मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ मी_माझी – #29 – ☆ भान… ☆ – सुश्री आरूशी दाते
सुश्री आरूशी दाते
(प्रस्तुत है सुश्री आरूशी दाते जी के साप्ताहिक स्तम्भ – “मी _माझी “ शृंखला की अगली कड़ी भान…. सुश्री आरूशी जी के आलेख मानवीय रिश्तों को भावनात्मक रूप से जोड़ते हैं. सुश्री आरुशी के आलेख पढ़ते-पढ़ते उनके पात्रों को हम अनायास ही अपने जीवन से जुड़ी घटनाओं से जोड़ने लगते हैं और उनमें खो जाते हैं। आज का तथ्य जागरूकता । सुश्री आरूशी जी का यह कथन ही काफी है “Life is a package of good and bad things… many times, We don’t get a chance to choose… Still life has to go on…” साथ ही कितना कठिन है न किशोरावस्था में बच्चों को समझाना । हमें अपना दायित्व पूरा करना है और बच्चों को हमारी वार्ता में कितनी रूचि रहती है ? सुश्रीआरुशी जी के संक्षिप्त एवं सार्थकआलेखों तथा काव्याभिव्यक्ति का कोई सानी नहीं। उनकी लेखनी को नमन। इस शृंखला की कड़ियाँ आप आगामी प्रत्येक रविवार को पढ़ सकेंगे।)
अभी हाल ही में रंगतदार प्रकाशन द्वारा प्रकाशित प्रतिनिधि काव्य संग्रह ‘ आता नकोत अश्रू’ में आपकी कविता ‘ तेवत राहायचं’ का समावेश किया गया है। इसके लिए सुश्री आरुशी जी को हार्दिक बधाई ।
☆ साप्ताहिक स्तम्भ – मी_माझी – #29 ☆
☆ भान…☆
अप्पू चिडचिड करतंच घरात गेली… साहजिकच होतं…
आज थत्ते वहिनी (शेजारच्या बंगल्यात राहतात) तिला जे बोलल्या त्यावरून आता घरी गेल्यावर अप्पू काय काय बोलणार आहे ह्याचा अंदाज आलाच होता…
अप्पूला मैत्रिणी कमी आणि मित्र जास्त आहेत, हे थत्ते वहिनींना कधी पटलंच नाही…. त्यामुळे अप्पूचा लक्षण काही ठीक दिसत नाही, असा त्यांचा (गैर) समज झालाय…. त्यांचं हे खटकणं त्यांनी मला बरेच वेळा बोलून दाखवलं आहे, पण अप्पूसमोर आज पहिल्यांदाच बोलल्या…भाजी घेऊन घरी येताना त्या गेटपाशी दिसल्या म्हणून बोलत उभी होते, आणि अप्पू क्लासमधून परत आली तशा त्या तिला बरंच काही बोलल्या…
तरीसुद्धा मी जरा जास्त वेळ थत्ते काकूंशी बोलत थांबले… म्हणजे कसं, लगेच घरी गेले तर प्रश्नांचा तोफखाना खाली होईल… आणि कदाचित मी जखमी होईन… असो… गंमत खूप झाली… घरी जाऊन बघू या… कशा कशाला तोंड द्यायला लागतंय ते… हे करण्या मागे माझा उद्देश एवढंच होता की थोड्या वेळाने घरी गेले तर अप्पूचं डोकं थोडं थंड झालं असेल… धुसफुस बाहेर येणारच आहे…
घरी आले, तोवर अप्पू चहा बनवून पित बसली होती… मी, आणलेली भाजी फ्रीजमध्ये ठेवत होते, आणि… आणि झाली ना सुरुवात…
“आई, त्यांना (म्हणजे थत्ते काकूंना) हे सगळं बोलायची काय गरज होती… ? शैलेशला (थट्टेकाकूंचा मुलगा) मैत्रिणी नाहीत का? त्याच्या मैत्रिणींच्याबाबतीतपण त्या हाच विचार करतात का? सगळं त्यांनाच कळतं का? आम्हाला काहीच कळत नाही का? काय चुकीचं वागलो गं आम्ही? मित्रच आहोत ना? आमच्या ग्रुप मध्ये कधी कधी तोही असतो… म्हणजे तोपण वाया गेला आहे का??? आई तुला सगळं माहीत आहे, मी कोणाला भेटते, का भेटते, कुठे भेटते… मग ह्या कोण लुडबुड करणाऱ्या? आणि आज ह्या समोर एवढं बोलत आहेत, आपल्या मागे किती बोलत असतील???
टिपिकल तरुणाईचे टिपिकल प्रश्न ती मांडत होती, rather फेकत होती…
तिच्या प्रश्नांची सरबत्ती थांबली एकदाची… आणि मग ती माझ्याकडे उत्तरासाठी आशेने बघू लागली…
मीही दोन मिनिटं सगळ्या गोष्टींची जुळवा जुळव करून बोलायला लागले…
“अप्पू, बोलणारे काय बोलत असतात… आणि त्यांना बोलू द्यावं… तो त्यांचा स्वभावधर्म असातो… मी तुला नेहमी सांगत आले आहे, त्यातून आपण काय घ्यायचं हे आपण ठरवायचं… म्हणजे समोरची व्यक्ती पूर्णपणे चूक आणि आपण पूर्णपणे बरोबर आहोत, असं नाही… समोरची व्यक्ती बोलत असताना ती तिच्या बौद्धिक कुवतीप्रमाणे, गाठीशी असलेली अनुभवांच्या आधारावर, किंवा फोल आत्मविश्वास असतो म्हणून बोलतात… पण प्रसंग कसा हाताळायचा हे आपण ठरवायचं… You want to react or respond to the situation? हे करत असताना समोरच्याचं म्हणणं, दुर्लक्षित करायचं नाही, नक्कीच नाही… “
अप्पू च्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव स्पष्ट दिसत होते… (काहीही काय बोलत्येस)…
“रागावू नको, पण नीट ऐक… आपण एखादी गोष्ट हाती घेतो तेव्हा त्यामागील उद्देश नेहमीच चांगला असतो… पण in the due course, काही गोष्टी मागे पुढे होऊ शकतात… काही गोष्टी आपल्या हातात असतात, तर काही नसतात… अशा वेळी भान ठेवून काम करावं लागतं… चीड चीड करून उपयोग नाही… तसंच हातावर हात ठेवून बिनधास्त राहूनही चालत नाही…”
आता अप्पूचा चेहरा सांगत होता की, आई किती lecture देणारेस गं…
“कसं आहे माहित्ये का अप्पू, पाण्यात राहून माशाशी वैर धरून चालणार नाही ना … ! असं असलं तरी आपल्याला पाण्यात राहता आलं पाहिजे की नाही…?
Same rule applies here… म्हणजे ज्या समाजाचा आपण एक भाग आहोत, त्या समाजाकडे, त्या विचारांकडे दुर्लक्ष करून चालत नाही, पण म्हणून समाजाच्या अयोग्य चालीरितींच्या आहारी जायचं नाही… मी तर म्हणेन चालीरीती, जात धर्म, विचार अविचार हे आपल्यापुरते मर्यादित असावेत, ते कुणावर लादू नयेत… “
आता तर ती उगाच हा विषय काढला ह्या मतावर पोचली… त्यामुळे प्रास्ताविक झाल्यावर मीपण विषयलाच हात घातला…
“भान… भान लागतं हे सगळं सांभाळायला… त्यासाठी आपली बुद्धी प्रगल्भ असावी लागते… आपल्या कृतीचा परिणाम दुसऱ्यावर काय होणार आहे, ह्याचा विचार नक्की करायला हवा… वाईट होणार नाही ना ह्याची खबरदारी घ्यायलाच हवी… मला सगळं येतं, मला सगळं माहीत आहे, तुम्ही कोण सांगणारे, ह्या चुकीच्या धारणेमध्ये राहू नये… कदाचित त् यांनी दिलेली दूषणं योग्य विचार करायला भाग पाडतील… आपल्यालायोग्य दिशा दाखवतील… कोण well Wisher आहे, कोण नाही हे कळण्यासाठी सतर्क राहायला पाहिजे… कोणी कसंही वागलं तरी आपण भान सोडून वागायचं नाही…ही खूप मोठी जबाबदारी पेलण्यासाठी सक्षम व्हायला पाहिजे… प्रॅक्टिकल विचार केला तरी भावनिक विचार दूर लोटून चालत नाहीत…. Life is a package of good and bad things… many times, We don’t get a chance to choose… Still life has to go on… आपण कुठला मार्ग निवडायचा हे आपण ठरवायचं, आणि मग जे होईल त्याचीपण जबाबदारी घेण्याची कुवत ठेवायची… “
हे कुठेतरी पटतंय असे भाव चेहऱ्यावर दिसू लागले, आणि ती विचारात मग्न झाली आहे, हे पाहिल्यावर मीपण lecture द्यायचं थांबावलं आणि मासिक हातात घेऊन, अजून काही न बोलता तिचं निरीक्षण करू लागले… आई म्हणून मीही सतर्क राहायला हवंच ना.. !
© आरुशी दाते, पुणे