श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना एक काव्य संसार है । आप मराठी एवं हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज साप्ताहिक स्तम्भ –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती शृंखला की अगली कड़ी में प्रस्तुत है एक भावप्रवण कविता “सज्ञान रंग ”।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 41 ☆
☆ होळी पर्व विशेष – सज्ञान रंग ☆
रंग पर्व होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
होळीत राग रुसवे जावे जळून काही
उजळो प्रकाश आता येथे दिशांस दाही
रंगात कोरड्या मी भिजणार आज नाही
रंगात ओल ज्या ते गालास लाव दोन्ही
ठेवीन हात धरुनी हातात मीच क्षणभर
तो स्पर्श मग स्मृतींचा राहो सदैव देही
छळतील डाग काही सोसेल मी तयांना
हे रंग जीवनाचे नुसते नको प्रवाही
ते रंग कालचे तर बालीश फार होते
सज्ञान रंग झाला सज्ञान आज मीही
जातीत वाटलेले आहेत रंग जे जे
ते रंग टाळण्याची मज पाहिजेल ग्वाही
ते पावसात भिजले आकाश सप्तरंगी
त्यातील रंग मजवर उधळून टाक तूही
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८