मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #19 – नऊ रंगांची वस्त्रे ☆ – श्री अशोक श्रीपाद भांबुरे
श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना एक काव्य संसार है । आप मराठी एवं हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती शृंखला की अगली कड़ी में प्रस्तुत है एकसामयिक एवं सार्थक कविता “धूर्त सारथी”।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 19 ☆
☆ नऊ रंगांची वस्त्रे ☆
नऊ दिवस नऊ रंगांची वस्त्रे लेऊन
ती समाजात मिरवते आहे
तरीही मला नाही वाटत
ती माझी जिरवते आहे
अक्षराच्या माथ्यावर असलेल्या
अनुस्वाराइतकी लाल टिकली
आणि स्लीवलेस ब्लाउजवर
नेसलेली तिची लाल भडक साडी…
मी कपाळभर रेखाटलेलं भाग्याचं कुंकू
ते मात्र तिला असभ्य पणाचं लक्षण वाटतं
आजच्या पिवळ्या रंगालाही
मी सांभाळलंआहे
हळदी कुंकाच्या साक्षीने
हिरव्या रंगाची साडी नसली तरी
हातभार हिरव्या रंगाचा चुडा
असतो माझ्या हातात कायम
निळ्या आकाशाखाली
मी रांधत असते भाकर
गरिबीच्या विस्तवावर
निसर्गाच्या सानिध्यात
राख-मातीने माखलेल्या, राखाडी रंगाच्या
दोनचार जाड्याभरड्या साड्या
आहेत माझ्याकडे, त्याच नेसते मी
ग्रे रंग असेल त्या दिवशी
सकाळी सकाळी सूर्याने केलेली
केसरी रंगाची उधळण
दिवसभरासाठी
उर्जा देऊन जाते मला
पांढऱ्या शुभ्र फुलांचा गजरा
माळला आहे मी केसांच्यावर
त्याचा गंध सोबत करतो मला दिवसभर
आजचा रंग आहे गुलाबी
अगदी माझ्या गालांसारखा
पावडर लावून
पांढराफटक नाही करत मी त्याला
अंगणात लावलेल्या वांग्यानी
परिधान केलेला जांभळा रंग
आज माझ्या भाजीत उतरून
कुटुंबाच्या पोटाची सोय करणार आहे
नऊ रंगांची नऊ वस्त्रे
माझ्याकडे नसली तरी
निसर्गाच्या नऊ रंगांचा आनंद कसा घ्यायचा
हे शिकवलंय मला निसर्गानंच…!
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८