मराठी साहित्य – समाजपारावरून साप्ताहिक स्तम्भ – ☆ पुष्प सोळावे # 16 ☆ वेड सेल्फीचे ☆ – कविराज विजय यशवंत सातपुते
(समाज , संस्कृति, साहित्य में ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले कविराज विजय यशवंत सातपुते जी की सोशल मीडिया की टेगलाइन “माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक, सांस्कृतिक एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं । इस साप्ताहिक स्तम्भ के माध्यम से वे किसी न किसी सामाजिक अव्यवस्था के बारे में चर्चा करते हैं एवं हमें उसके निदान के लिए भी प्रेरित करते हैं। आज श्री विजय जी ने एक गंभीर विषय “सेल्फी” चुना है। श्री विजय जी ने इस आलेख “वेड सेल्फीचे ” में सेल्फी के कारण होने वाली मृत्यु जैसे गंभीर मुद्दे पर चर्चा की है। ऐसे ही गंभीर विषयों पर आप प्रत्येक शुक्रवार को उनके मानवीय संवेदना के सकारात्मक साहित्य को पढ़ सकेंगे। )
☆ साप्ताहिक स्तंभ –समाज पारावरून – पुष्प सोळावे # 16 ☆
☆ वेड सेल्फीचे ☆
बाह्य रूप छायांकन
सुंदरता चित्रांकन
भारवाही…. !
छबी काढण्यात
सान थोर मोहावले
झणी वेडावले
सेल्फीपायी…. !
या सेल्फीपायी मृत्युमुखी पडलेले अनेक व्यक्ती त्यांची उदाहरणे समोर असताना हे सेल्फीचे वेड काही कमी होत नाही. अजूनही सेल्फी काढताना झालेल्या अपघातात भारतचआघाडीवर आहे. हा आधुनिक तंत्रज्ञान अवलंबिण्याचा अतिरेक आहे असे मला वाटते. समाज पारावरून हा विषय चर्चेला येतो आहे याचे कारण हे सेल्फी वेड एक गंभीर समस्या निर्माण करीत आहे. आत्मकेंद्रित माणसाची मानसिक विकृती म्हणून याचे वर्णन करता येईल.
वेड सेल्फीचे
करी मानव्याचा र्हास
जाणिवांचा श्वास
रोखलेला…. !
सेल्फी काढताना
कधी बेते जीवावर
पडे कलेवर
क्षणार्धात…. !
अतीउत्साहात भावनावश होऊन सेल्फी काढण्याचा मोह होतो. आणि हाचअतिरेक जीवावर बेततो. एका क्षणात आपण सारे जग विसरून सेल्फी साठी नको ते धाडस करायला तयार होतो आणि आपला जीव गमावून बसतो.
महाविद्यालयीन तरुण – तरुणी सेल्फीसाठी जास्त आकर्षित होत आहेत. कारण सुंदरता आणि बडेजाव यांची एकमेकात असलेली स्पर्धा आणि याचे प्रतिनिधीत्व आपण किती छान करू नकतो यांचे सचित्र छायांकन म्हणजे आजचं *सेल्फी वेड*.
फेसबुकी रोज
सोशल नेटवर्किंग नारा
प्रसिद्धीचा मारा
पदोपदी…. !
वेड सेल्फीचे
करी खंडित संवाद
द्वेषवाही वाद
नात्यातून…. !
नात्या नात्यातील संवाद कमी होत चालला आहे. हा मानसिक आजार नाही. पण विकृती आहे. धोका लक्षात घेऊनही आपण दाखवलेला निष्काळजी पणा आपले संपूर्ण आयुष्य बरबाद करू शकतो. अशा मोहापायी जीव गेला तर सुटका झाली असे म्हणून समाधान मानावे लागते. पण जर अपघात होऊन अपंगत्व आले तर मात्र त्याचे दुष्परिणाम त्या व्यक्तीसह संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात.
हात मदतीचा
सेल्फी काढण्यात चूर
अपघाती पूर
आसवांचा…. !
जीव धोक्यात घालुन सेल्फी घेणे, सोशल नेटवर्किंग साईट वर आपल्या धाडसी पणाचे शक्तीप्रदर्शन करणे, ही विकृती आपण थांबवायला हवी.. अशा विचित्र सेल्फी ना आपण डिसलाईक करायला हवे. उलटा अंगठा दाखवून अशा सेल्फी छायाचित्रांचा विरोध केल्याशिवाय हे वेड थांबणार नाही.
लहान मुले, अबालवृध्द, तरूण पिढी असे धाडसी फोटो घेण्यासाठी मुद्दाम ट्रेकिंग सहलीचे आयोजन करीत आहे. गड किल्ले, ऐतिहासिक, सांस्कृतिक, प्राचीन नैसर्गिक पर्यटन स्थळे यांना भेटी देणे केव्हाही चांगले. पण ही भेट ज्ञानवर्धक न ठरता पौढी मिरवणारी स्तुतीसंवर्धक भेट ठरत आहे. हे कुठेतरी थांबायला हवे.
सेल्फी काढण्याची हौस समस्या प्रधान होऊ नये यासाठी केवळ मी माझे विचार पोटतिडकिने मांडतो आहे. कारण कोणते ही सण, उत्सव, वाढदिवस निमित्ताने गेट टूर गेदर आयोजित केले जाते. आणि हे सेल्फी सेल्फी प्रदर्शन सुरू होते. असतं. एरवी एकाच घरात याहूनही एकमेकांशी दिवस दिवस संवाद न साधण्या-या व्यक्ती सेल्फीत मात्र प्रसन्न, हसतमुख चेहर्याने, एकमेकाच्या गळ्यात गळा घालून कौटुंबिक स्नेहाचे प्रदर्शन करतात. याने आपण स्वतः आपल्याला बेगडी दुनियेचे झापड लावून घेतो असे मला वाटते.
अत्यंक धोकादायक ठिकाणी जावुन सेल्फी काढणे हे अशा सहलींचे मुख्य आकर्षण. त्याशिवाय यांचे एकत्रिकरण अशक्य. तेव्हा सेल्फी वेड हे कुणी कसे जोपासायचे हा वैयक्तिक प्रश्न असला तरी यातून मनुष्य हानी होऊ नये आणि या हव्यासाला समाजविघातक वळण लागू नये, इतकीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. धन्यवाद.
© विजय यशवंत सातपुते
यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी, सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.
मोबाईल 9371319798.