श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना एक काव्य संसार है । आप मराठी एवं हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज साप्ताहिक स्तम्भ –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती शृंखला की अगली कड़ी में प्रस्तुत है एक भावप्रवण कविता “सूर्य उगवतो आहे”।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 33☆
☆ सूर्य उगवतो आहे ☆
अलवार भावना त्याची मज कोमल म्हणतो आहे
तो कुसुम म्हणता माजला हा गंध पसरतो आहे
हे भुंगे स्पर्शुन जाती पानास मिळेना संधी
हा दहिवर पानावरती भावार्थ निथळतो आहे
मी फूल कळीचे होता पानाची वाढे सळसळ
वाऱ्याने फूस दिल्याने तो मला बिलगतो आहे
हे फूल तोडुनी देतो मर्जीने कोणा माळी
या शोकाकुल पानाचा आधार निखळतो आहे
हे फूल तोडुनी नेता निर्माल्य उद्याला होई
या नैसर्गिक नियमांचा समतोल बिघडतो आहे
हे खेळ पाहुनी सारे मी खचले आज परंतू
घेऊन नव्या स्वप्नांना हा सूर्य उगवतो आहे
या नदी तळ्याच्या काठी केल्यात फुलांनी वस्त्या
हा चंद्र पाहण्या त्यांना पाण्यात उतरतो आहे
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८