सुश्री ज्योति हसबनीस
(सुश्री ज्योति हसबनीस जीअपने “साप्ताहिक स्तम्भ – काव्य दिंडी ” के माध्यम से वे मराठी साहित्य के विभिन्न स्तरीय साहित्यकारों की रचनाओं पर विमर्श करेंगी. आज प्रस्तुत है उनका आलेख “दारा बांधता तोरण – कवयित्री इंदिरा संत”. यह आलेख साहित्य अकादमी सम्मान से सम्मानित सुप्रसिद्ध मराठी कवयित्री इंदिरा संत जी की रचनाओं पर आधारित है । थे। इस क्रम में आप प्रत्येक मंगलवार को सुश्री ज्योति हसबनीस जी का साहित्यिक विमर्श पढ़ सकेंगे.)
☆साप्ताहिक स्तम्भ – काव्य दिंडी # 9 ☆
☆ दारा बांधता तोरण – कवयित्री इंदिरा संत☆
विसाव्या शतकातील एक नावारूपाला आलेली, राजमान्यता पावलेली कवयित्री म्हणून ‘इंदिरा संत’ ओळखल्या जातात. ४ जानेवारी १९१४ साली जन्मलेल्या ह्या थोर कवयित्रीने आपल्या संवेदनशील आणि सहजसुंदर लिखाणाने रसिकवाचनांवर मोहिनी तर घातलीच पण आपल्या आशयघन कविता , ललितगद्य लेखनाने मराठी साहित्यविश्व देखील अधिकच समृद्ध केले . ‘कविता हा माझ्या लेखनाचा आणि जगण्याचा गाभा आहे’ असे त्या स्वत:बद्दल म्हणत. ‘शेला’ ’मेंदी’ ’रंगबावरी’ह्या कवितासंग्रहांना राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला तर त्यांच्या ‘गर्भरेशीम’ ह्या कविता संग्रहाला साहित्य अकादमीच्या पुरस्काराने गौरविले गेले . आज ह्या कवयित्रीची अतिशय गोड कविता घेऊन मी येतेय.
☆ दारा बांधता तोरण ☆
दारा बांधता तोरण घर नाचले नाचले
आज येणार अंगणी सोनचाफ्याची पाउले
भिंती रंगल्या स्वप्नांनी झाल्या गजांच्या कर्दळी
दार नटून उभेच, नाही मिटायाची बोली
सूर्यकिरण म्हणाले घालु दारात रांगोळी
शिंपू पायावरी दंव म्हणे वरून पागोळी
भरू ओंजळ फुलांनी बाग म्हणेल हरून
देईन मी आशीर्वाद केळ म्हणाली हासून
येरझारा घाली वारा गंध मोतिया घेउनी
सोनचाफ्याची पाउले आज येतील अंगणी
आगमन घरातले , मग ते छोट्या जिवाचे असो , की नववधूचे , सारी वास्तूच स्वागताला आतुरलेली असते . येणाऱ्या सोनपावलांच्या स्वागतासाठी उत्सुक झालेलं अधीरं मन सगळी जय्यत तयारी करून वाट बघत असतं आणि घरादारावर बागेवर एक दृष्टीक्षेप टाकतांना जाणवतं की अरे ह्या सोनपावलांच्या स्वागताची चाहूल तर घरादाराच्या स्पंदनाने केव्हाच हळूवारपणे टिपलीय . स्वागतासाठी दारी तोरण बांधण्याचाच अवकाश एक उत्सवी रूपच घरदार ल्यायलंय . भिंतीभिंतीतून स्वप्नाचे हुंकार ऐकू येतायत , खिडक्या खिडक्यांतून फुललेली कर्दळ डोकावतेय जणू गजांच्याच कर्दळी झाल्यायत. सूर्याची कोवळी किरणं अंगणभर पसरलीयत आणि किरणांचे कोवळे कवडसे जणू अंगणात रांगोळीच रेखल्यागत भासतायत , येणाऱ्या सोनपावलांवर दंव शिंपूयात या तयारीत पागोळ्या झरतायत , बागेतला बहर ओंजळीत रिता करायला बाग अगदी आनंदाने तरवरलीय , आशिर्वाद देईन म्हणून केळही मनोमन सुखावलीय , मंद गंधीत वारा जणू सोनचाफ्याच्या पावलांच्या प्रतीक्षेत अस्वस्थपणे येरझारा घालतोय , सारा परिसरच सोनचाफ्याच्या पावलांच्या प्रती़ेक्षेत अधीरलाय , आनंदलाय आणि स्वागताच्या जय्यत तयारीत साऱ्या घरादारानेच आपला वाटा मनापासून आनंदाने उचललाय .
कवयित्रीचं हे तरल भावविश्व कविता वाचतांना इतकं सुंदर उलगडत जातं आणि मंत्रमुग्ध करतं आणि बघता बघता आपणही तिच्या ह्या उत्सवी आनंदात सामिल होतो .
घरी येणाऱ्या नवागताचं स्वागत करतांना आपल्याही मनाची अशीच स्थिती होत असते नाही का …काय करू आणि काय नको ..! आणि सारं घर दार स्वागतासाठी सजवतांना आपल्याही नकळत वास्तू देखील आपल्यालारखीच स्वागतोत्त्सुक मोहरलेली आहे असंच आपल्यालाही वाटू लागतं ना ?
इंदिरा संतांची ही गोड कविता वाचतांना त्यातले मधुर भाव मनभर अलगद पसरतात आणि मन एका अननुभूत आनंदलहरींवर तरंगत राहतं !
© ज्योति हसबनीस,
नागपुर (महाराष्ट्र)