सुश्री प्रभा सोनवणे

? आत्मकथन ?

☆ मी प्रभा… स्वाध्यायचे दिवस – लेखांक#3☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

रत्नागिरीला मावशीकडे चार  महिने राहिल्यानंतर मी परत आजीआजोबांकडे आले. आजी म्हणाली, “ तू पुण्याला जा आणि काॅलेजचं शिक्षण पूर्ण कर. तुझा मोठा भाऊ शिकतो, धाकटी बहिण शिकते, लोकांना वाटेल ही काय ढ आहे की काय?” मी ढ नव्हते पण अभ्यासूही नव्हते !

मी पुण्यात  गोखलेनगरला रहाणा-या काकींकडे राहून स्वाध्याय या बहिःस्थ विद्यार्थ्यांसाठी असलेल्या महाविद्यालयात प्रवेश घेतला. मी बसने जात, येत होते. स्वाध्यायमधले दिवस खूपच अविस्मरणीय ! तिथे माझ्या आयुष्याला नव्याने पालवी फुटली. आमचा वर्ग खूप मोठा होता. कुलकर्णी आणि पुरोहित या दोघी गृहिणी स्वाध्यायच्याच बिल्डींगमध्ये रहायच्या आणि माझ्याशी खूप प्रेमाने वागायच्या !

आमच्या वर्गात एक नन होती. आम्ही त्यांना सिस्टर म्हणत असू, मी एकदा सिस्टरला म्हटलं,

‘मला पण नन व्हायचंय,’ तर त्या म्हणाल्या “हा मार्ग खूप कठीण आहे, आणि तुझ्यासाठी नाही !”

वार्षिक स्नेहसंमेलनात मी अनेक कार्यक्रमात सहभागी झाले. गोखले हाॅलमधे हे संमेलन होत असे. या संमेलनात मी पहिल्यांदा माझ्या कविता व्यासपीठावर सादर केल्या. पुरोहित बाई आणि मी ज्या कविसंमेलनात होतो त्या कविसंमेलनात कवी कल्याण इनामदार पण होते. आम्हाला दोन कविता आणि कल्याण इनामदार यांना चार कविता सादर करायला सांगितल्या, ही गोष्ट पुरोहित बाईंना खटकली होती. त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या, ” ते प्रसिद्ध कवी असले तरी स्वाध्यायचे विद्यार्थीच आहेत  !”

मी  एकांकिका स्पर्धेतही सहभागी होते, आणि मला उत्कृष्ट अभिनयाचं पारितोषिकही मिळालं होतं! त्यावेळी लिमये सरांनी विचारले होते, “व्यावसायिक  रंगभूमीवर काम करणार का?” पण ते कदापीही शक्य नव्हतं!

एकदा आम्ही सहा सातजणी काॅलेज बुडवून निलायमला “फूल और पत्थर” हा सिनेमा पहायला गेलो होतो, दुस-या दिवशी सरांनी कडक शब्दात समज दिली होती,

मराठी कुलकर्णी सर, हिंदी धामुडेसर, अर्थशास्त्र लिमये सर आणि इंग्लिश  महाजन सर शिकवत. धामुडेसरांनी मला मुलगी मानलं होतं!

आमच्या वर्गात माधुरी बेलसरे नावाची एक व्याधीग्रस्त मुलगी होती, तिला नीट चालता येत नव्हतं.  तिला स्वाध्याय मध्ये तिची बहिण घेऊन यायची, तिचं नाव शुभदा ! शुभीशी माझी खूप छान मैत्री झाली. माधुरी गोखले ही सुद्धा चांगली मैत्रीण होती ! त्या काळात माझा मोठा भाऊ एस.पी.काॅलेजला आणि धाकटी बहिण गरवारे काॅलेज मध्ये शिकत होते.  ते दोघं हाॅस्टेलवर रहात होते.

स्वाध्यायमध्ये माझ्या कलागुणांना वाव मिळाला. अवतीभवती कौतुक आणि प्रेम वाटणारी माणसं होती. वर्गातल्या सविता जोशी आणि माळवे बाईही खूप कौतुक करायच्या !

माझ्या आयुष्यात स्वाध्याय- पर्व खुप महत्वाचे आहे.

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
image_print
1.5 2 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Prabha Sonawane

धन्यवाद ?