मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – काव्य दिंडी # 8– ☆ निवडुंगाच्या शीर्ण फुलाचे – कवयित्री इंदिरा संत ☆ – सुश्री ज्योति हसबनीस
सुश्री ज्योति हसबनीस
(सुश्री ज्योति हसबनीस जीअपने “साप्ताहिक स्तम्भ – काव्य दिंडी ” के माध्यम से वे मराठी साहित्य के विभिन्न स्तरीय साहित्यकारों की रचनाओं पर विमर्श करेंगी. आज प्रस्तुत है उनका आलेख “निवडुंगाच्या शीर्ण फुलाचे – कवयित्री इंदिरा संत”. यह आलेख साहित्य अकादमी सम्मान से सम्मानित सुप्रसिद्ध मराठी कवयित्री इंदिरा संत जी की रचनाओं पर आधारित है । थे। इस क्रम में आप प्रत्येक मंगलवार को सुश्री ज्योति हसबनीस जी का साहित्यिक विमर्श पढ़ सकेंगे.)
☆साप्ताहिक स्तम्भ – काव्य दिंडी # 8 ☆
☆ निवडुंगाच्या शीर्ण फुलाचे – कवयित्री इंदिरा संत☆
विसाव्या शतकातील एक नावारूपाला आलेली, राजमान्यता पावलेली कवयित्री म्हणून ‘इंदिरा संत’ ओळखल्या जातात. ४ जानेवारी १९१४ साली जन्मलेल्या ह्या थोर कवयित्रीने आपल्या संवेदनशील आणि सहजसुंदर लिखाणाने रसिकवाचनांवर मोहिनी तर घातलीच पण आपल्या आशयघन कविता, ललितगद्य लेखनाने मराठी साहित्यविश्व देखील अधिकच समृद्ध केले. ‘कविता हा माझ्या लेखनाचा आणि जगण्याचा गाभा आहे’ असे त्या स्वत:बद्दल म्हणत. ‘शेला’ ’मेंदी’ ’रंगबावरी’ह्या कवितासंग्रहांना राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला तर त्यांच्या ‘गर्भरेशीम’ ह्या कविता संग्रहाला साहित्य अकादमीच्या पुरस्काराने गौरविले गेले. आज ह्या कवयित्रीची अतिशय गोड कविता घेऊन मी येतेय.
☆ निवडुंगाच्या शीर्ण फुलाचे ☆
निवडुंगाच्या शीर्ण फुलाचे
झुबे लालसर ल्यावे कानी ;
जरा शीरावे पदर खोचुनी
करवंदीच्या जाळीमधुनी.
शीळ खोल ये तळरानातून
भणभण वारा चढ़णीवरचा;
गालापाशी झील्मील लाडीक
स्वाद जीभेवर आंबट कच्चा.
नव्हती जाणीव आणि कुणाची
नव्हते स्वप्नही कुणी असावे;
डोंगर चढ़णीवर एकटे
किती फीरावे… उभे रहावे.
पुन्हा कधी न का मिळायचे
ते माझेपण आपले आपण;
झुरते तन मन त्याच्यासाठी
उरते पदरी तीच आठवण…
निवडुंगाच्या लाल झुब्याची,
टपोर हिरव्या करवंदाची…
स्वैर बालपण, आपल्यातच दंग असलेली स्वप्नाळू, मुग्ध तारूण्यावस्था ह्या साऱ्याला मागे टाकत काळ भराभर पुढे जातो. अनेक जवाबदाऱ्या समर्थपणे पेलत कर्तेपणाची झूल आपल्या नकळतच आपण मिरवू लागतो. व्यवहाराची गणितं सोडवण्यात, य़शापयशाच्या नोंदी ठेवण्यात, जीवनाचा ताळेबंद मांडण्यात जीवाचं निवांतपण हरवल्यागत होतं. आणि मग आठव येतो तो त्या बेभान बेधुंद काऴाचा !
मन कघीच पोहोचतं त्या निवडुंगाच्या झाडापाशी. आणि असंख्य आठवणींचं मोहोळ एका क्षणात उडतं. लाल झुब्यांनी नटलेला तो निवडुंग, त्या टप्पोरल्या करवंदीच्या भरदार जाळ्या, ती डोंगराची चढण, तो दऱ्याखोऱ्यातून भणाणत्या वाऱ्याचा शीळभरला नाद, ती आंबट कच्ची करवंदाची गालात घोळणारी जीभेवर रेंगाळणारी चव, आणि स्वत:च्याच मस्तीतले स्वत:पलिकडे नसलेले बेधुंद मन ! किती वारा प्यावा, किती आसमंत निरखावा, आणि किती निसर्ग अंगावर घ्यावा…साऱ्याचा मनसोक्त आनंद लुटतांना कधी दुसऱ्या कुणाचा विचार देखील
मनाला शिवला नाही आणि शिवणार कसा..स्वत:तच रमलेल्या मनात इतर कुणाचा शिरकाव होईलच कसा..!
पुन: ते सारं अनुभवावं ह्याची ओढ कवयित्रीला लागली आहे. तसं शांतपण, निवलेपण, भारलेपण, स्वमग्न बेधुंदपण पुन: जगता येईल का तेवढ्याच असोशीने असा एक हलका तरंगही मनात तिच्या उमटून जातो.
*पुन्हा कधी न का मिळायचे
ते माझेपण आपले आपण
झुरते तनमन त्याच्यासाठी
उरते पदरी तीच आठवण*
ह्यातून तिची साशंकता तिने व्यक्त केलीय. सारी बंधनं झुगारून द्यावीत, काळाची पावलं उलटी पडावीत, पुन: एकदा ते स्वैर क्षण अनुभवावे, रसरसून जगावे, कधी तरी आपल्याही मनात असं तरळून जातंच ना !
© ज्योति हसबनीस,
नागपुर (महाराष्ट्र)