सुश्री प्रभा सोनवणे
आत्मकथन
☆ मी प्रभा… मुक्काम सोमवार पेठ – लेखांक#4☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
सोमवार पेठेतल्या सोनवण्यांचं स्थळ आमच्या एका नातेवाईकांनी सुचवलं. सोनवणे हे दूधवाले सोनवणे म्हणून प्रसिद्ध होते, गावाकडे शेतीवाडी !पुण्यात लाॅजिंगचा व्यवसाय! मुलगा पदवीधर, उंच,सावळा नाकीडोळी नीटस !
नोव्हेंबरमध्ये साखरपुडा पिंपरीच्या वाड्यात आणि २६ जानेवारी १९७७ ला लग्न पुण्यात झालं !
एकत्र कुटुंब सासूबाई, दीर, जाऊबाई, त्यांची छोटी मुलगी, दुधाचा आणि लाॅजिंगचा व्यवसाय !
चाकोरीबध्द आयुष्य– बायकांचं आयुष्य चार भिंतीत बंदिस्त ! सात आठ वर्षे जगून पाहिले तसे, पण नाही रमले. १९७७ साली लग्न, १९७८ साली मुलगा झाला.
मी, सासूबाई, जाऊबाई मिळून स्वयंपाक करत असू, इतर सर्व कामाला बाई आणि नोकर चाकर होते. आयुष्य चाकोरीबध्द, जुन्या वळणाचं वातावरण, हातभार बांगड्या, डोईवर पदर, उंबरठ्याच्या बाहेरचं जग माहित नसलेलं आयुष्य !
शाळेत असताना कविता करत होते, कथा कविता प्रकाशितही झाल्या होत्या. लग्नानंतर थांबलेली कविता उफाळून वर आली. लिहू लागले. कथा, कविता, लेख प्रकाशित होऊ लागले ! देवी शारदेच्या कृपेने एम.ए.पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं ! पीएच.डी. साठीही नाव नोंदवलं, पण स्वतःच्या आळशीपणामुळेच पूर्ण होऊ शकलं नाही. घटना घडत गेल्या…वादळ वारे आले, गेले….संसार टिकून राहिला. कविता प्रकाशित झाल्या. कवितेला व्यासपीठ मिळालं, स्वतःची ओळख मिळाली. संमेलनाच्या निमित्ताने प्रवास घडले, दिवाळी अंकाचे संपादन केले ! साहित्य क्षेत्रातली ही मुशाफिरी निश्चितच सुखावह….मी इथवर येणं ही अशक्यप्राय गोष्ट होती…..पण आयुष्य पुढे सरकत राहिलं…मुलाचं मोठं होणं…इंजिनियर होणं…चांगला जाॅब मिळणं, आणि एक चांगला मुलगा म्हणून ओळख निर्माण होणं. कामवाली जेव्हा म्हणाली, ” मी सांगते सगळ्यांना,आमच्या सोनवणेवहिनींचा मुलगा म्हणजे सोनं आहे ,सोनं सुद्धा फिकं आहे त्याच्यापुढे,” तेव्हा मी भरून पावले. निश्चितच! ही दैवगती ! आयुष्य कटू गोड आठवणींनी भरलेलं !
चारचौघींपेक्षा माझं आयुष्य वेगळं आहे हे नक्की ! हे वेगळेपण पेलणं निश्चितच कठीण गेलं !औरंगाबादच्या गझल संमेलनात मा.वसंत पाटील म्हणाले होते, ” कवी/कलावंत हा शापित असतो, तो तसा असावा लागतो,”– ते मला माझ्या बाबतीत शंभर टक्के पटलं आहे ! जसं जगायचं होतं तसं जगता आलं नाही…पण जे जगले ते मनःपूत आणि तृप्त करणारंही….कवितेची नशा ही वेगळीच आहे…..ती झिंग अनुभवली !” अल्प, स्वल्प अस्तित्व मज अमूल्य वाटते, दरवळते जातिवंत खुणात अताशा ” ही अवस्था अनुभवली ! मुलाचं लग्न…नातवाचा जन्म..सगळं सुखावह !
वाढतं वय …आजारपण ..सुखदुःखाचा खेळ ! जगरहाटी…अपयश, उपेक्षा, अपेक्षाभंग….या व्यतिरिक्तही आयुष्य बरंच काही भरभरून देणारं !
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]