मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ मी_माझी – #30 – ☆ प्रिय तनु ☆ – सुश्री आरूशी दाते

सुश्री आरूशी दाते

(प्रस्तुत है  सुश्री आरूशी दाते जी के साप्ताहिक स्तम्भ – “मी _माझी “ शृंखला की अगली कड़ी  प्रिय तनु   सुश्री आरूशी जी  के आलेख मानवीय रिश्तों  को भावनात्मक रूप से जोड़ते  हैं.  सुश्री आरुशी के आलेख पढ़ते-पढ़ते उनके पात्रों को  हम अनायास ही अपने जीवन से जुड़ी घटनाओं से जोड़ने लगते हैं और उनमें खो जाते हैं।  सुश्री आरुशी जी का आज का आलेख, एक पत्र स्वरुप आलेख  है जिसका पात्र तनु है।  यह पात्र इतना भावप्रवण  एवं आत्मीय है कि आप इसे पूरा पढ़ कर आत्मसात करने से नहीं रोक पाते। सुश्री आरूशी  जी  का यह कथन ही काफी है  “first impression is best impression”  पात्र तनु को अपने ह्रदय के उद्गारों से अवगत करने के लिए। सुश्रीआरुशी जी के संक्षिप्त एवं सार्थकआलेखों  तथा काव्याभिव्यक्ति का कोई सानी नहीं।  उनकी लेखनी को नमन। इस शृंखला की कड़ियाँ आप आगामी प्रत्येक रविवार को पढ़  सकेंगे।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – मी_माझी – #30 ☆

☆ प्रिय तनु ☆

 

प्रिय तनु,

विषयलाच हात घालते… आज चक्क तुला पत्र लिहायचं आहे… generally जी व्यक्ती आपल्यापासून दूर असते तिला पत्र लिहितो, नाही का! पण तू कधी दूरच गेला नाहीस त्यामुळे तुला पत्र लिहायची वेळच आली नाही… खरं तर हे एक कारण झालं माझा बचाव करण्यासाठी दिलेलं…

मी जाईन तिथे तू, हे समीकरण कायम होतं, त्यात कधीच बदल झाला नाही… rather आरुशी म्हटलं की तुझीच प्रतिमा समोर येते. आणि ती प्रतिमा जोपासण्याचा आणि जपण्याचा प्रयत्न मी नेहमीच करते… first impression is best impression ह्यावर माझा दृढ विश्वास आहे… हे impression किंवा image तू जपलीच पाहिजेस, हा अट्टाहासच म्हण हवं तर… त्यात तुला कधीच ढवळाढवळ करता आली नाही, हो ना ! माझं वर्चस्व गाजवलं आणि त्यातूनच सुखावत राहिले…

थाम्ब, थाम्ब, ह्याचा अर्थ मी तुझ्याकडून काम करवून घेत आले असाच होतो ना ? तुला राबवून घेतलं का रे? तुझ्या मनाविरुद्ध गोष्टी घडल्या का? हे प्रश्न केव्हा पडतात माहित्ये, जेव्हा तू, मी सांगेन त्याप्रमाणे वागायला नकार देतोस तेव्हा. आणि तेव्हाच लक्षात येतं की मी तुला कायम गृहीत धरत आले आणि तुझ्या अपेक्षांकडे दुर्लक्ष करत राहिले.

शाश्वत – अशाश्वत वगैरे गोष्टी सुरू झाल्या की तू नश्वर, अशाश्वत म्हणून बऱ्याच वेळा तुला कमी दर्जाची वागणूक देण्यात आली असेल… पण ज्या चैतन्याने, ज्या पंचमहाभूतांनी तुला तयार केलं आहे, त्यांना ह्या गोष्टींचा विसर पडत नाही… मग कधी कधी त्यांच्या मनाविरुद्धा गोष्टी घडायला लागल्या की ह्या देहाकडे लक्ष द्या, त्याची काळजी घ्या ह्याची वॉर्निंग मिळतेच लगेच… ह्याचा त्रास तुझ्याबरोबर मलाही होतोच की ! पण माझ्यासाठी तू जास्तीतजास्त सहन करत राहतोस हे नक्की. कारण काही ही झालं तरी तुला ठीक ठाक राहवच लागत ना. मग काय माझ्या मनाविरुद्ध व्यायाम सुरू होतात, औषध सुरू होतात, योगा पण सुरू होतं, हल्ली तर ते diet चं फॅड तर तुझं जिणं नको नको करून टाकत असेल नाही !

एकंदरीत काय, तुला डावलून आयुष्य पुढे जाऊ शकत नाही, ह्याची जाणीव जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तुझ्या माझ्यातील सख्य बहरेल, एका सुंदर विचारधारेला मूर्त रूप मिळेल, नाही का !

मी एवढंच म्हणेन, माझं अस्तित्व, माझं म्हणून टिकवायला तू कारणीभूत आहेस आणि तुझी सोबत माझ्यातील ‘मी’ ला सावरत असते, फुलवत असते. तू असाच सोबत राहशील, अशी रचना अजून तरी अस्तित्वात नाही ह्याचं खूप दुःख आहे आणि ते बदलणं माझ्या हातात नाही, ही खंत कायम राहील. माझ्याकडून निश्चित रूपाने जे होणे ठरलेले आहे, ज्याचा माझ्या भाळी शिक्कामोर्तब झाला आहे, ते घडायला, तू आहेस हीच खात्री निभावून नेऊ शकते.

कित्ती छान, सुंदर, अफाट अशा विशेषणांनी माझं आयुष्य रंगलेलं जरी नसलं तरी, तुझ्यामध्ये निवास केल्याने ह्या आयुष्याची व्याख्या नक्कीच बदलते, असं मी म्हणू इच्छिते. माझ्या आयुष्याला एक वेगळाच आयाम मिळतो, आणि आरुशी ह्या नावाला एक ओळख बहाल करतोस, ह्यासाठी मी तुझी कायम ऋणी राहीन ह्यात वाद नाहीच !

 

© आरुशी दाते, पुणे