मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कोहरे के आँचल से # 24 ☆ कुस्करलेल्या कळ्यांचा न्याय ☆ सौ. सुजाता काळे
सौ. सुजाता काळे
☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ कोहरे के आँचल से # 24 ☆
कुठे कुठे राखायची
स्वतःचीच मी आब?
का-कधी करायची?
स्वतःची झाक- पाक.
किती कशा पाळू वेळा?
घराबाहेर पडायला,
गरजेविना कोणी का जातं?
अंधारात फिरायला.
मी बाहेर असले की
आई- बा ला धाकधूक,
कोल्हे, लांडगा टपलाय
मुलगी म्हणून का माझी चूक?
मला स्वातंत्र्य मिळावे म्हणून
रमा, सावित्री झटल्या,
आता माझी होळी करून
मुसक्या बांधून टाकल्या.
निसर्गाने मला बनवून
मातृत्वाचं दान दिलं,
वासनेच्या राक्षसांनी मला,
प्रियांका कधी निर्भया केलं.
माझे लचके तोडताना,
त्यांना वयाचं बंधन नाही,
कधी मुलगी, बहिण, आई
आजीला पण सोडत नाही.
साफ स्वच्छता सुरू आहे,
गल्ली अन् बोळांतून
वासनेची घाण भिनलीय,
नराधमांच्या डोक्यातून.
देहाचा माज उतरवितात,
कोवळ्या कळयांना कुस्करून
देहाच्या चिंध्या करून,
कधी गर्भारपणाचं ओझं लादून.
कधी थांबणार विटंबना
माय-लेकी व सुनांची
न्याय देवता जागी होवो
कुस्करलेलया कळ्यांची
इथे कोणी राम नाही
अहिल्येच्या उद्धारी
फुकट बळी जाऊ नये
न्यायासाठी हे गं नारी.
© सुजाता काळे
पंचगनी, महाराष्ट्र, मोब – 9975577684