मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ? रंजना जी यांचे साहित्य #-2 गड किल्ले ? – श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

(श्रीमती रंजना मधुकरराव लसणे जी हमारी पीढ़ी की वरिष्ठ मराठी साहित्यकार हैं।  सुश्री रंजना इस एक अत्यंत संवेदनशील शिक्षिका एवं साहित्यकार हैं।   सुश्री रंजना  जी का साहित्य जमीन से  जुड़ा है  एवं समाज में एक सकारात्मक संदेश  देता है।  निश्चित ही उनके साहित्य  की अपनी  एक अलग पहचान है। अब आप उनकी अतिसुन्दर रचनाएँ प्रत्येक सोमवार को पढ़ सकेंगे।  आज प्रस्तुत है  ऐतिहासिक कविता  – गड किल्ले )

? रंजना जी यांचे साहित्य #-2 ? 

 

☆ गड किल्ले  ☆

 

गड कोट किल्ले सारे

शिवबांना जीवप्राण।

एक एक चिरा सांगे

माझ्या  मावळ्यांची आण।

 

घडे नवा इतिहास

साक्ष देई शिवनेरी।

येई जन्माला शिवबा

जणू पर्व हे सोनेरी।

 

ज्यांचे किल्ले त्यांचे राज्य

मंत्र आगळा स्मरून।

स्वराज्याचे बांधी तोरण

शाही थाट सांभाळून।

 

भासे वाघांची ती जाळी

असे मोऱ्यांची जावळी।

किल्ला रायरी शोभला

राजधानी ही आगळी।

 

कावा गनिमी साधला

किल्ले भक्कम बनून।

बसवी वचक गोऱ्यांना

किल्ले  सागरी बांधून।

 

प्राण पणाला लावले

प्रति शिवाजी बनून।

वार जीवाने झेलला

शिवा वाचावा म्हणून ।

 

चिरे  प्रतापगडाचे

सांगे प्रताप राजांचे ।

युक्तीवाद जिंकला रे

सैन्य हैराण लाखांचे।

 

करी रक्ताने पावन

खिंड  लढवय्या बाजी।

लाथाडतो शाही कौल

स्वामी निष्ठ वीर  बाजी।

 

सिंह गड नाव सार्थ

नरसिंह तानाजींचे।

लग्न रायबाचे सोडी

लग्न करी कोंढाण्याचे।

 

घोडदौड स्वराज्याची

गड शेकडो गाठीशी ।

माझ्या राजाच्या रक्षणा

उभा मावळा पाठीशी ।

 

असो त्रिवार नमन

माझ्या राजांच्या चरणी।

ज्याच्या पदस्पर्शाने ही

झाली पुनीत धरणी।

 

©  रंजना मधुकर लसणे✍

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105