श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना एक काव्य संसार है । आप मराठी एवं हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज साप्ताहिक स्तम्भ –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती शृंखला की अगली कड़ी में प्रस्तुत है एक भावप्रवण कविता “नंदलाला”।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 32☆
☆ नंदलाला ☆
प्राशले विष, ना तरीही घात झाला
ना कुठेही पीळ पडला आतड्याला
रासक्रीडा खेळण्याचे भाग्य नाही
देह भजनी फक्त त्याच्या लागलेला
प्रीतिच्या वाटेत आले कैक धोंडे
धर्म भक्तीचाच होता पाळलेला
मीच राधा मीच मीरा एक आम्ही
या जगाने भेद आहे मांडलेला
नाव त्यांनी ठेवलेले होय मीरा
मी कधीही सोडले ना राधिकेला
दर्शनाची आस आहे सावळ्याच्या
चुंबते मी रोज त्याच्या बासरीला
एकतारी ‘बासरीचे’ सूर काढी
बोट माझे वाटते मज नंदलाला
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८