श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना एक काव्य संसार है । आप मराठी एवं हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज साप्ताहिक स्तम्भ –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती शृंखला की अगली कड़ी में प्रस्तुत है एक भावप्रवण कविता “उध्वस्त जगणे”।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 23 ☆
☆ उध्वस्त जगणे ☆
जे लिहावे वाटले ते, मी लिहू शकलो कुठे ?
आशयाच्या दर्पणातुन, मी खरा दिसलो कुठे
कायद्याच्या चौकटीचे, दार मी ठोठावले
आंधळ्या न्यायापुढे या, सांग मी टिकलो कुठे ?
मी सुनामी वादळांना, भीक नाही घातली
जाहले उध्वस्त जगणे, मी तरी खचलो कुठे
गजल का नाराज आहे, शेवटी कळले मला
जीवनाच्या अनुभवाला, मी खरा भिडलो कुठे
एवढ्यासाठीच माझी, जिंदगी रागावली
मी व्यथेसाठी जगाच्या, या इथे झटलो कुठे
टाकले वाळीत का हे, सत्य माझे लोक हो
सांग ना दुनिये मला तू, मी इथे चुकलो कुठे
सरण माझे पेटताना, शेवटी कळले मला
जगुनही मेलो खरा मी, मरुनही जगलो कुठे
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८