सुश्री प्रभा सोनवणे
☆ मी प्रभा… रत्नागिरीचा रम्य परिसर – लेखांक#2☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
अकरावी पास झाल्यावर मी शिरूरला सी.टी.बोरा काॅलेजला प्रवेश घेतला. राणी गायकवाड आणि मी अगदी सख्ख्या मैत्रिणी ! काॅलेजमधे मी आर्टसला गेले तर ती काॅमर्सला! काॅलेजमध्ये प्रवेश घ्यायच्या आधीच तिचं माझं किरकोळ कारणांवरून भांडण झालं. आम्ही शाळेत असताना काॅलेजमधला एक मुलगा आमच्या मागं लागलाय, असं राणीच्या भावाला कुणीतरी सांगितलं. मग त्यानं त्याला बरीच मारहाण केली होती. आम्ही काॅलेजमधे गेल्यावर तो मुलगा आमच्या दोघींशी बोलू इच्छित होता, पण आम्ही त्याच्याशी बोललो नाही. पण एक दिवस तो मला लायब्ररीत भेटला आणि काही पुस्तकं वाचायला दिली. मी त्याच्याशी बोलू लागले, तो मला म्हणाला, “राणीने मला मार बसवला, मी तिचा बदला घेणार आहे “! त्या काळात मी राणीशी बोलत नव्हते, आमची मैत्री तुटली याचा काहीजणांना आनंद झाला होता. पण दिवाळीच्या आधी आम्ही बोलू लागलो. आमची मैत्रीण संजू कळसकरनी आमच्यात समझौता घडवून आणला! दुस-या दिवशी आम्ही दोघी काॅलेजमधे बरोबर गेलो, राणी म्हणाली ‘चल आपण त्याला सांगू ‘ आम्ही बोलायला लागलो, तर तो आमच्याशी भांडायला लागला, आणि म्हटला, “तुम्ही दोघी माझ्या घरी चला”. राणी म्हणाली मी नाही येणार आणि ती घरी निघून गेली. पण मी गेले त्याच्या घरी ,मला त्यात काही अनैतिक वाटले नाही. खरोखर ते फक्त एक भांडण होते,पण संशयास्पद वातावरण निर्माण झाले एवढे नक्कीच. तो खूपच चिडलेला होता, पण तो माझ्याशी काही गैरवर्तन करेल असं मला मुळीच वाटलं नाही. त्याची आई म्हणाली जेऊन जा, त्याची बहीण एक वर्ष आमच्या वर्गात होती तिनं ताट वाढलं, तेवढ्यात तिथे पवारांचा नोकर मला न्यायला आला. कारण अशी अफवा पसरली की मी त्या मुलाबरोबर पळून गेले! तो मुलगा त्या अर्थाने मला कधीच आवडला नव्हता. त्याच्याबद्दल माझ्या मनात प्रेम, आकर्षण मुळीच नव्हतं, राणीलातरी तो कधी काळी आवडला होता. एकदा आम्ही “होली आयी रे” सिनेमा पहायला गेलो, तेव्हा ती प्रेमेन्द्रला पाहून म्हणाली होती, “हा त्या पोरासारखाच दिसतो ना,तो आवडतो मला “! जो मुलगा मला कधीच आवडला नव्हता त्याच्याबरोबर पळून गेल्याच्या अफवेमुळे मला काॅलेज सोडावं लागलं. मला काहीच न विचारता माझे आईवडील मला गावाला घेऊन गेले आणि मी स्वतःला निर्दोष शाबित करू शकले नाही. दिवाळीच्या सुट्टीत आजोळी गेल्यावर या विषयावर चर्चा झाली. काका म्हणाले “काॅलेजमधे अशा गोष्टी होणारच!” पण माझ्यासमोर कोणी बोलत नव्हतं ,माझी मानसिकता जाणून घ्यायचा कोणी प्रयत्न केला नाही, माझं “लव अफेअर” असल्याचं गृहित धरलं होतं जणू ! मला त्या गोष्टीचा प्रचंड मानसिक त्रास झाला.
माझी आई म्हणाली ‘ तू काही दिवस इथे रहा.’ माझी मावशी त्या काळात रत्नागिरीला रहात होती. थोडे दिवस आजीआजोबांकडे राहिल्यानंतर मी मावशीकडे रत्नागिरीला गेले !
रत्नागिरी हे मला आवडलेलं नितांत सुंदर शहर. तिथे मला अंजू पिंगळे नावाची मैत्रीण मिळाली. काका एसटीमध्ये ऑफिसर होते आणि एसटीच्या ऑफिसर्स क्वार्टर्समध्ये रहात होते. मावशीचा फ्लॅट खूपच सुंदर होता आणि तिनं तो ठेवलाही खूप सुंदर होता !
त्याच बिल्डींग मध्ये रहाणा-या ठाकुरकाकींची मैत्रीण लेखिका कुसुम अभ्यंकर होत्या. त्या एकदा मला भेटल्या. मी त्यांच्या वाचलेल्या कादंब-यांची नावं सांगितली, त्या माझ्याशी खुप छान बोलल्या !
मावशी आणि तिच्या मैत्रीणींबरोबर मी हेदवी, गुहागर, आणि आजूबाजूच्या ब-याच ठिकाणच्या सहली केल्या. रत्नागिरी मला इतकं आवडलं होतं की मला आयुष्यभर रत्नागिरीत रहायला आवडलं असतं ! खूपच निसर्गरम्य परिसर आहे. वाईटातून काही चांगले घडत होते, काळजावरचे चरे नंतरच्या काळात कवितेत उतरले !
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
धन्यवाद हेमंत सर! मंजुषा मॅडम धन्यवाद!