मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #36 – चंद्र पौर्णिमेचा ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे
श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना एक काव्य संसार है । आप मराठी एवं हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज साप्ताहिक स्तम्भ –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती शृंखला की अगली कड़ी में प्रस्तुत है एक भावप्रवण कविता “चंद्र पौर्णिमेचा”।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 36☆
☆ चंद्र पौर्णिमेचा ☆
माझ्या नभातला हा तारा कसा निखळला
आकाश फाटले अन् टाकाच हा उसवला
ओल्या बटा बटातुन गंगा कुठे निघाली
केसातुनी तुझीया पारा कसा निथळला
हिरव्या चुड्यात किणकिण नाजूक मनगटांवर
येता वसंत दारी मुखडा तुझा उजळला
होतेस विश्व माझे सारेच तू उजळले
ही पाठ फिरवता तू अंधार हा पसरला
हा भेटण्यास येतो मज चंद्र पौर्णिमेचा
या लक्ष तारकांनी मांडव पुन्हा सजवला
रात्रीत या कळीचा विस्तारला पदर अन्
श्वासात गंध माझ्या होता इथे मिसळला
केवळ तुझ्याचसाठी झालो तुषार मीही
ओल्या मिठीत तूही मग देह हा घुसळला
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८