मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ? मी_माझी – #6 – आठवण…. ? – सुश्री आरूशी दाते
सुश्री आरूशी दाते
(स्तुत है सुश्री आरूशी दाते जी के साप्ताहिक स्तम्भ – “मी _माझी “ शृंखला की छठवीं कड़ी आठवण …। इस शृंखला की प्रत्येक कड़ियाँ आप आगामी प्रत्येक रविवार को पढ़ पाएंगे। )
मी_माझी – #6 – आठवण…
कशाची??? आनंदी क्षणांची, प्रेमाची, हास्याची, दुःखाची, सुखाची, अपमानाची, यशाची, अपयशाची, कौतुकाची…
अनेक क्षण मनात घर करून असतात, त्यांना विसरता येत नाही… त्या क्षणांच्या आठवणी भूतकाळातील प्रसंग विसरू देत नाहीत…मग ह्या गोष्टी आठवत आठवत वर्तमान जगायचा आणि ह्याच वर्तमानाचा भूतकाळ जेव्हा होतो, तेव्हा उराशी बाळगलेल्या काही आठवणी पुसट व्हायला लागतात… असा भास होतो….आठवणी अगदी नव्या सारख्या असतात, फक्त त्याची तीव्रता कमी होते…
आपण कितीही नको म्हटलं तरी आठवणींचा मागोवा सतत घेत असतो, असं केल्याने काय मिळतं? काय मिळतं हे नक्की सांगता येणार नाही… म्हणजे कधी आसू तर कधी हसू… पण हे सगळं हवंहवंसं असतं… त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तरी बऱ्याच वेळा आपण त्यातच गुंतत जातो… कदाचित ते सोयीस्कर असावं…
आठवणींचा उपयोग नक्कीच होतो… काही ज्ञानवर्धक असतात, काही आठवणी नात्यांना नवीन अर्थ देतात, अपेक्षांचं ओझं पेलायला ताकद देतात, व्यक्ती म्हणून आयुष्याकडे बघायचा एक वेगळाच दृष्टिकोन देतात, ह्या कृत्रिम जगात स्वतःला सिद्ध करत असताना पदरी असलेल्या अनेक आठवणींनी गर्भ रेशमी वस्त्र विणलं जातं जे आपलं आयुष्य झाकायला मदत करतं…
सरणावरती जळताना हे वस्त्र जळालं तरी आपल्या कर्तृत्वाच्या आठवणी मागे ठेवून जातो… आठवणींचा हा ससेमिरा कोणालाच चुकला नाही, हो ना!
© आरुशी दाते