श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना एक काव्य संसार है । आप मराठी एवं हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज साप्ताहिक स्तम्भ –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती शृंखला की अगली कड़ी में प्रस्तुत है असमय भयावह वर्षा पर आधारित रचना “चंद्रकोर”।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 44 ☆
☆ चंद्रकोर ☆
पाणी पाणी ओरडत राती उठलं शिवार
कसा अंधाऱ्या रातीला आला पावसाला जोर
वीज कडाडली त्यात आणि विझली ही वात
धडधडते ही छाती भीती दाटलेली आत
झोप उडाली घराची जागी रातभर पोरं
कसा अंधाऱ्या रातीला…
मेघ रडवेला झाला कुणी डिवचल त्याला
गडगड हा लोळला ओला चिंब केला पाला
त्याला शांतवण्यासाठी बघा नाचला हा मोर
कसा अंधाऱ्या रातीला…
चंद्र होता साक्ष देत शुभ्र होतं हे आकाश
क्षणभरात अंधार कुठं गेला हा प्रकाश
काळ्या ढगानं झाकली कशी होती चंद्रकोर
कसा अंधाऱ्या रातीला…
डोळ्यांसमोर तरळे जसा कापसाचा धागा
एका दिसात टाचल्या त्यानं धरतीच्या भेगा
इंद्र देवाने सोडला वाटे जादूचा हा दोर
कसा अंधाऱ्या रातीला…
जाऊ पावसाच्या गावा सोडू कागदाच्या नावा
नावेमधे हा संदेश ठेवा लक्ष तुम्ही देवा
जशी खेळातली नदी दिसो उघडता दार
कसा अंधाऱ्या रातीला…
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८