सुश्री ज्योति हसबनीस
(सुश्री ज्योति हसबनीस जीअपने “साप्ताहिक स्तम्भ – काव्य दिंडी ” के माध्यम से वे मराठी साहित्य के विभिन्न स्तरीय साहित्यकारों की रचनाओं पर विमर्श करेंगी. आज प्रस्तुत है उनका आलेख “चंद्रकळा – कवयित्री शांताबाई” । इस क्रम में आप प्रत्येक मंगलवार को सुश्री ज्योति हसबनीस जी का साहित्यिक विमर्श पढ़ सकेंगे.)
☆साप्ताहिक स्तम्भ – काव्य दिंडी # 5 ☆
☆ चंद्रकळा – कवयित्री शांताबाई ☆
काव्य दिंडीचा आजचा चौथा दिवस ! उद्यापासून दिंडीचा भोई बनून येत्येय माझी अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेली रसिक विदुषी मैत्रिण, सौं अनघा नासेरी ! श्वेताने दिलेलं सस्नेह निमंत्रण आणि पर्यायाने
एका उत्सवात सामील झाल्याचा आनंद, त्या आनंदात पडलेली पावलं, आणि आता हळूच काढतं पाऊल घेण्याची आलेली वेळ. एक विचित्र हुरहूर मनाला लागली असतांनाच शांताबाईंची अपूर्व शब्दसाजातली, भावगर्भरेशमी, देखणी ‘चंद्रकळा’मनात भरली. तिचा गहिरा रंग, तिचा मुलायम स्पर्श एका अनोख्या भावविश्वात घेऊन गेला, आणि आठवणींचं मोहोळ उठलं ते त्या चंद्रकळेला बिलगूनच़! निर्व्याज निरागस बाल्य, मुग्ध किशोरावस्था, अवखळ, नवथर तारूण्य, परिपक्व, जवाबदार प्रौढ कर्तेपण, जीवनातल्या ह्या सा-याच टप्प्यांचे भावबंध ह्या चंद्रकळेतच गुरफटलेत ह्याची जाणीव झाली, आणि जाणीव झाली ती एका हळव्या टप्प्याची…मावळतीच्या वाटचालीची ! आयुष्यातला रंगोत्सव आता ओसरलाय, ऐन भरातल्या चंद्रकळेची गहिरी रंगछटा आता फिकट होतेय, तिची घप्प वीण आता विसविशीत झालीय, याचा अपरिहार्यपणे स्वीकार करतांना काळजात कळ उठतेच, चंद्रकळेची ओसरणारी रूपकळा बघून नकळतपणे एक खिन्न उसासा बाहेर पडतोच !
अप्रतिम वीणीची ही ‘चंद्रकळा’ शांताबाईंच्या तरल संवेदनक्षम स्पंदनांचा नादमय झंकारच ठरावा !
☆ चंद्रकळा ☆
आठवणीतिल चंद्रकळेचा
गर्भरेशमी पोत मऊ
गर्भरेशमी पदरापोटी
सागरगोटे नऊखऊ
आठवणीतिल चंद्रकळेवर
तिळगुळनक्षी शुभ्र खडी
कल्पनेत मी हलक्या हाती
उकलून बघते घडीघडी
आठवणीतिल चंद्रकळेचा
हवाहवासा वास नवा
स्मरणाने अवतीभवती
पुन्हा झुळझुळे तरूण हवा
आठवणीतिल चंद्रकळेच्या
पदराआडून खुसूखुसू
जरा लाजरे, जरा खोडकर
पुन्हा उमटते गोड हंसू
आठवणीतिल चंद्रकळेवर
हळदीकुंकू डाग पडे
संक्रांतीचे वाण घ्यावया
पदर होतसे सहज पुढे
आठवणीतिल चंद्रकळा ती
जीर्ण होऊनी आज विटे
उदास फिकट रंगाआडून
एक उसासा क्षण उमटे
© ज्योति हसबनीस,
नागपुर (महाराष्ट्र)