सुश्री ज्योति हसबनीस
(सुश्री ज्योति हसबनीस जीअपने “साप्ताहिक स्तम्भ – काव्य दिंडी ” के माध्यम से वे मराठी साहित्य के विभिन्न स्तरीय साहित्यकारों की रचनाओं पर विमर्श करेंगी. आज प्रस्तुत है उनका आलेख “अनाम वीरा – कुसुमाग्रज ” . ज्ञानपीठ पुरस्कार से सम्मानित सुप्रसिद्ध मराठी साहित्यकार स्व विष्णु वामन शिरवाडकर अपने उपनाम कुसुमाग्रज के नाम से जाने जाते हैं। इस क्रम में आप प्रत्येक मंगलवार को सुश्री ज्योति हसबनीस जी का साहित्यिक विमर्श पढ़ सकेंगे.)
☆साप्ताहिक स्तम्भ – काव्य दिंडी # 6 ☆
☆ अनाम वीरा – कुसुमाग्रज ☆
श्वेता, तुमच्या ह्या अनोख्या काव्यदिंडीत मला चार पावलं चालायची संधी दिल्याबद्दल तुला मनापासून धन्यवाद ! ठेक्यात कविता म्हणता म्हणता तिच्या रस, रंग, गंधाची मोहिनी मनाला कधी पडली हे कळलंच नाही. आणि सुरू झाली एक रसयात्रा ! गदिमा, बाकिबाब, विंदा या शब्दप्रभूंच्या प्रासादिक शब्दवैभवाने कधी मनावर गारूड केले तर कधी शांताबाई, बालकवि, ना. धों.च्या वासंतिक शब्दलावण्याची मनाला भुरळ पडली. दिंडीतली पावलं कोणाचं बोट धरून टाकावीत हा माझ्यासाठी मोठा यक्षप्रश्न ! माझे आराध्यदैवत कुसुमाग्रज यांच्या कवितेचं बोट धरून पहिलं पाऊल टाकायला मला खुप आवडेल !
अत्यंत तरल आणि संवेदनक्षम अभिव्यक्ती लाभलेल्या ह्या कविश्रेष्ठाने केलेलं हे एक कृतज्ञ स्मरण. तहान भूक विसरून, मायापाश तोडून, सीमेवर लढणा-या, आणि युद्धात कामी येणा-या जवानाच्या कर्तव्य बुद्धीचं, बलिदानाचं, प्रखर वास्तवाचं ह्या कवितेतील वर्णन वाचतांना, अंगावर रोमांच उभे राहतात, डोळ्यांच्या कडा पाणावतात, शब्द मूके होतात, आणि फक्त आणि फक्त हात उचलला जातो, त्या अनामवीराला सॅल्यूट ठोकण्यासाठी !
☆ अनाम वीरा ☆
अनाम वीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्त
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात!
धगधगत्या समराच्या ज्वाला या देशाकाशी
जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी!
मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा
मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा!
जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव!
जरी न गातिल भाट डफावर तुझे यशोगान!
सफल जाहले तुझेच हे रे, तुझेच बलिदान!
काळोखातुनि विजयाचा ये पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्युंजय वीरा!
© ज्योति हसबनीस,
नागपुर (महाराष्ट्र)