सुश्री प्रभा सोनवणे
(आप प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी के उत्कृष्ट साहित्य को साप्ताहिक स्तम्भ – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते हैं।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 68 ☆
☆ जननी – जनक ☆
माझ्या आईचा मी विचार करते तेव्हा मला खुपच चकीत व्हायला होतं, त्याकाळात सगळ्याच बायका गृहकृत्यदक्ष वगैरे असायच्या, माझी आई सुशिक्षित कुटुंबातली तिची आई सामाजिक कार्यकर्ती, वडील कोऑपरेटिव्ह बँकेचे मॅनेजर होते, निवृत्त झाल्या वर शेती करत होते ते कोकणातले आमराई ,भातशेती वगैरे ! खुप मोठा बंगला, आईचं लग्न घाटावरच्या भरपूर शेतीवाडी असलेल्या घरात झालेलं! पण ती आम्हा सख्या चुलत सहा भावंडांना घेऊन शहरात बि-हाड करून आमच्या शिक्षणासाठी राहिली. आजोबा त्या काळात त्या भागातले मोठे बागाईतदार, त्यामुळे आईच्या हाताखाली कायम दोन तीन बायका असायच्या पण स्वयंपाक मात्र ती स्वतः करायची ! तिनं आम्हा बहिणींना कधीच घरातली कामं करायला लावली नाहीत, ती भरतकाम, विणकाम, खुपच सुंदर करायची, हौस म्हणून मशीनवर कपडे शिवायची, सुंदर स्वेटर विणायची! स्वयंपाकात सुगरण होती, या कुठल्याच कला तिने मला शिकवल्या नाहीत किंवा मी शिकले नाही. पण तिला वाचनाची आवड होती तिची वाचनाची आवड आमच्यात उतरली, आणि पुढील काळात मी लेखन करू लागले, फार जाणीवपूर्वक तिनं काही आमची जडणघडण केली नाही, पण आरामशीर आयुष्य तिच्यामुळे मी जगत होते हातात काॅफीचा कप, आणि जेवायला ताट ही कामवाली देत असे. आई सतत आजारी असायची तरी तिचा कामाचा झपाटा मोठा होता.
मी स्वयंपाक लग्नानंतर करायला शिकले, लग्नाच्या आधी आजीने भाकरी करायला शिकवली होती, कधीतरी चपात्या ही करत होते….. पण तिच्या सारखं प्रत्येक पदार्थ निगुतीनं करणं मला कधी जमलं नाही पण तिच्या हाताची चव मात्र माझ्या हातात उतरली आहे. भरतकाम, विणकाम, शिवण मी ही केलंय पण तिच्या इतकं सुबक नसे….. तरीही नूतन शेटे च्या ओळीप्रमाणे आज म्हणावंसं वाटतं अस्तित्व आज माझे….त्या तूच एक कारण….आपलं अस्तित्व हे आपल्या आईवडिलामुळेच! माझं हस्ताक्षर वडिलासारखं सुंदर आहे. कुरळे केस वडिलांसारखे आहेत, वडिलांची तब्येत एकदम चांगली होती, आखाडा गाजवलेले पहिलवान होते ते!
मधुमेह, संधीवात हे आजार अनुवंशाने आईकडून आलेले, आणि आता जाणवतं हे आजार तिने कसे सहन केले असतील??
आरामशीर, सुखवस्तू आयुष्य आईवडीलांमुळे जगता आलं ही कृतज्ञता आहेच! पण मला लहानपणी आईवडीलांचा नेहमीच धाक आणि दराराच होता.
आई बाप असतात
फक्त जन्माचे धनी
आयुष्याचे गणित
सोडवायचे ज्याचे त्यानी
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
हमारे आजीवन पथप्रदर्शक माता-पिता के संस्कार और मार्गदर्शन आजीवन रहता है। साथ ही उनके साथ व्यतीत किये गए खट्टे मीठे प्रसंग भी। अतिसुन्दर अभिव्यक्ति।