मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 32 – अनुवंश ☆ सुश्री प्रभा सोनवणे
(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ “कवितेच्या प्रदेशात” में उनकी अतिसुन्दर कविता “अनुवंश”. सुश्री प्रभा जी की कविता अनुवंश एक गंभीर काव्य विमर्श है । यदि हम अपनी अब तक की जीवन यात्रा पर विचार करें तो पाएंगे कि हमने अनुवांशिक क्या पाया। निश्चित ही हमने कवि के रूप में भरे पुरे संयुक्त परिवार में अपने अस्तित्व का एकाकी जीवन ही जिया है । हां संस्कार जरूर हमारे साथ चलते रहे और उन संस्कारों, जीवन के खट्टे मीठे अनुभवों ने हमारे कवि मन की नींव रखी । फिर हम रचते रहे अपना साहित्यिक संसार । नीलकमल जैसे चित्रपट हमें जरूर कल्पना के सागर में ले गए होंगे कि हमारा पूर्व जन्म कैसा रहा होगा ?
मुझे पूर्ण विश्वास है कि आप निश्चित ही प्रत्येक बुधवार सुश्री प्रभा जी की रचना की प्रतीक्षा करते होंगे. आप प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी के उत्कृष्ट साहित्य का साप्ताहिक स्तम्भ – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते हैं।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 32 ☆
☆ अनुवंश ☆
मी काहीच घेतले नाही
माझ्या आईबापाकडून वारसा हक्काने,
किंवा त्यांच्यातले
काहीच उतरले नाही माझ्यात
अनुवंशाने !
भल्या थोरल्या वाड्यात,
एकत्र कुटुंबात,
कुणीच नव्हते कुणाचे
असे आता वाटते !
चुलीला पोतेरे घालणारे
सालंकृत घरंदाज बायकी हात
किंवा दर बुधवारी शेतमजुरांना पगार वाटणारे
पैसेवाले बेबंद पुरुषी हात
कधीच वाटले नाहीत….
भक्कम आधाराचे किंवा आश्वासक!
सुखवस्तू कुटुंबात
आपसूक वाढतात मुले
सुरक्षित,नीटनेटकी!
तरीही त्या भरल्या घरात
अगदी एकटेच वाटत राहिले
आणि एकाकीही……
त्या एकांत बेटावर
स्वतःला अंतर्बाह्य न्याहाळताना
अवघ्या अस्तित्वावर उमलत गेली
कवितेची असंख्य नीळी कमळं….
“नीलकमल आ जाओ….”
अशी साद घालणा-या
चित्रपटातल्या गतजन्मीच्या
प्रियकरा सारखीच,
कविता खुणावत राहिली
आणि मीही गुमान चालत राहिले
त्या अभिमंत्रित वाटांवरून ……
हा कुठला अनुवंश उतरला आहे माझ्यात?
जे जाणवले,जे न्याहाळले,
जे सोसले,जे भोगले,
ते खदखदते आहे….धगधगते आहे…उसळते आहे…
काहीतरी वेगळेच रसायन
धावते आहे माझ्या धमन्यातून!
त्यावर आप्त स्वकियांचे शेरे ताशेरे…
अवहेलना, अपमान, खच्चीकरण!
आणि या सा-याहून वेगळं….
एक जग कवितेचं!
“ये हृदयीचे ते हृदयी”
पोहचविताना झालेल्या आनंदाचं!
माझ्यातून उगवलेल्या माझंच…..
जगातल्या पहिल्या कवयित्रीचं—-
संवेदन, जखमी हृदय, झालेली उपेक्षा, हेटाळणी आणि
बरेच काही….
मिळाले आहे वारसाहक्काने मला
आणि तिच्यातलीच सृजनशीलताही
अनुवंशाने उतरली असावी माझ्यात!
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]