मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #29 – बिन पंखाचा पारवा ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना  एक काव्य  संसार है । आप  मराठी एवं  हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं।  आज साप्ताहिक स्तम्भ  –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती  शृंखला  की अगली  कड़ी में प्रस्तुत है एक  भावप्रवण कविता  “बिन पंखाचा पारवा”।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 29☆

☆ बिन पंखाचा पारवा ☆

 

थेंब पावसाचा आला

पान जोजवते त्याला

दिला पाळण्या खालून

होता दुसऱ्या पानाला

 

खेळवती त्याला पाने

गाती सळसळ गाणे

पेंग येता डोळ्यावर

पाट टेके धरणीला

 

होता निजला रे थेंब

तिथं आला एक कोंब

हात काढून बाहेर

देई सावली मातीला

 

काम थेंबाचे संपले

माती आड ते लपले

त्याने भुरळ घातली

किती शेधते मी त्याला

 

गेला आकाशी उडून

पंख आणले कोठून

बिन पंखाचा पारवा

पुन्हा येईल भेटीला

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८