मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #22 – अर्घ्य सागरास ☆ – श्री अशोक श्रीपाद भांबुरे
श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना एक काव्य संसार है । आप मराठी एवं हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज साप्ताहिक स्तम्भ –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती शृंखला की अगली कड़ी में प्रस्तुत है एक भावप्रवण कविता “अर्घ्य सागरास”।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 22 ☆
☆ अर्घ्य सागरास ☆
डोंगराला अभिषेक आहे घालतो पाऊस
किती दिस झाले तरी नाही घागरी या ओस
कातळाच्या चिरामधे कुणी पेरला कापूस
वाती सोडल्याचा होतो आहे समईला भास
काळ्या मेघाची तुटली शुभ्र मोत्यांची ही माळ
टपटप मातीवर मोती सारे रानोमाळ
कुणी अत्तर सांडले आला मातीला या वास
डोंगराला अभिषेक आहे…
डोंगराच्या माथ्यावर पहा पसरल्या गारा
सूर्य किरण पडता जसा चमकतो पारा
वाटे डोंगर म्हातारा झाले पांढरे हे केस
डोंगराला अभिषेक आहे…
झाला डोंगर सरडा त्याने बदलला रंग
चार दिसातच झाले त्याचे हिरवे हे अंग
त्याचा हिरवा पोषाख आणि हिरवाच श्वास
डोंगराला अभिषेक आहे…
कुठे निघाला पाऊस अशी गळा-भेट घेत
नदीकाठच्या पानांनी किती उंचावले हात
निळी नागमोडी नदी देई अर्घ्य सागरास
डोंगराला अभिषेक आहे…
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८