मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ पुष्प तिसरा #3 – ☆ या माहेरी. . . . ! ☆ – कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

 

(समाज , संस्कृति, साहित्य में  ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले  कविराज विजय यशवंत सातपुते जी  की  सोशल मीडिया  की  टेगलाइन माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक,  सांस्कृतिक  एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं  ।  अब आप प्रत्येक शुक्रवार को उनके मानवीय संवेदना के सकारात्मक साहित्य को पढ़ सकेंगे।  आज इस लेखमाला की शृंखला में पढ़िये “पुष्प तिसरा   – या माहेरी ….!” ।)

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – पुष्प तिसरा #-3 ☆

 

या माहेरी. . . . !

 

कवितेच घर हेच शब्दांचे माहेर. …किती भावस्पर्शी जाणिवा नेणिवेच्या या कवितालयात पहायला मिळतात …… कल्पना  आणि वास्तवता यांच्या नाजूक संवेदनशील पण जागृत  अनुभुतींनी साकारलेल्या या शब्द रचना जेव्हा मनाशी संवाद साधतात ना तेव्हा मनाचा एकटे पणा कुठल्या कुठे पळून जातो.   डोळे आणि मन भरून येत. . .  आठवणींची पासोडी खांद्यावर टाकून  आपण या माहेरात  विसावतो आणि . . .

……अनेक जीवनातील सुख दुःख पचवलेली, जीवनसंघर्ष करीत  कवितेचा शब्दसुतेचा दर्जा देणारी संवेदनशील व्यक्ती मत्वे  ,  मनात रेंगाळत रहातात.  मनातील ताणतणाव  दूर करण्याचा प्रयत्न ही शब्द पालवी करते आणि म्हणावस वाटत  *वसंत फुलला मनोमनी*

खरंच . . .  ही फुलं फुलतात कशासाठी? माणस माणसांना भेटतात कशासाठी? थोड तुझ थोड माझं परस्परांना समजण्यासाठी . . तसच या माहेरी घडत. या कवितेच्या घरात कवितेचे विविध प्रकार मांडवशोभेसारखे नटून थटून येतात. त्यांच नुसते दर्शन देखील मनाची मरगळ दूर करते.  आजची कविता काय आहे, कशी  आहे  ,  तिच रूप, स्वरूप, तिचा प्रवास याच्या खोलात न जाता मी फक्त  इतकेच म्हणेन  आजची कविता प्रवाही आहे.  सोशल नेटवर्किंग साईट वरून ती लोकाभिमुख होते  आहे.  प्रत्येक कविता  आपला स्वतःचा वाचक वर्ग निर्माण करते आहे. हा साहित्य प्रवाह नसला तरी हा जीवनप्रवास आहे माणसातल्या सृजनशील मनोवृत्तींचा. ही निर्मिती माणसाला धरून ठेवते. माणसाशी संवाद साधते. त्याचं एकटेपण दूर करू पहाते. म्हणून कविता महत्वाची आहे.

कवितेने किती पुरस्कार मिळवले, * आपल्या लेकिच्या अंगावर किती दागिने  आहेत* यापेक्षा  आपली लेक  किती लोकाभिमुख  आहे हे पहाणं मनाला जास्त भावत. मनान मनाशी जोडलेले भावबंध हाच उत्तम कवितेचा पाया असतो. नाते जपताना शब्दांना उकळी  आणून उसन्या गोडव्याने पाजलेला चहा भावाच्या मनात बहिणीची माया उत्पन्न करू शकत नाही त्याप्रमाणे कविता लोकांपर्यत किती पोचली तिचा समाजाभिमुख प्रवास कविला समाजात मानाचे स्थान प्राप्त करून देतो.

माहेर. . . माहेर ..  म्हणजे नेमक काय. ? मनातली दुःख, चिंता, काळजी, ताणतणाव, बाहेर जाताना रांगत्या पावलांनी किंवा  अनुभवी वृद्ध व्यक्तीच्या आश्वासक खोकल्याने घरात कुणीतरी  असल्याची दिलेली चाहूल, *शब्दांना भावनांनी दिलेला आहेर* म्हणजे माहेर.  हे माहेर ममत्वाचा,मायेचा, माझ्या तला कलागुणांचा सर्वांगीण  अविष्कार करत, माझ माझ म्हणून ज्याला जोजवावं त्या विचारप्रवाहांचा जे स्वीकार करत ते माहेर माणसाला माणूसपण कवितेला घरपण प्राप्त करून देत.

कविता श्लोकातून जाणवायला हवी. अभंगातून निनादत ओवीतून उदरभरण करणा-या , गहू, ज्वारी, बाजरीच्या पिठात  एकजीव व्हायला हवी. कवितेने जुन्याची कास आणि नाविन्याची आस सोडू नये यासाठी हे माहेर प्रत्येक साहित्यिकासाठी फार महत्वाचे आहे.  या माहेरात कुणाला  एकटे सोडायचे अन कुणाला बांधून ठेवायचे हे काम आपले लेखन,  आपला दैनंदिन लेखन कला व्यासंग बिनबोभाट करतो. तुलना नावाची मावशी किंवा मंथरा या माहेरात आपल्याला पदोपदी भेटते. ही तुलना मावशी कविच्या कवित्वाचा देखील घात करू शकते.  या माहेरात आपल्या कार्यकरतृत्वाचं गुणांकन करायला *दामाजी* नाही तर *आत्माराम* कामी येतो हे ध्यानात ठेवा आणि जेव्हा जेव्हा स्वतःला  एकट समजाल तेव्हा तेव्हा या माहेरी निःशंकपणे या. पायवाट  आणि हमरस्ता दोन्ही ही आपलीच वाट पाहत  असतात. सुख, समाधान, हाकेच्या अंतरावरच असत त्याचा शुभारंभ या माहेरी होऊ शकतो.

हा प्रवास  ह्दयापासून ह्रदयापर्यतचा असतो. यात शब्द जितका महत्वाचा तितकाच एकेका शब्दासाठी  आपल सारं जीवन वेचणारा माणूसही तितकाच महत्त्वाचा. या शब्दालयात,  माहेरपणात कविता नांदायला हवी.कविनं कविता  अन माणसान कटुता या माहेरी निवांत सोडून द्यावी. कविता तिचा प्रवास करीत रहाते  आणि मनातली कटूता एकटी होती..  एकटी  आहे..  एकटी राहिल ..  असा विश्वास देत पुढच्या जीवनप्रवासाला लागते.

 

✒  © विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकारनगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798.