सुश्री प्रभा सोनवणे

? आत्मकथन ?

☆ मी प्रभा… मुक्काम सदाशिव पेठ – लेखांक# 5 ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

आम्ही १९६० साली पुण्यात रहायला आलो, तेव्हा मी चार वर्षांची होते. आम्ही भिकारदास मारूतीजवळ पायगुडे वाड्यात रहात होतो, तळमजल्यावर घरमालक म्हणजे आईच्या आत्यांचे कुटुंब, पहिल्या मजल्यावर “स्वस्तिक चष्मा” चे पाटोळे आणि दुस-या मजल्यावर आम्ही रहात होतो.  शेजारी जादूगार रघुवीर यांचा बंगला होता– “जादूची शाळा”.  त्या बंगल्या विषयी अनेक अफवा होत्या, टाळ्या वाजवल्या की दिवे लागतात.आपोआप दारं उघडतात वगैरे. जादूगार रघुवीर दिसले की खूप छान वाटायचं, एखाद्या फँन्टसी सिनेमाचा नायक दिसल्यासारखे !

मी माँटेसरीत असल्यापासूनच्या या आठवणी !

याच काळात आमच्याकडे मुंबईहून नुकतंच लग्न झालेले मामा मामी आले होते, आणि मी त्यांच्याबरोबर “जंगली” हा आयुष्यातला पहिला  सिनेमा पाहिला होता !

घरासमोरच्या ग्राउंडवर आम्ही खेळायला जायचो.  त्या जागेवर नंतर टेलिफोन ऑफिस झालं.  असेच एकदा त्या ग्राउंडवर आम्ही खेळायला गेलो होतो. आमची आई पलिकडे बसली होती. तिच्या जवळ दोन मुली आल्या आणि म्हणाल्या, ‘ तुम्ही अगदी आमच्या मोठया बहिणीसारख्या दिसता,’. अशी ओळख झाली आणि नंतर त्या दोघी आईच्या मैत्रिणी झाल्या ! खूप साधे सरळ लोक होते सगळे. आम्ही आईच्या आत्यांच्या वाड्यात रहात होतो. पाटोळे आणि आम्ही दोनच भाडेकरू! नंतर पाटोळेनी स्वारगेटला बंगला बांधला!

आम्ही सरस्वती मंदिर शाळेत जायचो. दुसरीत असताना मला भावेबाई गॅदरींगमध्ये सहभागी करून घेण्यासाठी नृत्य शिकवत होत्या, पण मला नाचता आलं नाही. आणि ही खंत मनात कायम आहे ! १२ जुलै १९६१ हा पानशेतचं धरण फुटलं तो दिवसही आठवतोय.  आमच्या घराजवळ पुराचं पाणी आलं नव्हतं, पण एक साधू सांगत आला, भिकारदास मारूती पोलिस चौकीजवळ पाणी आलंय.  मग आम्ही पर्वतीजवळ राहणा-या नातेवाईकांकडे गेलो होतो, एवढंच आठवतंय.  त्या पुराचं गांभीर्य त्या वयात कळलं नव्हतं !

पुण्यात अनेक नातेवाईक होते. पासोड्या विठोबाजवळही आमचे एक नातेवाईक रहात होते, भाऊमहाराज बोळाजवळही एक नातेवाईक, शुक्रवार पेठेत भागिरथी बिल्डींगमध्येही नातेवाईक होते.  आम्ही एकमेकांकडे जात असू.  खूपच सुंदर पुणं होतं त्या काळातलं !पेशवे पार्क, पर्वती,  तळ्यातला गणपती, या ठिकाणी आम्ही सुट्टीच्या दिवशी जात असू ! हिराबागेत पायगुड्यांचा फर्निचरचा कारखाना होता आणि महात्मा फुले मंडईत माझ्या आजोबांचा फळांचा गाळा होता. “रम्य ते बालपण” म्हणतात ते अगदी खरं करणारा काळ. शेजारी भिकारदास मारूतीचे मंदिर आणि नारद मंदिर होतं ! सदाशिव पेठेबद्दल आपुलकी आजतागायत टिकून आहे. खरंच ते सोनेरी दिवस होते.

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

3 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Prabha Sonawane

मुक्काम-सदाशिव पेठ, असे शीर्षक आहे या लेखाचे

मुक्काम- सोमवार पेठ दुसरा लेख आहे.

अरुण मनपाठक

खुप छान आठ वनी

Prabha Sonawane

Thanks a lot Arun