मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ कवितेच्या प्रदेशात # 29 – मला प्रभावित करणा-या स्त्रिया ☆ – सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

 

(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ  “कवितेच्या प्रदेशात” में  उनका एक संस्मरणात्मक आलेख   “मला प्रभावित करणा-या स्त्रिया.  सुश्री प्रभा जी  ने  अतिसुन्दर, सहज एवं सजीव  रूप से उन सभी स्त्रियों  के साथ अपने संस्मरणों पर विमर्श किया है, जिन्होंने उनके जीवन को प्रभावित किया है। ऐसा अनुभव होता है जैसे वे क्षण चलचित्र की भांति हमारे नेत्रों के समक्ष व्यतीत हो रहे हों।  

मुझे पूर्ण विश्वास है  कि आप निश्चित ही प्रत्येक बुधवार सुश्री प्रभा जी की रचना की प्रतीक्षा करते होंगे. आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी  के उत्कृष्ट साहित्य का साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 29 ☆

☆ आलेख – मला प्रभावित करणा-या स्त्रिया ☆ 

मला वाचनाची आवड  इयत्ता  आठवी/ नववीत लागली. मी शिरूर च्या विद्याधाम प्रशालेत शिकत होते. आम्ही पुण्याहून  शिरूर ला आमचे  नातेवाईक पवार यांच्या घराजवळ रहायला गेलो. पवारांचं सरदार घराणं! पवार काकी खरोखरच एक घरंदाज खानदानी व्यक्तिमत्व, त्यांचा प्रभाव माझ्यावर निश्चितच पडला. त्यांच्याच घरात वाचनाची गोडी लागली. पवार काकींची पुस्तकाची लायब्ररी समोरच होती. एक कादंबरी  आणि  एक मासिक मिळत  असे. तो काळ मराठी लेखिकां चा सुवर्णकाळ होता. पण शैलजा राजे या लेखिकेच्या कथा कादंब-या मी त्या काळात खुप वाचल्या. साकव .साकेत.. दोना पाॅवला, अनुबंध   इ. त्या काळात त्या माझ्या आवडत्या लेखिका बनल्या. पुढे पुण्यात आल्यावर माझ्या घराच्या  अगदी जवळच “सुंदर नगरी” त त्या रहायला होत्या. मी धाडस करून त्यांना भेटायला गेले. त्या काळात आमचा दूधाचा व्यवसाय होता. मी त्यांच्या साठी डब्यात खरवस घेऊन गेले होते. त्या डब्यात त्यांनी बोरं घालून दिली.. रिकामा डबा देऊ नये म्हणून… त्या नंतर मी त्यांच्या घरी  अनेकदा गेले… त्या खुप छान आणि  आपुलकीने बोलायच्या. माझ्या कविता त्यांनी खुप लक्षपूर्वक  ऐकल्या होत्या आणि छान दाद ही दिली होती. पुढे मी अभिमानश्री हा दिवाळी अंक सुरु केल्यावर त्यांनी अंकासाठी कथा ही दिली होती.

विद्या बाळ, छाया दातार, गौरी देशपांडे या स्रीवादी लेखिकांचाही माझ्यावर खुप प्रभाव राहिला आहे…..

मी स्रीवादी बनू शकले नाही. पण स्रीवादी चळवळीचा आणि विचारसरणी चा प्रभाव माझ्यावर आहे. विद्याताई बाळ यांचा नारी समता मंच  आणि मिळून सा-याजणी मासिकामुळे परिचय झाला. गौरी देशपांडे चे साहित्य मी झपाटल्यासारखे वाचले आणि पीएचडी साठी “गौरी देशपांडे च्या समग्र साहित्याचा चिकित्सक  अभ्यास” हा विषय घेतला होता त्या संदर्भात गौरी देशपांडें शी काही पत्रव्यवहारही झाला (त्या काळात त्या परदेशात  असल्यामुळे) पण  माझे संशोधन पूर्ण होऊ शकले नाही. आणि त्यांच्या प्रत्यक्ष भेटीची  इच्छा ही पूर्ण होऊ शकली नाही.

वरील सर्व स्त्रियां चा माझ्या  आयुष्यावर  प्रभाव राहिला आहे हे नक्की.

प्रियदर्शनी इंदिरा गांधी हे सुद्धा लहानपणापासून आवडणारं प्रभावी व्यक्तिमत्व!

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]