मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ? मी_माझी – #3 – अथांग… ? – सुश्री आरूशी दाते
सुश्री आरूशी दाते
मी_माझी – #3 – अथांग…
(स्तुत है सुश्री आरूशी दाते जी के साप्ताहिक स्तम्भ – “मी _माझी “ शृंखला की तृतीय कड़ी अथांग …। इस शृंखला की प्रत्येक कड़ियाँ आप आगामी प्रत्येक रविवार को पढ़ पाएंगे। )
सहज डोकावले… तसं डोकावायचं काही कारणही नव्हतं… पण किती वर्षांपासून हे करायचं राहूनच गेलं होतं… राहून गेलं होतं की मी ते मुद्दामून करत नव्हते…?
त्याने काय फरक पडणार आहे? गोष्टी घडायच्या तेव्हाच घडतात… मग उगाच दोष, आरोप वगैरे कशाला…?
असो, तर मी काय म्हणत होते?
काहीच नाही गं, तू आता काही बोलूच नकोस… फक्त ऐक…
पण काय ऐकू?
शांत हो, गप्प बस, डोळे बंद कर आणि ऐक सगळं…
म्हणजे?
काहीच बोलायचं नाही?
…………………….
सगळं कसं शांत झालं होतं. थोडंसं कोरडं कोरडं वाटत होतं. मी जरा अस्वस्थच झाले होते. पण आज पर्याय नव्हता. एकेक आवाज नाहीसा होऊ लागला, तशी माझी उत्सुकता वाढू लागली. प्रत्येक क्षणी काय घडतंय ह्याकडे लक्ष जायला लागलं. हळू हळू रंगही नाहीसे झाले, तरंग शांत झाले, तसे शहारे बोलू लागले.
सुरुवातीला अर्थ लागत नव्हते, पण आता काठावर बसून समोरच्या डोहातील माझं प्रतिबिंम्ब दिसत होतं, ते माझं आहे ह्यावर विश्वास ठेवताना अनेक गोष्टींनी
मनाभोवती फेर धरायला सुरुवात केली आणि… आणि पुन्हा गोंधळ, आरडा ओरडा, कोलाहल… असं वाटायला लागलं जणू कडेलोट होतोय, त्या डोहात जर मी पडले तर नाका तोंडात पाणी जाऊन जीव गुदमरेल.
नाही, नाही, मला ह्यातून बाहेर काढा, मला जगायचं आहे, हा आक्रोश सुरू झाला… जगण्याच्या धडपडीमध्ये, गटांगळ्या खात खात, त्या थंड पाण्याची बोच सहन करत पोहत राहायचे होते, थांबले तर, होत्याचं नव्हतं होणार हेच माहीत होतं.
आजही नेमकं तेच झालं… हात पाय मारत राहिले, पण एक वेळ अशी आली की माझ्या संघर्षामध्ये मी कुठेच नव्हते… हे लक्षात आलं…
म्हणजे?
ह्याचं उत्तर शोधायलाच हवं. ह्या संघर्षात मी नाही, असं कसं होईल ?
म्हणजे, बघ हं, ह्या डोहाकडेच बघ ना… पाऊस पडला की ह्यात पाणी साठणार, मग लोकं ते पाणी वापरणार, कोणी दगड मारतील, कोणी पोहायची मजा घेतील, कोणी माझ्यासारखे असतील, जे पाण्यात उतरायला कदाचित घाबरतील. आणि पाण्यात उतरले तर त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहताना जीव मेटाकुटीला येईपर्यंत जीव वाचवायचा.
हाच डोह जेव्हा नदीला जाऊन मिळतो, तेव्हा आपल्याला फार कष्ट घ्यायला लागत नाहीत, नाही का! वाहणे आपोआप चालू राहते. तेव्हा एकच दिशा असते, समुद्राची अथांगता गाठणे, होय ना !
फारसं काही कळत नव्हतं. म्हणून मग पाण्यातून बाहेर येऊन काठावर बसले. आणि डोकावू लागले.
प्रपंचरूपी डोहाला सर्वस्व मानून, जगण्याच्या गर्दीत स्वतःला हरवून बसले होते. ह्यातून मार्ग काढत भक्तिमय नदीचा एक भाग बनून परमेश्वराच्या अथांगतेमध्ये झोकून द्यायचं आहे, ह्याची जाणीव झाली, आणि… सगळं शांत झालं, एक अनुभूती मनाचा ताबा घेऊ लागली, जीवाला सतत अस्वस्थ करणारी भावना नष्ट होऊन सगळं हलकं वाटू लागलं, जणू मी पाण्यावर तरंगते आहे. अथांग… !
© आरुशी दाते