सुश्री ज्योति हसबनीस

 

(सुश्री ज्योति  हसबनीस जीअपने  “साप्ताहिक स्तम्भ – काव्य दिंडी ” के  माध्यम से  वे मराठी साहित्य के विभिन्न स्तरीय साहित्यकारों की रचनाओं पर विमर्श करेंगी. आज प्रस्तुत है उनका आलेख  “मन – कवयित्री बहिणाबाई चौधरी” । इस क्रम में आप प्रत्येक मंगलवार को सुश्री ज्योति हसबनीस जी का साहित्यिक विमर्श पढ़ सकेंगे.)

 

☆साप्ताहिक स्तम्भ – काव्य दिंडी # 4 ☆

 

☆ मन – कवयित्री बहिणाबाई चौधरी ☆ 

 

मनोव्यापार….माणसाचं मन हा अतिशय गूढ, गहन,  अनाकलनीय आणि तितकाच गुंतागुंतीचा विषय आहे. बहुरूपी, बहुढंगी मनाचे विभ्रम तर बघा जरा, घरी असलो तर बाहेर मोकाट, बाहेर असलो तर घरी सुसाट, देवासमोर श्लोक म्हणतांना देखील आजूबाजूच्या हालचाली टिपण्याचं त्याचं कसब विलक्षण ! कितीही रंजक पुस्तक हातात असू दे खिडकीतून दिसणा-या झाडाच्या फांद्या न्याहाळण्यात ते दंग ! परीक्षा संपण्याधीच त्याचे सुट्टीतले मनसुबे तयार. अप्रिय विषयाला पूर्णविराम न देता त्याचा चघळचोथा करण्यात आनंद मानावा तो त्यानेच ! एखाद्याबद्दलचा आकस, पूर्वग्रह गोंजारत त्याला अढळपद देण्याची दिलदारी दाखवावी ती देखील त्यानेच ! पा-यालाही मागे टाकणारी त्याची चंचलता, वा-यालाही लाजवेल असा त्याचा वेगवान मुक्त संचार, प्रसंगी खुपणारा त्याचा कोतेपणा,तर प्रसंगी गगनाला गवसणी घालणारा त्याचा मोठेपणा…छे..नाही थांग लागत, सारंच अनाकलनीय !

आज काव्यदिंडीतलं तिसरं पाऊल टाकतांना माहेरच्या आठवणीने भरून येतंय, कारण मी बोट धरलंय माझ्या माहेरच्या मायेच्या माणसाचं, खानदेशच्या सुप्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरींचं !

 

☆ मन ☆

 

मन वढाय वढाय

उभ्या पिकातलं ढोर

किती हाकला हाकला

फिरी येतं पिकावर

 

मन मोकाट मोकाट

त्याले ठायी ठायी वाटा

जशा वा-यानं चालल्या

पान्याव-हल्यारे लाटा

 

मन लहरी लहरी

त्याले हाती धरे कोन

उंडारलं उंडारलं

जसं वारा वाहादन

 

मन जह्यरी जह्यरी

ह्याचं न्यारं रे तंतर

अरे इचू साप बरा

त्याले उतारे मंतर !

 

मन पाखरू पाखरू

त्याची काय सांगू मात ?

आता व्हतं भुईवर

गेलं गेलं आभायात

 

मन चप्पय चप्पय

त्याले नाही जरा धीर

तठे व्हयीसनी ईज

आलं आलं धरतीवर

 

मन एवढं एवढं

जसा खाकसचा दाना

मन केवढं केवढं ?

आभायात बी मायेना

 

देवा कसं देलं मन

अास नाही दुनियात !

आसा कसा रे तू योगी

काय तुझी करामत !

 

देवा आसं कसं मन ?

आसं कसं रे घडलं

कुठे जागेपनी तूले

असं सपनं पडल !

 

© ज्योति हसबनीस,

नागपुर  (महाराष्ट्र)

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments