खुश असतात. काही झाडांना लाल फुले लागतात म्हणून ती खुश असतात, तर कुणाला पिवळी फुले लागतात, म्हणून ती खुश असतात. एकमेकांशी तुलना नाही, एकमेकांविषयी मत्सर नाही, एकमेकांचे पाय ओढणे नाही. फक्त आनंद आणि आनंद.   

नारळाचे झाड सरळ वर वर जाते. सूर्याची उन्हे अंगावर घेणे हाच त्याचा आनंद असतो. समजा बाजूला एखादा मोठा वृक्ष असेल आणि त्याच्या फांद्या  नारळाच्या वर येत असतील तर नारळाचा मार्ग खुंटणार आणि त्याचा आनंद संपणार. फांद्या बाजूला सारून वर जाणे आपल्याला शक्य नाही , हे नारळ ओळखून असतो. थांबला तो संपला, हे पण नारळाला माहित असते. अशावेळेस आपल्या झावळ्या आणि नारळ असा  भला मोठा पसारा घेऊन झाड चक्क तिरपे होते आणि सूर्य प्रकाश घेण्याकरता जिथे वाट दिसेल तिकडे वळून पुन्हा सरळ वर जायला सुरुवात करते.

आनंदी राहायचेच, असे जर आपण ठरवले, तर आसपासच्यांना न दुखावता, थोडे ऍडजेस्ट करत करत, आपण आपले ध्येय नक्कीच पूर्ण करू शकतो, हेच नारळाकडून शिकायचे आहे. प्रत्येक झाडाकडून अशाच प्रॅक्टिकल टिप्स मिळू शकतात. म्हणूनच जाणकार सांगत असतात – निसर्गात रमा.  

आपण बहुतेक जण आनंदी नसण्याचे आणखीन एक कारण म्हणजे, घरातल्यांनी किंवा इतर कुणी कसे रहावे, कसे वागावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, हे बऱ्याच जणांना   समजत नसते. आणि यामुळे घरामधे आणि बाहेर, रोजच क्षुल्लक कारणांवरून अप्रिय परिस्थिती तयार होत असते. अप्रिय परिस्थिती आली, म्हणजे ताणतणाव सुरु होतात आणि आनंद गायब होतो. इतरांना बदलवण्यापेक्षा, स्वतःला थोडेसे  बदलणे खूप सोपे असते. मी रस्त्यानी चाललो आहे आणि डोळ्यावर ऊन येते आहे. सूर्य लवकर हलणार नाही, हे आपल्याला माहित असते, तरीपण आपण उन्हाला शिव्या मोजतो, ग्लोबल वॉर्मिंग च्या नावानी तणतण करतो आणि दुःखी होतो. त्यापेक्षा आपला मार्ग आपण थोडा बदलला किंवा डोळ्यांवर गॉगल घातला, तरी आपले रस्त्यावर चालणे सुकर होऊ शकते. माझा आनंद मीच शोधणार आहे, आणि पर्याय उपलब्ध आहेत, हे समजणे  महत्वाचे असते. 

“आनंदी राहणे हा माझा जन्मसिध्द हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच ” असे जर आपण आजच्या शुभ दिवशी ठरवले आणि योग्य विचारसरणीने वाटचाल सुरू केली, तर आनंदी माणसाचा सदरा माझ्याकडे आहे, असे आपण खात्रीशीर रित्या म्हणू शकू. आणि आनंदी माणूस जिथे जिथे जातो तिथे तिथे आनंदी वातावरण निर्माण होते हे आपण जाणतोच.

आजच्या जागतिक आनंद दिनाच्या तुम्हाला, तुमच्या परिवार सदस्यांना आणि मित्रमंडळींना शुभेच्छा….

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments